‘हायकू सप्तरंगी’

[राजन पोळ ह्यांच्या ‘हायकू सप्तरंगी’ ह्या आगामी काव्यसंग्रहाला(हाकूसंग्रह) जेष्ठ कवयित्री शिरीष पै यांनी लिहिलेली प्रस्तावना…….]

जवळ जवळ चाळीस वर्षापुर्वी हायकू या जपानी काव्य प्रकाराशी माझा परिचय घडून आला. तीन ओळीच्या पण कमालीच्या अर्थपुर्ण अशा ह्या जपानी काव्याने माझ्या मनावर कायमची मोहिनी घातली. हायकू मला इतका आवडला की दिवसभरात त्याच्याशिवाय मला काही सुचेना. हायकू कळला खरा पण त्यावेळी तो जुळला नाही, जमला नाही. बारा वर्षाचा काळ मध्ये जावा लागला मग अगदी अकस्मात मनाच्या एका विषण्ण अवस्थेत हायकू जमला. सुरूवातीच्या काळात मी एकामागून एक हायकू लिहित होते खरी पण त्या तीन ओळीच्या रचना म्हणजेच सगळे विशुध्द हायकू नव्हते. मुळात जपानी भाषा मला येत नसल्याने जपानी भाषेतून मी हायकूचे वाचन केले नव्हते. तर जपानी हायकूंच्या इंग्रजी अनुवादांची पुस्तके मी वाचली होती त्यांचे विशिष्ट तंत्र जाणून घेतले होते. पण पुढे कळले की आपले बरेचशे हायकू म्हणजे कविता आहेत – पण हायकू नाहीत. हायकू हे काव्य आहे पण कविता नाही हे कळायला हायकूंवरची बरीच समीक्षा वाचावी लागली. विशुध्द हायकू म्हणजे काय हे समजावून घ्यावे लागले. हायकू लिहिता लिहिता, जपानी हायकूंचा अभ्यास करता करता आपोआप उलगडा होत गेला की विशुध्द हायकू म्हणजे नेमके काय? आणि हायकू हे काव्य असले तरी ती कविता का नाही?

आपण कविता लिहितो तेव्हा आपली काव्यकल्पना आपण कवितेतून पायरीपायरीने रचीत जातो. काव्यरचनेचे नियम काही नियम कसोशीने पाळत आपण मूळचा आशय कळसाला पोहचवितो. कवितेचा आदि, मध्य, अंत हा आकृतीबंध आपण सांभाळतो. कवितेचे वृत्त, छंद, ताल आपण आटोकाट जपतो. पण हायकू ही अशी रचलेली कविता नाही- तर तो एक उत्स्फूर्त उद्गार आहे. त्याला जरी त्याचे तंत्र असले तरी ते कविते इतके कठोर नाही. मुख्यत: हायकू निर्सगाशी संबधित असला तरी मानवी जीवनाशीही तो निगडीत होऊ शकतो. निर्सगातील एखादी नाटयपूर्ण घटना हायकूकाराला इतकी विस्मयचकित करते की तो क्षणात शब्दापलीकडच्या जगात जातो, अचानक स्तंब्ध होतो आणि स्वत:शी आलीप्त होत तो समोरच्या घटनेचे प्रत्ययकारी जिवंत चित्र अशा तऱ्हेने उभे करतो की हायकू वाचणाराही त्या जिवंत घटनेचा द्रष्टा होतो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी पूर्ण झाल्यावर हायकू निर्माण होतो. कवितेत कवी व्यक्तिगत भावनांना वाट मोकळी करून देतो पण हायकूकाराच्या भावना आणि प्रत्यय हे हायकूमधील शब्दात लपलेले असतात, ते शंब्दापलीकडे गेलेले असतात. ते असतात पण दिसत नाहीत.

काही जपानी हायकूकारांनी तर हायकूंची निर्मिती करताना त्यातील धार्मिकताही जपली. झेन, बौध्द धर्मातले हायकूकार जेव्हा निर्सगातील दिव्यतेने समाधिस्त झाले, तेव्हा ज्या दृश्याने त्यांची समाधी अवस्था जागृत झाली त्या अवस्थेचे कारण असलेले निर्सगातले दृश्य त्यांनी हायकूतून जिवंत उभे केले. पण अनेकदा जपानी हायकूकारांनी विशुध्द हायकूंची पातळी सोडून काव्याची पातळी स्वीकारली आणि आत्मनिष्ठ हायकूंची निर्मिती केली, हायकूसदृश रचना लिहिली.

