मनालीचा भोंडला

मी अमिता डी., मनालीची आत्या. माझ्या ९ वर्षांच्या भाचीचा, मनालीचा भोंडला आम्ही साजरा केला. आधी मराठी वर्ल्डवरील सर्व भोंडल्याच्या गाण्यांचे प्रिंट-आऊट घेतले. माझ्या भाच्याने मनालीच्या सर्व मैत्रिणींकडे जाऊन त्यांना भोंडल्याचे आमंत्रण दिले. संध्याकाळी सात वाजता तिच्या साऱ्या मैत्रिणी जमल्या. खिरापतीसाठी ओल्या नारळाच्या करंज्या व बटाटा वडा बनविला. रसना चे सरबत देखील बनविले. मनाली व तिची बहीण मयूरा छान शरारा घालून तयार झाल्या. मनालीच्या आईने पाटावर हत्तीचे सुंदर चित्र काढले. तो पाट आम्ही सजविला. मग भोंडला सुरू झाला.

मोठा गोल करून साऱ्याजणींनी फेर धरला. मग भोंडल्याची सारी गाणी म्हटली. ही गाणी सगळयांनी काही एकासुरात छान अशी म्हटली नाहीत. त्यानंतर झिम्मा व फुगडया खेळल्या. मग गरबा खेळलो. लगान मधील ‘राधा कैसे न जले’ हे गाणे म्हटले. मराठी चित्रपटांमधील गाणी देखील म्हटली. एवढे झाल्यावर सारेजण जरा थकलो. मग साऱ्यांना खिरापत ओळखा म्हणून सांगितले. आधी कुणालाच खिरापत ओळखता आली नाही. सारेजण चुकले. त्यांना थोडी सूचक माहिती दिली. दिवाळीतला पदार्थ म्हटल्यावर लगेच त्यांनी करंज्या ओळखल्या. मग वडा व रसना पण ओळखले. मनालीच्या मैत्रिणीने वाटली डाळ आणली होती. मग साऱ्यांना खिरापत वाटली. मनालीने मग साऱ्याजणींना १ चॉकलेट, पेन्सील व टिकल्यांचे पाकिट वाटले. अगदी साधेपणाने केलेल्या या भोंडल्याची आम्ही मात्र खूपच मजा लुटली.

– अमिता डी