आढावा 2003

मराठीवर्ल्डच्या वाचकांना २००४ सालाच्या हार्दिक शुभेच्छा! हा आता या शुभेच्छा तशा तुम्हाला उशीराच मिळत आहेत म्हणा… इंग्रजीत एक म्हण आहे- ‘बेटर लेट दॅन नेव्हर’, हिंदीतही आहेच की, ‘देर आए पर दुरूस्त आए’ मराठीतही अशा आशयाची म्हण शोधता शोधता वेळ जाईल, म्हणून आपला इतर भाषांचा आधार घेतला.

नुकतंच काही दिवसांपूर्वी २००३ सालाने आपल्याला टाटा केला. २००३ सालात सुध्दा अनेक ब-या-वाईट घटना घडल्या. त्यापैकी अनेक घटनांबाबत आपण आपापसात चर्चा केली. परामर्श काढले. नंतर त्या घटना, ते प्रसंग आपण विसरूनही गेलो. पण थोडसं आठवणींमध्ये रमायला काय हरकत आहे? चला तर मग २००३ सालात… बघू या, समाजकारण, राजकारण, कला, क्रिडा व इतर क्षेत्रात काय काय घडले ते…

सर्वप्रथम राजकारणचा आढावा घेऊया. या वर्षी भारतात राजकारणाच्या पटलावर कोणी बाजी मारली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणूकांतून या पक्षाने मध्यप्रदेश, राजस्थान, व छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा काबीज केल्या. दिल्लीत मात्र शीला दिक्षितांनी काँग्रेस पक्षाला विजयपथावर नेले. या निवडणुकांमुळे व्हिडियो टेपच्या खेळात राजकीय पक्षांचे नामी नेते अडकले. श्रीमती मायावतींच्या भोवतालचे ग्लॅमर कमी झाले. जयललितांनी आपण कशा खमक्या आहोत हे पुन्हा दाखवून दिले. श्री. चंद्राबाबू नायडूंनी आपले राज्य प्रगतीपथावर कसे नेता येईल याकडे सतत लक्ष पुरवले. स्टॅम्प पेपर घोटाळयामुळे महाराष्ट्राचे राजकारणही संकटात सापडले. कर्नाटक सरकारही याचमुळे टीकेचे लक्ष्य बनले. हे सर्व पाहिल्यावर राजकारण विश्लेषकांनी राजकारणाबाबत सतत टीकेचा सूर लावला. पण करणार काय महाराजा, आता हे असंच व्हायचं. अहो, पहिल्या लोकसभेत पाच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते. आणि आज चाळीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी लोकसभेत आहेत… आता बोला! आणि हो, महत्त्वाची माहिती. या वर्षी लोकसभेने तब्बल १३३ दिवस काम केले.

खासदारांच्या पॅनल सभांची हजेरी ४१.१२ % होती. आणि लोकसभेने ६३ बिल्स पास केली. काय, छान वाटलं ना, वाचून… आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अमेरिक विरूध्द इराक युध्दाची सावली होती. यावर वर्षा अखेरीस झालेल्या सद्दामच्या अटकेने पडदा पडला.

आता आपण कला क्षेत्राकडे एक नजर टाकूया. मराठी हिंदी चित्रपट आणि इतर कला प्रांतांना हे वर्ष तसे बरे गेले. ऋतिकचा कोई मिल गया शाहरूखचा चलते चलते, कल हो ना हो, उर्मिलाचा भूत, प्रियदर्शनचा हंगामा, अमिताभ-हेमा जोडीचा बागबान, आणि वर्षाच्या शेवटी आलेला संजय दत्त अभिनीत मुन्नाभाई एम्.बी.बी.एस्. हे चित्रपट चालले. वेगळया विषयावरचे वेगळया घाटणीचे चित्रपट देण्याचा प्रयत्न हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी नक्कीच केला. अमोल पालेकरांचा अनाहत, श्री. गजेंद्र अहिरेचा नॉट ओन्ली मिसेस राऊत, हे चित्रपट लक्षात राहण्यासारखे होते.

मराठी नाटयसृष्टीला हे वर्ष तसे बरे गेले. सेलिब्रेशन, लोचा झाला रे, लग्नकल्लोळ, आम्ही दोघे राजा राणी या नाटकांचे चांगले स्वागत झाले. अल्फा वाहिनीने तरूण, होतकरू, परंतु अव्यावसायिक कलावंतांना एक योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अल्फा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर भरविल्या.

