माझी आणि बाबुजींची खरी ओळख तीस वर्षापूर्वी लंडनमध्ये आमच्या घरींच झाली. तसे आम्ही एकमेकांना ओळखत होतो, परंतु तो एक प्रकारचा spone way traffic होता म्हणाना. म्हणजे असं की मी त्यांच्या संगीताच्या अनेकानेक चाहत्यांपैकी एक होतो, संघामुळेही ते परिचीत होते. त्यांनी म्हटलेले ‘जय स्वदेश जय संस्कृती माता’ हे गीत मी कधीच विसरू शकणार नाही.
ते मला ओळखतात की नाही हा प्रश्नच नव्हता पण योग आला खरा.
त्याचे असे झाले…..
गोवा मुक्ती आंदोलनातील एक सत्याग्रही मोहन रानडे हे लिस्बनला पोर्तुगीजांच्या कैदेंत होते, त्यांच्या सुटकेच्या प्रयत्नासाठी सुधीर फडके लंडनला येणार होते, असे त्यांचे मला पत्र आले.
‘तुमची येण्याची तारीख, फ्लाइट नंबर वगैरे मला कळवा, मी तुम्हाला घ्यायला विमानतळावर येतो, तुम्ही माझ्याकडेच उतरणार आहात’ अशा अर्थाचे माझे उत्तरही त्याना ताबडतोब गेले.
ठरल्याप्रमाणे विमानतळावर ते आले, त्यांनी मला पाहिले आणि आमची अगदी जन्मजन्मींची ओळख आहे असंच मला वाटले. घरी आल्यावर अगदी थोडयाच वेळांत घरचेच झाले. एकच उदाहरण-
बाबूजी! आम्ही तुम्हाला काय म्हणून हांक मारावयाची? मी विचारले. हे बघा! ‘बाबूजी’ हे माझं व्यवसायांतले नांव आहे, मला घरीं सगळे ‘अण्णा’ म्हणतात. हे घर माझेच आहे, तेंव्हा तुमचाही मी ‘अण्णाच’, बाबूजी नाही. आल्या आल्या थोडया वेळांतच आम्हांला त्यानी जिंकले.
आणखी एक प्रसंग –
अण्णा! प्रवासाचा तुम्हाला त्रास झाला असेल, शिवाय दोन देशांच्या वेळेंतही फरक आहे, तेंव्हा तुम्ही आता आरामशीर झोपा. सकाळी उठण्याची गडबड नाही. अगदी हवे तेंव्हा उठा. त्यांची खोली दाखवून मी त्यांना गुडनाइट केले.
‘भांडी वगैरे आपण सकाळी आवरू.’ असे म्हणून आम्हीही झोपावयास गेलो.
मंगला सकाळी लवकर उठून पहाते तो सर्व भांडी धुतलेली. मला येवून विचारते ‘आज काम करण्याचा एकदम उत्साह कसा आला ? कधी नाही ते एवढे काम कशाला केलेत ?’
‘मी तर उठलो नव्हतो. आणि….एकदम सर्व प्रकार लक्षांत आला.
ज्यांच्या आवाजानेही, गीतरामायणांतील संगीतानी लाखो लोकांना अक्षरश: वेडे केले असा हा थोर संगीतकार केवळ कांही तासांच्या परिचयानंतर, आपण होऊन भांडी घासून ठेवतो, आणि तेही कसलाही गाजावाजा न करता.
खरंच, आपण किती खुजे आहोत, हे मला त्या दिवशी कळले.
सकाळी चहा पितांना, मी कांही विचारावयाचे आधीच….
अण्णा म्हणाले…
‘तुम्ही काय विचारणार हे मला माहीत आहे. माधवराव, ही कामे मी घरी करतोच. तुमच्याकडे गडी नसतात. आणि तुम्हां दोघांना सकाळी लवकर कामावर जायचे आहे हेही मला माहीत आहे. शिवाय मी रात्रीच ‘हे घर माझेच आहे’ असं सांगितलय आठवतय कां ?
