मन माझे घर 2

या घरात जन्मापासून, आतल्या अदृश्य अंतरंगाच्या खोलीत दोन संदुका जपून ठेवलेल्या आहेत. पैकी एक संदूक तर कायमची सिलबंद करून ठेवलेली असते. स्वत:पुरती खाजगी स्वरूपाची. त्यात किती तरी गोड कडू आठवणींच्या याद्या, किती तरी जखमांचे व्रण, नकळतच्या चुकांचे, न बोलता येणाऱ्या शल्यांचे खंजीर, अपेक्षाभंगाचे तुटके पंख, अवहेलनेची जुनी वस्त्रे जपून ठेवलेली असतात अगदी वर्षानुवर्षे. ती कधी रिकामी करण्याचा आपण प्रयत्न सुध्दा करत नाही. ती कुणाला दाखवायची आपली इच्छाच नसते कारण जगात तिचे सिल कोणी काढूच शकत नाही. पण दुसरी संदूक आपलीच पण कायमची आपण बंद करून ठेवू शकत नाही. त्यामुळे ती सार्वजनिक स्वरूपाची असते. तिथे खरे खोटे, चांगले वाईट, गुण अवगुण, तुझे माझे, स्वार्थ परमार्थ, उपकार अपकार अशा अनेक परस्पर विरोधी वस्तूंचा साठा अलिखित दस्तऐवज स्वरूपात अगदी जन्मापासून राहिलेला असतो. अनुभवाच्या पोतडया, ग्रहण केलेल्या ज्ञानाची पुस्तके, तसेच अंतर्यामीच्या गोष्टी लपवून चेहऱ्यावर घेतलेले मुखवटे, दाखवायचे दात खायचे दात इथेच ठेवलेले असतात इतकेच काय रोजच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाच्या नोंदी, घडामोडी, आनंद दु:खाचे क्षण प्रसंग, सारे सारे यात इतके साठवून ठेवलेले असते कि कधी कधी त्यात काय काय रचून ठेवले आहे ते आठवत सुध्दा नाही. वाढत्या वयाबरोबर एकटयाने हा भार वाहणे आणि तो सांभाळणे कठीण होऊन जाते. वाटते सारे काढून बाहेर फेकून द्यावे. दोन्ही संदुका रिकाम्या कराव्यात, स्वच्छ पुसून निर्मल ठेवाव्यात पण ते कसे शक्य आहे. त्यासाठी कोणी तरी आध्यात्माचा गुरू हवा. शिकवण देणारा आर्दश हवा, मार्गदर्शक हवा. वेळच्या वेळीच जर या दोन्ही संदुका मोकळया करून स्वच्छ केल्या तर ती कधीच अडगळ वाटणार नाही. भार, ओझे होणार नाही.

मनाच्या खिडक्या आणि कवाडे तर आपण सदैव सताड उघडी टाकतो. त्यातून बाहेरच्या आलतू-फालतू, अनावश्यक गोष्टी, फावल्या वेळातील उणी दुणी, हेवा, ईर्षा, भांडण, तंटे, बखेडे सारे या मनाच्या घरात घुसत असतात आणि कचरा बनून रेंगाळत राहतात. त्यांची जळमटे लोंबत राहतात, त्याचेच थरावर थर साचत राहतात. उगवत्या व मावळत्या सूर्याबरोबर अर्थात रोजच्या रोज याची साफसफाई व्हायलाच हवी. या उघडया दारे-खिडक्यांतून चांगल्या गोष्टी सुध्दा या घरात प्रवेश करीत असतात पण होते काय, चांगल्याला आपण आपल्या घरात कायमचा वा दीर्घकाळ थारा देऊ शकत नाही. सुख आपण लवकर विसरतो पण दु:ख मात्र वारंवार उगाळत बसतो ते याच आपल्या दुर्गुणामुळे. दारेखिडक्या कधी उघडायची आणि कधी बंद करायची हे आपण निश्चित ठरवायला हवे.