‘हायकू सप्तरंगी” ह्या राजन पोळ ह्यांच्या हायकूसंग्रहातील हायकू वाचीत असताना मला एका गोष्टीचा फार आनंद झाला की विशुध्द हायकूंचे तंत्र राजन पोळ ह्यांना सहज जमून गेले आहे. कित्येक मराठी हायकूकार हायकू न लिहिता कविताच लिहितात, पण ते खरे हायकू नसतात. केवळ ते तीन ओळीचे असतात म्हणून काही ते हायकू होत नाहीत. हायकू म्हणजे कल्पनेचा खेळ नव्हे तर ती एक वास्तविकता आहे. हायकूचे व्यक्तिनिरपेक्ष उद्गारात्मक स्वरूप राजन पोळ हयांना अचूक समजले आहे. उदाहरणार्थ त्यांचे पुढील हायकू पहा-

सरडा झाडावर
श्वास रोखून बसलेला
झाडासारखाचं हिरवा झालेला
इवलासा पक्षी
उंच झाडावर
पानंच पानं पंखावर
आकाशात दूर उडतोय पतंग
वारा आहे बरोबर
शेत नांगरतायत दोन बैल
मैलोन मैल
एक फूल एकटचं
फांदीवर फुललेलं
फुलपाखरांनी घेरलेलं
चंद्र वर धुरकटसा
खिडकीतुन आला
एक कवडसा
अंधा-या रात्री
अवचित आलेली सर
काजव्यांच्या बरोबर
एकटाच चालतोय
अंधा-या रात्री
आधाराला छत्री
एक झुळुक वा-याची
आली भाताच्या शेतातून
मंद वास घेऊन 
 

राजन पोळ ह्यांनी विशुध्द हायकूरचना केली आहे, तशीच उघड भावना बोलून दाखवणारी हायकूसदृश रचनाही केली आहे. पण तीही अगदी विशुध्द हायकूरचनेच्या पातळीवर पोचवली आहे इतकी ती जमून गेली आहे. उदाहरणार्थ –

रचुन ठेवलेल्या ओंडक्यांना
कळून चुकले
आपले दिवस भरले
सहज कागदावर
दोन शब्द लिहिले
त्यांचे हायकू झाले
रस्ताही शांतरात्रीचा झोपलेला
तुमच्या आमच्या ओझ्यानं थकलेला
वीज गेलीयअंधारलयं
घरकंदील शोधतेय नजर
खूप वाढलं म्हणूनउंबराचं झाड तोडलं
रात्रभर रडत राहिलं
 

राजन पोळ यांचा एखादा हायकू जरी पुढयात ठेवला तरी हायकूचा आत्मा त्यातून पूर्ण शक्तीनिशी प्रकट होतांना जाणवतो.

इवलासा पक्षी
उंच झाडावर
पानंच पानं पंखावर
हा एक हायकू जरी नमुन्याला घेतला तरी उत्कृष्ट आणि यशस्वी हायकूचे सारे गुण त्यात प्रगट झालेले दिसतात. झाडावरती खूप उंचावर एक पक्षी बसलाय आणि झाडाच्या पालवीत लोपून गेलाय. पण लोपले आहेत त्याचे ते पंख तो स्वत: दिसतोय, जाणवतोय, हे चित्र किती जिवंत, किती अचूक किती रेखीव आणि किती थोडक्यात उभे केले आहे. एकही शब्द अधिक नाही की उणा नाही. किती तालबध्द रचना आणि परिणाम साधण्याची शक्ती सर्व रचनेत ओतप्रोत भरलेली आहे. एक विशाल वृक्ष, त्यात लपलेला हा चिमुकला पक्षी आणि तरीही त्याचे इवलेसे अस्तित्व झाकोळून गेलेले नाही – हे चित्र एक जीवनसत्य आहे हे जाणवते. राजन पोळ ह्यांच्या बहुसंख्य हायकूंतून हे जीवनसत्य सूक्ष्मपणे दडलेले जाणवले. त्यांचे बहुसंख्य हायकू निसर्गातच रममाण झालेले आहेत आणि निसर्गातील सौंदर्याशी समरस, एकरूप झालेले आहेत.

कणसावर बसून
चिवचिवतात पाखरं
रानारानातून

ह्यासारख्या हायकूतून ऋतूंचे भान जागवून त्या ऋतूत निसर्गात कोणत्या हालचाली चालल्या आहेत ह्याचे मूर्तिमंत दृश्य उभे केले आहे. जातिवंत हायकूकाराच्या हायकूतून हायकूकार ऋतूमानाप्रमाणे घडणारे निसर्गातील सूक्ष्म फरक नेहमीच जाणवून देत असतो. निसर्ग आला म्हणजे झाडाफुलापानांसह पशुपक्षीप्राणीही आलेय.