आता काय विचारावयाचे ते विचारा. आम्हा दोघांच्याही तोंडून शब्द फुटेना, डोळे डबडबले होते. एक विलक्षण शांतता पसरली. ‘चला आटपा लवकर. तुम्हांला कामावर जायचे आहे ना.’ इती अण्णा.
आमच्याकडे स्कॉटीश बॉर्डर टेरीयर जातीचा एक मस्त कुत्रा होता. त्यानी पण अण्णांशी लगेच दोस्ती केली, आणि तेही त्याच्यावर एकदम खुष. खरंच ह्या मुक्या प्राण्यांनाही माणसांची नीट पारख असते नाही कां.
त्यांच्या जेवण्या-खाण्याची सर्व व्यवस्था करून आम्ही बाहेर पडलो. ते ज्या कामासाठी आले होते, त्या कामाची सर्व माहिती करून घेतली, कुणाकुणाला भेटावयाचे त्यांची यादी केली, फोन नंबर शोधून काढून फोनाफोनी सुरू केली आणखी दोनतीन मित्रही मदतीला आले.
मग झाली भटकंती सुरू. त्याना घेऊन अनेक लोकांना भेटलो. पोर्तुगीज जाणणारे एक वकील लंडनपासून तीस मैलावर रहात असत, त्यांना मराठी अजिबात येत नसे. परंतु मोहन रानडे यांना ते ओळखत होते, त्यांचा खूप उपयोग झाला. या कार्याला मदत म्हणून आम्ही ‘गीतरामायण’ करावयाचे ठरविले आणि केलेही. भारताबाहेरचा गीतरामायणाचा हा पहिलाच कार्यक्रम असावा.
त्यानंतर चारपांच वेळातरी कांही कामानिमित्ताने अण्णा आमच्याकडे येऊन गेले, परिचय वाढत गेला, आमच्या घरी मी दीड दिवसांचा गणपती आणतो, पूजा मी घरच्याघरींच लहानप्रमाणात करतो. एकदा अण्णा त्याच दिवशी सुदैवाने आमच्याकडे होते. पूजावगैरे झाली, आता जेवावयास बसावयाचे, त्याचे आधी अण्णा म्हणाले ‘माणवराव ! एक विनंती आहे. मी गणपतीपुढे एक दोन अभंग म्हणू कां? अण्णा, विचारता काय? असे म्हणून मी लगबगीने. पेटी आणून समोर ठेवली, आणि काय सांगू तुम्हाला. समोर अगदी हजारो श्रोत बसले आहेत, अशा थाटांत त्यानी दोन गाणी म्हटली. ऐकावयास श्रोते फक्त आम्ही दोघे, आमचा गुंडू आणि श्री गणेशाची मुर्ती. त्यादिवशी, ‘काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ’ हे गीत ऐकून, माझं लक्ष नव्हते, पण गणपतीचे डोळेही पाणावले असतील, त्यालाही आपण आज धन्य झालो असं वाटले असेल. इतका कमी श्रोतृवर्ग, अण्णा! तुमच्या कुठच्याही कार्यक्रमाला लाभला नसेल नाही? इती मी.
त्यांना साधे जेवण आवडायचे. आमटी, वरणभात, एखाद दुसरी पोळी, आणखी काही नको, एखादा पदार्थ चांगला झाला किंवा त्यांना आवडला की, लगेच ‘वहिनी, ह्या वरणाबद्दल तुम्हास राष्ट्रपतीपदक अर्पण करण्यांत येत आहे बरं का’ ही दाद. अशी कितीतरी पदके आमच्या घरी आहेत.