टिव्हीवर सादर होणा-या मालिकांमध्ये अल्फा टिव्हीवर सादर होणारी वादळवाट ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. टिकल ते पॉलिटिकल, घडलंय-बिघडलंय या मालिकासुध्दा त्यातील विषयाचे सादरीकरण व कलाकारांचा उत्स्फूर्त अभिनय या कारणांमुळे लोकांना आवडल्या. या वर्षी मराठी हिंदी चित्रपट गीतांपेक्षाही फिल्मेतर गीते, पॉप गीते यांनी बाजी मारली. एवढंच कशाला, टिव्हीवरच्या जाहिरांतीमध्येही यंदा सर्वांना चांगले संगीत ऐकायला मिळाले. आठवा पाहू, एअरटेलची धून, जाहिरात क्षेत्रात या वेळी एशियन पेन्टस् च्या वा ऽऽऽऽऽऽ सुनील बाबू, क्लोरोमिंटच्या दुबारा मत पूछना, दुबारा मत छेडना या ‘पंचलायनर्स’नी आपला ठसा उमटविला. या वर्षीची जाहिरातींमधील लोकप्रिय पंचलाईन आठवा पाहू… सोपी आहे, अल्पेनलिबे चॉकलेटस् ची ‘लगे रहो ऽऽऽऽऽऽ’- या बद्दल तुमचं दुमत नक्कीच नसेल.

चला आता क्रिडा क्षेत्राकडे. या वर्षीसुध्दा आपल्या क्रिकेट संघानेच ठसा उमटविला. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला दारूण पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली चांगलीच कामगिरी केली. या वर्षी विश्वचषकात खेळल्या गेलेल्या भारत विरूध्द पाकिस्तान या सामन्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. सचिन-सेहवागने पहिल्या पाच षटकांत पाक गोलंदाजांची केलेली पिटाई, ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार स्वीकारताना सूचक बोलणारा सचिन-सारंच लक्षात राहाणारं आहे. वर्ल्डकपच्या चर्चेबरोबरच क्रिकेट प्रेमींनी मंदिरा बेदीचीही तितकीच चर्चा केली.

सट्टेबाजांनीही मंदिरा आज कोणती वेशभूषा करेल यावर सट्टा लावला होता म्हणे… (बिशनसिंग ऐकताव ना…). चर्चेचं क्रिकेट आणि अनुभवायचं क्रिकेट ह्या दोन्हीचा पुरेपूर लाभ वर्ल्डकपच्या दरम्यान रसिकांनी घेतला. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून राहूल द्रविडचा ठसा क्रिकेट क्षेत्रावर कायम राहीला. जाता जाता अंबुजा सिमेंटवाल्यांना सांगावसं वाटतं, अहो, तुमच्या जाहिरातीत ते दोन भाऊ, त्यांचे कुटुंब, ऍटमबॉम्बचे फुटणे, तसेच त्यांच्या कुटुंबाचे एकत्र येण्याचे प्रयत्न हे दाखविण्याची काहीही गरज नाही. फक्त ‘राहूल’चा एक ऍक्शनपॅक्ड फोटो दाखवायचा, आणि खाली लिहायचं, ‘विराट स्ट्रेन्थ’!!

आता जरा राष्ट्रीय खेळाकडे वळूया. हॉकी. धनराजच्या हॉकी संघाने या वर्षी चार महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. गेले बरीच वर्ष क्रिडा पत्रकारांनी भारतीय हॉकी, धनराज आणि भारतीय प्रशिक्षक यांच्याबद्दल लिहीलं. पण याच वर्षी भारतीय हॉकीला गगन अजित सिंग, जुगराज सिंग यासारखे जिगरबाज खेळाडू मिळाले. जुगराजच्या खेळाने प्रभावित होऊन सुनील गावस्करनेही त्याची हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट घेतली… अगदी तो अपघाताने आजारी असतानाही. ‘तुमचं एशियाकप जिंकून येणं मला आजारपणातून लवकर बरं होण्यास नक्कीच मदत करेल’- असं तो आपल्या सहका-यांना म्हणाला. आणि धनराजच्या संघाने एशिया कप जिंकला. भारतात आल्यावर सगळयात आधी संघाने जुगराजची भेट घेतली आणि आपली मेडल्स त्याच्या गळयात घातील. भारतीय हॉकीचा हाच या वर्षीचा मानाचा क्षण ठरला.

