स्त्री-पुरूष मैत्री हा विषय नवीन नसला तरी अति जिव्हाळयाचा, इंग्लिशमध्ये सांगायचे तर, ‘close to heart’ असल्याने यावर एका आंतरिक ओढीने लिहावेसे वाटत आहे, नि मला खात्री आहे, तुम्हीही अतितत्परतेने वाचाल.
‘स्त्री-पुरूष मैत्री’ या विषयाची ‘image’ कानफाटया माणसासारखी एवढी ‘type cast’ झाली आहे, की या विषयाची सुरवात मी ‘तो व ती’ अशी केली तर तुमच्या मनात काय येईल बरं? निश्चितपणे एका तरूण युगुलाची रम्य प्रणयकथा वाचायला तुम्ही आतूर झाला असाल. साहजिकच आहे. एकीकडे फडके, व दुसरीकडे काकोडकर अशा विस्तृत साहित्य पटलावर आपण पोसले गेले आहोत. म्हणजेच एका बाजूला फडक्यानी झाकावं तर दुसऱ्या बाजूला काकोडकरांनी ‘उघडउघड’ बोलावं, अशा प्रणयपटावर! प्रत्यक्षात मात्र स्त्री-पुरूष मैत्री या एकाच क्षेत्रात मर्यादित असण्याची गरज नाही. हा मैत्रीपट प्रत्यक्षात फार विशाल आहे.
या मैत्री विविधतेची सुरवात कुटुंबापासून होते. या जगात आपली पहिली मैत्रीची नाळ बनते ती आपल्या आईबरोबर. मग नातं विस्तारत जातं… बहिण, बायको मुलीपर्यंत! म्हणजे, पुरूष स्त्रीच्या ‘मैत्रीत पडण्या’ची प्रक्रिया इतकी सहज व जन्मजात आहे. स्त्री-पुरूष मैत्री … ज्याची सुरवात आपलं बोट धरून आई करून देते ती, पत्नी म्हणून दुसरीचा हात हातात घेत नि पुढे मुलीला स्वयंवरात निरोप देताना डोळे पुसणाऱ्या हातापर्यंत गेलेली असते.
सहचर्य मैत्री – आयुष्यात असे अनेक टप्पे, प्रसंग असतात, जेंव्हा शिक्षणानिमित्त, कामानिमित्त सहाध्यायी, सहकारी म्हणून दिवसाचा नि पर्यायाने जीवनाचा बराच काळ एकत्र व्यतीत होतो. सहवासातून मग मैत्री, नाती जुळून येतात. बऱ्याच वेळा मग मेडिकल कॉलेजमधून पास होताना, पुरूष डॉक्टर्स डिग्री व ‘डिक्रि’ एकदमच घेऊन बाहेर पडतात.
आसक्ती मैत्री – यात शारिरीक शरारत उर्फ जवळिक अंगभूत आहे, व संबंध हेच मैत्रीचं एकमेव कारण असू शकतं. यामध्ये साहित्याचं अंग नसलं तरी अंगाचं साहित्य जरूर आहे. असं नातं अक्षरश: अंगावर येतं नि मग अंग काढून घेणं अवघड होऊ शकतं. अशी मैत्री जर अन्य दुसरं कारण नसेल तर अल्पजीवी, तात्कालिक राहते.
राजकारणी मैत्री – राज्य हेच कारण असलेली राजकारणी मैत्री आपल्याला सुपरिचित आहे. मग ती काशीरामची माया असो, नाहीतर इघ्ठ ची जया. इघ्ठ ने तर ‘जया अंगी ‘मोटेपण’ (म्हणून) तया यातना कठीण’ हे शब्दश: अनुभवले आहे.
