ज्योतिषशास्त्र अभ्यासाच्या विविध पध्दती आहेत. त्यापैकी ‘पारंपरिक पध्दती’ आणि ‘कृष्णमूर्ती पध्दती’ या दोन महत्त्वाच्या पध्दती आहेत. कृष्णमूर्ती पध्दती ही प्रो. के. एस्. कृष्णमूर्ती ह्यांनी शोधून काढली म्हणून या पध्दतीला ‘कृष्णमूर्ती पध्दती’ असे म्हणतात. ‘कृष्णमूर्ती पध्दती’ ही नक्षत्रस्वामी व उपनक्षत्रस्वामी वर आधारित पध्दती आहे. सर्वसाधारणपणे ज्योतिष अभ्यासकांना तसेच जातकाला (ज्याचे भविष्य बघत आहात तो) अचूकता अपेक्षित असते. आणि नेमकी हीच बाब कृष्णमूर्ती पध्दतीत महत्त्वाची ठरते. एखादी घटना कुठे, कशी आणि केंव्हा घडले याचे बरेचसे अचूक वर्णन कृष्णमूर्ती पध्दतीने करता येते. कृष्णमूर्ती पध्दतीत जन्मवेळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण ही पध्दती उपनक्षत्रस्वामीवर आधारित असल्यामुळे, व उपनक्षत्रस्वामी दर चार मिनिटांनी बदलत असल्यामुळे, (याचे कारण म्हणजे, पृथ्वी दर चार मिनिटांनी एक अंश फिरते), जातकाची जन्मवेळ अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नाहीतर संपूर्ण भविष्य चुकू शकते. कृष्णमूर्ती पध्दतीनुसार जुळया मुलांच्या पत्रिकेत देखील खूपच फरक पडतो. त्यामुळे वर-वर जरी जुळया मुलांच्या पत्रिका एकसारख्या दिसत असल्या तरी, उपनक्षत्रस्वामी बदलल्यामुळे, पत्रिकेच्या फलादेशात बराच फरक पडतो.
कृष्णमूर्ती पध्दतीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे, तर्कशुध्द नियम. ह्या पध्दतीत प्रत्येक फलादेश बघण्यासाठी (उदा. नोकरी, धंदा, लग्न इ.) अतिशय अचूक असे तर्कशुध्द नियम दिलेले आहेत. या नियमांमध्ये कुठल्याही प्रकारचा ढोबळपणा नाही. त्यामुळे फलातील अचूकता खूपच वाढते. तसेच फलादेश सांगायलाही कमी वेळ लागतो. जातकाचे जे सर्वसाधारण प्रश्न असतात, जसे, ‘नोकरी कधी मिळेल?’, ‘धंदा करू का?’, ‘लग्न कधी होईल?’, ‘बायको कशी मिळेल?’ इत्यादि इत्यादि…
यासाठी अचूक तर्कशुध्द नियमांची आखणी आहे. कृष्णमूर्ती पध्दतीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, ‘रूलिंग प्लॅनेटस्’ (ruling planets) रूलिंग प्लॅनेटस् म्हणजे, लग्नराशी स्वामी, चंद्रनक्षत्र स्वामी, चंद्रराशी स्वामी आणि वाराचा स्वामी. कुठलाही प्रश्न बघताना जर रूलिंग प्लॅनेटस् ची मदत घेतली तर, ज्या घटने संबंधात उत्तर शोधत असाल, त्या घटने संबंधी अचूक माहिती मिळते. काही काही वेळा अतिशय तात्कालिक असे प्रश्न असतात. जसे, ‘हरवलेली एखादी वस्तू मिळेल का?’ किंवा ‘एखाद्या विवक्षित व्यक्तिशी विवाह होईल का?’ वगैरे, वगैरे… अशा वेळेस जन्मपत्रिके बरोबरच प्रश्नकुंडलीचा देखील आधार घ्यावा लागतो. त्या वेळेस रूलिंग पॅटर्नस् महत्त्वाचे ठरतात. जसे ती घटना लवकर घडेल की, खूप उशीरा घडेल, एखादी वस्तू चोरीस गेली असेल तर ती वस्तू आता स्थिर आहे, की एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे?, चोर स्त्री आहे की पुरूष?, वस्तू मिळेल की नाही?, मिळेल तर कधी मिळेल?- या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे शक्य होते. कृष्णमूर्ती पध्दतीत ह्याचा उल्लेख दैवी मार्गदर्शन असाच केला जातो.
तर अशी ही कृष्णमूर्ती पध्दती. प्रस्तुत पध्दतीचा स्थूल परिचय व्हावा हा या लेखामागील हेतू. वरील लेखात वर्णिलेल्या तसेच इतरही अनेक वैशिष्टयांमुळे कृष्णमूर्ती पध्दती अचूक ठरते. ही पध्दती सर्वांनाच फायदेशीर ठरणारी आहे. कृष्णमूर्ती पध्दतीच्या वेबसाईट करता येथे क्लिक करा…
– अभय गोडसे