स्वामीधाम

श्री गणेशाय नम:
श्री स्वामी समर्थ

आदित्य अंधकार निवारे । परंतु मागुते ब्रह्मांड भरे ।
निशी जालिया नंतरे । पुन्हा काळोखे ॥
तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्यु वाव ।
समूळ आज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥

सूर्योदय झाला की अंधार नाहीसा होतो, परंतु त्याचा अस्त झाला की काळोखाने पुन्हा सारे ब्रह्मांड भरून जाते तसे (सूर्याप्रमाणे उदयास्त – जन्ममृत्यु भोगणारा) सद्गुरू स्वामी नाही. तोच दुसऱ्याच्या आज्ञानाचा समूळ नायनाट करून टाकतो व त्याचे जन्ममृत्यु चुकवितो.

सद्गुरूचे वर्णन आपण अज्ञान्याने ते काय करावे. अज्ञानरूपी अंधकार दूर करताना ‘सत्य, स्वाधीनता आणि प्रेम’ हा मार्गा दाखविणारे असे आमचे प. पू. श्रीसद्गुरू मुकुंदवल्लभ महाराज अर्थात श्रीगुरू (देसाई) काका. स्वत: या मार्गावरून चालत असतानाच, पायी अनेक पदयात्रा करत करत जगन्नाथपुरीच्या पदयात्रेत अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांनी सगुण रूपात दर्शन देऊन त्यांना आपला कृपा आशीर्वाद दिला. ह्या अध्यात्मीक प्रवासाबरोबर अनेक क्षेत्रातील पदव्या मिळवून किर्तन ते दिग्दर्शन असा ही त्यांनी प्रवास केला आहे. स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे अत्यंत निसर्गमय परिसरात साकरलेले श्रीक्षेत्र स्वामीधाम.

स्वामीधामामध्ये वैदिक धर्माप्रमाणे आचारसंहिता राबवली जाते. ३० र् ि४० चे प्रशस्त ध्यान मंदिर स्वामीकृपेमुळे उभे राहिलेले असून इथे नामस्मरण, पारायण, यज्ञयाग हे सांघिक उपक्रम चालू असतात. आत्म्याची शुध्द शक्ती प्रगट व्हावी यासाठी एकत्र जमून सामुदायिक प्रार्थना करणे आवश्यक आहे. देवाचे क्रिडांगण स्वच्छ करणारा परमेश्वरी धर्म म्हणजेच प्रार्थना हे सांगून प. पू. काकांनी सांघिक प्रार्थनेचे महत्त्व पटवून दिले आहे. तिथे सांघिक प्रार्थना अतिशय शांतपूर्ण व उत्साही वातावरणात होते. ‘सत्य, स्वाधीनता आणि प्रेम’ ह्या तीन तत्त्वांवर उभ्या असलेल्या या स्वामीधामामध्ये जप साधनेबरोबर श्रमसेवा ही उपक्रमासुध्दा राबवली जाते.

जसे लहान मूल आईच्या कुशीत आकार घेत असते त्याचप्रमाणे निसर्गाच्या कुशीत हे स्वामीधाम आकारात येत आहेत पण हे साकारणं प. पू. काकांनी स्वामीधामापूरते मर्यादीत ठेवलेलं नाही. अतिशय गरीब, मागासलेला आदिवासी समाज या भागात आहे. जिथे लोकं मैलोन् मैल चालत जायचे, जेमतेम एखादी बस जायची तिथे काकांच्या प्रयत्नांनी व स्वामीकृपेमुळे दर दीड तासाने आता बससेवा उपलब्ध आहे. कच्च्या पायवाटेवर चालताना चिखलात गाडया अडकायच्या तिथेच प. पू. काकांमुळे डांबरी रस्ता झाला. ग्रामदेवतेने दृष्टांत दिल्यावर जुन्या पडीक मंदीराचा जीर्णोध्दार प. पू. काकांनीच केला. रानोरान भटकणाऱ्या, आचारसंहिता माहित नसलेल्या लहान मुलामुलींना काकांनी सांघिक प्रार्थना शिकवली. हीच मुले आता प्रार्थना घेतात. ७-८ कि. मी. वर असलेल्या ग्रामीण रूग्णालयामुळे बरेचदा गावातील लोकांची गैरसोय व्हायची तेव्हा स्थानीक जनतेसाठी विनामूल्य सेवा रूग्णालय प. पू. काकांनी डॉ. नाझीरकरांच्या मदतीने चालू केले आहे. दरवर्षी स्थानिक बालगोपाळांना वह्या वाटप केले जाते. आजही पिढी अतिशय नैराश्याखाली वावरते आहे, नोकरी नसलेल्या चार तरूणांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. महाप्रसादासाठी भक्तांकडूनच काय पणं तेथील स्थानीक जनतेकडुन कुठलेही मूल्य आकारण्यात येत नाही. नामस्मरणाचे महत्त्व पटवून देताना, स्त्रीही अबला नसून एक शक्ती आहे व पूजेचा समान हक्क तिला ही आहे. संध्येचे महत्त्व पटवून देताना बऱ्याच महिलांना संध्येचे योग्य मार्गदर्शन करून श्रीसूक्त, पुरूषसूक्त हेही योग्यरितीने शिकवीले आहे. अभयारण्याच्या भागात असलेल्या या स्वामीधामात – १-स्वामी प्रगट दिन, २-स्वामी पुण्यातिथी, ३-गुरूपौर्णिमा, ४-गोकुळष्टमी, ५-दत्त जयंती, ६-महाशिवरात्री हे उत्सव मोठया प्रमाणावर साजरे होतात.

अत्यंत निसर्गसंपन्न अश्या या स्वामीधामला आपण एकदा अवश्य भेट द्यावी आणि सर्वसामान्य भविक भक्तगणांकडून जमलेल्या देणगीतून साकर झालेल्या वास्तूचे दर्शन घ्यावे आणि स्वत: कार्यप्रवण व्हावे ही नम्र विनंती.

स्वामीधामाचा पत्ता
प. पू. श्रीसद्गुरू मुकुंदवल्लभ महाराज ऊर्फ श्रीगुरू (देसाई) काका महाराज संचालित
स्वामीधाम, स्वामी समर्थ सेवान्यास, मु. आगाशी,
पो. म्हसा, ता. मुरबाड, जि. ठाणे – ४२१४०२
फोन नं – ९५-२५-२४४९१३७

मुरबाड येथून दिड तासाच्या दरम्यान ऐनाचीवाडी किंवा नांदगाव बलिवरे ही एस्. टी. सेवा चालू आहे. तसेच रिक्षा ही जातात.

– सीमा पुराणिक