एकतर्फी मैत्री – स्त्री-पुरूष मैत्री ही ब-याचदा एकतर्फी असते. ती समोरच्या व्यक्तिला माहित असो वा नसो, निदान मान्य तरी नसते. असे मैत्रीचे अनेक मळे, वा मळमळ वासूनाक्यावर फुललेली दिसते. हे म्हणजे, no vacancy चा बोर्ड असूनही आशाळभूत उमेदवाराप्रमाणे कायम अर्ज टाकल्यासारखं…
काल्पनिक मैत्री – ब-याचदा अशी मैत्री हा कल्पनाविलास असतो. ही मनाची भरारी, हे स्वप्न ही सारी उमलत्या तरूण मनाची त्या त्या काळातली गरजच असते. अर्थात, तोवरच जोवर आपल्या मनाचा
त्यावर ताबा असतो. जेंव्हा हा कल्पनाविलास आपल्या मनाचा ताबा घेतो, तेंव्हा ती एक psychic case झालेली असते.
संधीसाधू मैत्री – अशीही बरीच उदाहरणं असतात. आपल्या नोकरीतल्या बढतीसाठी नवऱ्याने बायकोचा वा स्त्रीने वरिष्ठाच्या ‘मैत्री’ची शिडी वापरली आहे. असं ऐकण्यात आलं होतं की, पद्मा चव्हाणांनी आपल्या भाळी कमलाकरांचं तोरण बाधलं, तेंव्हा तेंव्हा त्यांच्या प्रगतीला ते तारण राहिले होते.
सहानुभूती मैत्री – सहानुभूती हेंही स्त्री-पुरूष मैत्रीचे कारण राहिलेलं आहे. कधी कधी ही सहानुभूती फसवी किंवा वैयक्तिक फायद्याचं माध्यमही झालेली आहे.
या सा-या विविधांगी मैत्रीपटाचं संपूर्ण दर्शन जर कुठे आपल्याला घडत असेल तर तो आहे, हिंदी सिनेमा. आपण सुरवात करूया राजकपूर-मीनाकुमारीच्या शारदापासून. यामध्ये मैत्रीचा असा विचित्र तिढा आहे, की जिच्यावर प्रेम केलं, तिलाच आपली सावत्र आई म्हणून स्वीकारावं लागलं. ‘संगम’ हा झाला एक नेहमीचा घिसापिटा त्रिकोण. याऊलट ‘मेरा नाम जोकर’ मध्ये आहे, जागोजागी मैत्रीचा एकतर्फी शोध घेणारी अस्वस्थ करणारी व्यथा. राजकपूरच्याच ‘अनाडी’मध्ये आहे, एक वेगळीच मैत्री. Mrs. Disa! एक अशी ‘दिशा’ की जी त्यानंतर अनेक सिनेमातून ‘दशा दशा’ होऊन डोकावत राहिली. ही सारी राजकपूरच्या सिनेमातली उदाहरणं केवळ योगायोग नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही त्यांच्या स्त्री-मैत्रीचा बोलवा बराच होता. त्यांच्याइतके क्वचितच इतर कुणी इतके मैत्रीचे किंवा (मैत्रीणींचे) पदर पाहिले असतील. त्यांनी कित्येक जणींचे हात धरले असावेत. या बाबतीत तर, त्यांचा हात (त्या त्या स्त्रियांशिवाय) कुणी धरला नसेल.