तितकंच ते लिऍन्डर पेसच्या आजारी पडण्याने गाजलं. नंतर लिऍन्डर आजारपणातून उठला खरा पण ते काही दिवस टेनीस शौकिनांसाठी चिंतेचे ठरले असणार. (इथे महिमा चौधरीला किती चिंता वाटली असेल, याचा कृपया विचार करू नका) अर्जुन अटवाल या ३० वर्षीय गोल्फपटुने आपल्या खेळाने भल्याभल्यांना आश्चर्यचकित केले. पंकज अडवाणी या १८ वर्षीय कॉलेज युवकाने चायना येथे पार पडलेली स्नूकर स्पर्धा जिंकून… स्नूकरच्या क्षेत्रातही समर्थपणे उभं राहण्याची ताकद भारतापाशी आहे, हे दाखवून दिलं. अंजू जॉर्ज या युवतीने विश्वचषक ऍथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीच्या प्रकारात पदक जिंकले. तिचे पदक जिंकणे म्हणजे ईच्छाशक्ती व मेहेनत करायची तयारी असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय क्रिडा पटु व भारतीय ऑलिंम्पिक असोसिएशनच्या सुंदर टिमवर्कमुळे २०१० सालच्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या यजमानपदाची माळ आपल्या गळयात पडली. आपल्या अंजली वेदपाठक-भागवत ने खेलरत्न पुरस्कार खेचून आणला.

२००३ सालात ब-याच प्रसिध्द व्यक्तींनी देवाज्ञा झाली. श्री. हरीवंशराय बच्चन, एके काळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून सोडणारे विनोदी नट जॉनी वॉकर (बद्द्रूद्दिन काझी), बॉलिवूडची पहिली विनोदी नटी टुणटुण, भारताचे हुशार केंद्रीय मंत्री मुरासोली मारन, लीला चिटणीस, चित्रकार भूपेन कक्कर, संगीतकार श्रीकांत ठाकरे, वासंतीमुझुमदार, यांचे २००३ सालात देहावसान झाले पण भारतीय मन हळहळले ते अंतराळवीर कल्पना चावलाच्या अकाली मृत्युने. ‘लिसन टु द साउंड ऑफ नेचर, टेक केअर ऑफ द /ेजाईल प्लॅनेट’ हे तिचं वाक्य प्रत्येक देशवासींच्या कायमचे स्मरणात राहील.

तर असं हे वर्ष, २००३! प्रिन्स चार्लस् ला मुंबईच्या डब्बेवाल्यांना भेट देण्यास भाग पाडणारं, राहूलचं विजिता पेडणेकरशी लग्न लावणारं, उत्तर अमेरिकेतल्या लोकांना तब्बल ४८ तास वीजेशिवाय काढायला लावणारं, अरनॉल्डला कॅलिफॉर्नियाचा गव्हर्नर बनविणारं, सार्सच्या आगमनाने अखिल जगतातल्या वैद्यक यंत्रणेला जागवणारं, लक्ष्मणला व्हेरी व्हेरी स्पेशल (ददण्) लक्ष्मण अशी पदवी देणारं, पेप्सी, कोक, कॅटबरीज् या कंपन्यांची झोप उडविणारं, दलेर मेहंदीच्या शोधासाठी पंजाब पोलिसांना दिवसरात्र फिरायला लावणारं, फैजलाबाद (पाकिस्तान) येथे राहणाऱ्या एका तरूणीचा गुरूदासपूर (भारत) येथे राहणा-या तरूणाशी विवाह लावणारं, राहूलला ‘बॅटिंगचा बाप’ ही पदवी देणारं, कॉकोर्ड या तब्बल तीन तपे उडणाऱ्या विमानाला ‘आता पुरे’ असं सांगणारं, मुंबईला परत बॉम्बस्फोट बघायला लावणारं, पोप जॉन पॉलनी मदर तेरेसाचे केलेले स्वागत बघायला लावणारं, भारताची चांगली प्रगती करणारं… कुणी याला ‘फील गुड इयर’ म्हटलं तर कुणी ‘फेक गुड इयर’… तुमचं मत काय?…

या वर्षी २००४ सालात एवढंच कराचयं- गेल्या वर्षी केलेल्या चुका टाळायच्या व सकारात्मक दृष्टिने या वर्षाला सामोरं जायचं. आम्हाला अशी आशा आहे की, २००४ तुम्हाला चांगलंच जाईल. पुन्हा एकदा
२००४ च्या मन:पूर्वक शुभेच्छा! लगे रहो!!

– मंदार माईणकर, आणि मराठीवर्ल्ड परिवार