लंडनला पूर्वी बी. बी. सी. ‘अपनाही घर समझीये’ नांवाचा एक कार्यक्रम दर रवीवारी सादर करीत असे. त्यांत बाबूजींचे गाणे व्हावे, यासाठी प्रयत्न करावा या हेतूने श्री. महेंद्र कपूर या दिग्दर्शकाला भेटलो. त्यांनी मला बाबूजींची टेस्ट घ्यावी लागेल असे सांगितले. आता आली का पंचाईत आम्हाला काही ते पटले नाही. पण हे अण्णांना कुणी आणि कसं सांगायच? शेवटी एक युक्ति केली. टीव्हीवर बांसरी वाजवणारा एक मित्र होता. तो अर्थातच बाबूजींचा भक्त होता, त्याचे घरींच अण्णांच्या गाण्याचा एक कार्यक्रम ठरविला, आणि महेंद्रला आग्रहाने आमंत्रण दिले. कार्यक्रम झकासच झाला, विशेष म्हणजे ‘ज्योती कलश झलके’ हे गाणे संपल्यानंतर महेंद्र डोळे पुसत पुसत बाबूजींना म्हणतो ‘मुझे माफ करना, आपको माना, आपका गाना आपको चाहे जब रेकॉर्ड होगा’. त्या रात्री आम्ही गाडींतून, नव्हे हवेंतूनच घरी परतलो.
ह्या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग १२० मैलांवर असलेल्या बर्मिन्गहॅम येथे होत असे. वेळ सकाळी ९ वाजतां. म्हणजे पहांटे लवकर निघावयास हवे. जवळ जवळ दोन तासांचा प्रवास. एकास दोन गाडया बरोबर असलेल्या चांगल्या म्हणून डॉ. उषा वाघ. (पूर्वा श्रमींच्या उषा अत्रे, बाबूजींच्याबरोबर त्यांच्या दोनतीन रेकॉर्डस आहेत) यांनीही आपली गाडी बरोबर घेतली. कार्यक्रम मस्तच झाला. दोन गाणी ठरलेली असतानासुध्दा महेंद्रने अर्धातास रेकॉर्डींग केले आम्ही सर्व खुष झालो. डॉ. उषाने बाबूजींच्या सन्मानार्थ एका मोठया हॉटेलांत छान पार्टी दिली.
एकदा ते इथे असताना मी त्याना सहज विचारले. अण्णा, आपण डॉ. जयंतराव नारळीकरांना भेटावयास केंब्रिजला जायचं का? अर्थात, पण नुसते नाही जायचे, तुम्ही तब्बलजी बघा पेटी आपल्याकडे आहेच. लगेच येथील स्थनिक तब्बलजी श्री. मधुकर कोठारी यांचेशी बोलून मी डॉक्टरांची वेळ ठरवून घेतली आणि केंब्रिजला गेलो. जयंतराव! तुम्ही फक्त फर्माइश करा मी म्हणतो. अशी सुर वात करून जवळ जवळ दीड तास अण्णांनी आम्हा सर्वांचे कान तृप्त केले. नंतर नारळीकरांकडचे सुग्रास जेवण.
अशी ही संगीतांतल्या ‘रँग्लर’ची आणि गणितातल्या ‘बाबूजी’ची एक स्मरणीय मैफील. असा हा एक दिलदार, साधा कलावंत. पण माणूस म्हणून फार फार मोठा, थोर गायक माझ्याकडे राहिला हे माझे भाग्य.
लंडनला असताना मी ज्या ज्यावेळी भारतात सुट्टीवर येत असे, त्या त्यावेळी मुंबईतला माझा पत्ता असे ‘१२ शंकरनिवास, शिवाजी पार्क, दादर’ आता आम्ही लंडन सोडून भारतात परत आलो आहोत. तरीपण अजूनही ‘सुधीर फडके’ ‘बाबूजी’ आणि त्यापेक्षाही ‘अण्णा’ मनातून जायला तयार नाहीत, जाणारही नाहीत.
– माधव जोशी