‘दो ऑंखे बारह हाथ’मधील जेलर व डमरूवाली यांच्यात तर कुठलंही defined नातं नसतं. पण तरीही त्यांच्यात असते, एक स्नेहाची रूजवात. शांतारामांच्याच ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये मैत्री जी लग्नामध्ये परिवर्तित होऊ इच्छित असते, तिला आपल्या सहचराच्या प्रगतीच्या आड आपण येऊ नये म्हणून त्यागाचा मुलामा चढविला जातो. स्त्री-पुरूष मैत्रीच्या या प्रत्येक छटेला आहे अर्थ व depth. स्त्री-पुरूष मैत्रीचं स्वत:चं असं एक अस्तित्त्व आहे, identity आहे, की जे समलिंगी मैत्रीने भरून येऊ शकत नाही. पुरूषी दृष्टिकोणातून बोलायचं झालं तर, स्त्री-पुरूष संबंधातल्या अशा अनेक नाजूक गोष्टी असू शकतात की, ज्या आपण आपल्या आई, बायको, बहिण यांच्या कितीही जवळ असलो तरी बोलू शकत नाही. किंबहुना बऱ्याचदा या नात्यांच्या जवळिकीमुळे वा बंधनांच्या भिडेखातर म्हणून आपलं मन मोकळं करण्याची, चिंता, stress मोकळं करण्याची स्त्री-पुरूष मैत्री ही गरजेची एक वाट बनते. कुठेतरी आपल्याला अशा काही भावनिकता समजून घेण्याच्या गरजा असतात. ज्या आपल्या पुरूष मित्रांकडून पुऱ्या होत नाहीत. समाजातील संवेदनशीलता, निकोपपणा जपायच्या दृष्टिने स्त्री-पुरूष मैत्रीची अपरिहार्यता आहे. स्त्री-पुरूष मैत्रीमध्ये लक्ष्मणरेषा असावी की नाही, असल्यास किती व कोठवर हा वैयक्तिक जाणिवेचा, विचारांचा व संस्कारांचा प्रश्न आहे. या मैत्रीत कुणी, किती, कुठपर्यंत झोकून द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीही या मैत्रीच्या निकोप विकासासाठी त्यात कपट, लपवालपवी, एकांगीपणा नसावा असं वाटतं.
आपलं आयुष्य, भावना या वाहत्या, गतीमान असतात, ज्यायोगे, त्यात जिवंतपणा टिकून राहतो. त्याच प्रमाणे स्त्री-पुरूष मैत्री ही देखील अशीच वाहती असली पाहिजे. तिला ज्यावेळी जसं भावेल, तसं रूप धारण करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. या मैत्रीला एका preset नात्याच्या साच्यात कोंबून त्याची कुचंबणा करू नये. पिंजऱ्यात जखडून राहण्याचा अभिशाप त्याच्या भाळी येऊ नये. जसं गुलजारांनी एका गाण्यात म्हटलं आहे- ‘रिश्तों का इल्जाम न दो। प्यार को प्यार ही रहने दो, काई नाम न दो।’ किंवा व.पुं.च्या लिखाणात आल्याप्रमाणे, ‘नात्यांना पाखरांसारखं जपावं. मालकी हक्क गाजविण्यासाठी पिंजऱ्यात डांबू नये.’ जी उडून जातील ती नाती आपली नव्हतीच. जी आपली असतील ती खचितच उडून जाणार नाहीत.
खरं म्हणजे, आपल्या साऱ्या पुरूष वर्गाच्या मनामध्ये एक स्त्री नेहमीच दडलेली असते. पुरूषपणाच्या कोषापायी मात्र आपण तिचा विकास होऊ देत नाही. किंबहुना आपण तिचं अस्तित्त्वच नाकारतो. आपलं भावविश्व, आपली तरलता, नाजूक भावना, संवेदना हे सांर सारं त्या मनातल्या स्त्रिचं देणं आहे. स्त्री आणि पुरूष प्रवृत्ती या एकमेकांस पूरक असून दोघांच्या एकत्रितपणातच दोघांना पूर्णत्त्व आहे. अर्धनारीनटेश्वर असूनही आपल्या बाहय, दृष्य, र्धस्वरूपालाच आपण पूर्ण समजून चूक करतो. म्हणूनच माझ्यामते, बाहय स्त्री-पुरूष मैत्री साधण्याआधीही, आपण या आपल्या मनातल्या स्त्रिशी मैत्री जुळवून घेणे अत्यंत निकडीचे आहे. मुख्य मुद्दा हा आहे की, आपल्यापैकी, किती जणांनी असा प्रयत्न केला असेल?
– यतीन सामंत