मन माझे घर 1

कोणतीही चांगली गोष्ट करावयाची झाल्यास आपण मुहूर्त पाहतो. नवीन संकल्प करावयाचे झाले तरी नवीन वर्षापासून अमुक अमुक करणार असे आपण ठरवतो.पण खरतर या वाहत्या जीवनात प्रत्येक क्षण मुर्हुत असतो. फक्त तो पकडून सुरवात करायचा अवकाश असतो. या गोष्टीची एकदा जाणीव झाली की, मग नवीन संकल्पाची सुरवात कधीही करता येते.

मी ठरवले आपण आपले ‘मन’ नांवाचे घर स्वच्छ करायचे आणि या घरात लक्षपूर्वक पाहिले तेव्हा लक्षात आले,हे आपले स्वत:चेच घर असून कसे अस्ताव्यस्त झालेले आहे. कागदाच्या कपटयाप्रमाणे किती तरी बरे वाईट, अनावश्यक, वेळेचा अपव्यय करणारे असंख्य विचार यांचा नुसता कचरा या मनाच्या घरा-दारात पसरला आहे.जुन्या अडगळीच्या वस्तू कुठे तरी कोपऱ्यात वर्षोनुवर्षे पडल्याप्रमाणे, जुने हेवे दावे, वाद, भांडणे, एखाद्याबद्दलचा आकस, क्षुल्लक मानापमान घरात निष्कारण पडून आहेत. ते कधी तरी प्रसंगानुरूप वर डोकेसुध्दा काढतात. खरं तर त्यावरून काळाचे पाणी वाहून गेलेले असते. हया साऱ्या टाकाऊ झालेल्या वस्तू असतात पण मनाच्या वास्तूत अहंकार बीजाचा वास्तुपुरूष जो आपण कायमचा पुरून ठेवलेला असतो तोच पुन: पुन: वर मान (अवमान) काढून डोकावतो. या निरर्थक निरूपयोगी अशा वस्तूंच्या साठयामुळे आपल्याला त्रास होतो तरीही आपण हे सगळे घरात साठवून ठेवतो कशासाठी? हे काढुन टाकायला हवे याची जाणीव झाली. मीपणा विसरून निर्मोही बनून, स्वार्थाची बंधने तोडून टाकण्यासाठी या वास्तुपुरूषाची प्रथम शांती करायला हवी तरच तो आपल्याला ‘तथास्तु’चा आशिर्वाद देईल मनाच्या घरात असलेले आत्म्याचे देवघर ते तरी कुठे विशुध्द राहिले आहे? तिथे ना शांतीचा दिवा तेवतोय ना ‘शुभं करोति कल्याणम्’ प्रार्थनेची आवर्तने चालु आहेत.

तिथे पूर्व संचित धुळीचा नुसता थर साचला आहे, इतका की, आत्म्याशी एकरूप परमात्म्याचे, परमेश्वराचे दर्शन होणे सुध्दा दुरापास्त झाले आहे. खरं तर त्या परमात्म्याइतके जवळ, आपल्यापाशी दुसरे कोणीच असत नाही तरी संचिताच्या धुळीमुळे त्याला आपण पाहू शकत नाही. हा मनुष्य जन्म मिळाला आहे तर या जन्मी काया, वाचा, कृतींनी चांगले कर्म करून, संचिताची ही धुळ झटकून, शुध्द भक्तिरसाने ईश्वरनाम जपाने या गाभा-याचे क्षालन करायला हवे. आरशावरची धूळ, स्वच्छ फडक्याने पुसली की आपले प्रतिबिंब स्वच्छ दिसते तद्वत अंतरातील गाभाऱ्यातील अधिष्ठित परमात्म्याची अनुभूती मिळायला हवी. अंतर गाभा-यात सत्कर्माच्या संतत धारेने अभिषेक करायला हवा. अनंत अंत:चक्षूंच्या दीपाने देवघर उजळून निघायला हवे.