झपकन् डोक्यावरून
उडाले थवे
होते ते पारवे
एक म्हैस
माळरानावर
कावळा पाठीवर
कर्कश ओरडतयं
वाटवाघूळ
फिरून फिरून गोल

ही सारी दृश्यचित्रे वाचताक्षणीच हृदयात एक असीम शांतता निर्माण करतात. हायकूतले शब्द हे शब्दच – पण तेच अंत:करणात मात्र एक नि:शब्दता उभी करतात.

राजन पोळ हे निसर्गात रममाण होतात आणि व्यवहारी जगातही भानावर असतात. या जगातल्या प्रत्यही घडणा-या घटनाही त्यांना क्षणार्धात विस्मित करून जातात –

जळाली पानं
वातावरणातल्या
प्रदूषणानें
उड्डाण पूल
शहराशहरातून
वाहनांची गर्दी अजून
लोकांना गिळून
गच्च लोकल
गेली निघून

निसर्गाच्या सान्निध्यात समाधी लागणे, तसे सोपेही आहे. पण भोवतालच्या यांत्रिक गजबजाटातही त्यांच्यातला हायकूकार स्तब्ध होऊन एखाद्या घटनेत दडलेले एक प्रत्यकारी चित्र बघतो. जगामधल्या वेदनेने त्यांचे काळीज करूणार्त होते आणि म्हणूनच हायकूंचे उद्गार त्यांच्या मनातून स्फुरतात. त्यांच्या समग्र हायकूरचनेच्या मुळाशी हा असीम करूणाभाव पसरून राहिलेला आहे.

किती सोसावे रानाने
भडकलाय वणवा
किंचितश्या ठिणगीने
खुप वाढलं म्हणून
उंबराच झाड तोडलं
रात्रभर रडत राहिलं
गोल गोल फिरून
चक्रीवादळ आलं
झाडन् झाड उखडलं

राजन पोळ ह्यांच्या हायकू काव्यरचनेतच विशिष्ट काव्यप्रतिभेला मुक्त आविष्कार सापडला. हायकू काव्याची काव्यशैली त्यांना इतकी अवगत झाली की जणु हायकूरचनेसाठीच त्यांची काव्यप्रतिभा जन्माला आली आहे. इतकी त्यांची हायकू रचना अभिजात आणि अभिनव आहे. ज्या क्षणी हायकूचा जन्म होतो तो हायकू – क्षण ते अचुक पकडतात आणि ज्या दृश्यातून त्यांना हायकू स्फुरतो ते दृश्य जसेच्या तसे मूर्तिमंत उभे करतात. त्या क्षणी कुठचे शब्द वापरावेत, ते कसे जुळवावेत, त्यांना कुठचे शब्द वापरावेत – ते कसे जुळवावेत, त्यांना कुठचा अनुक्रम द्यावा आणि अशा रीतीने हायकू जमवत असताना किती विवेक पाळावा ह्याची त्यांना पूर्ण जाण आहे. ह्या विवेकामुळे, ह्या भानामुळे, ह्या जागरूकतेमुळेच ते परिपूर्ण हायकू लिहू शकले आहेत. दोनशेच्यावर त्यांनी हायकू लिहिले आहेत. पण कुठल्याही हायकूत पूर्वीच्या हायकूची पुनरावृत्ती नाही. सदैव नाविन्य जपले आहे.

मला व्यक्तिश: तरी त्यांच्या हायकूंनी कमालीचे प्रभावित केले. आणि हाही आनंद झाली की हे हायकू अस्सल मराठी आहेत. ह्यातली हवा आणि ह्यातले जीवन मराठी मातीवरचे आहे. शुध्द जपानी हायकूत जसे जपानीपण दाटून भरलेल असते तसे राजन पोळ ह्यांच्या हायकूत मराठीपण ओतप्रोत भरलेले आहे.

महाराष्ट्रात अलीकडे काही चांगले हायकूकार प्रसन्न हायकुरचना करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेचं महाराष्ट्रात मराठी हायकू जन्माला आला आहे. हायकूंचे एक स्वतंत्र जग मराठी कवितेच्या क्षेत्रात अस्तित्वात आले आहे. त्यात राजन पोळ ह्यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांचे हायकू मराठी वाचकांना एकदम ताजेतवाने वाटतील ह्यात शंका नाही.

शिरीष पै
शराफ हाऊस, केळुसकर मार्ग,
शिवाजी पार्क, दादर, मुंबई – २८
दूरध्वनी – २४४५१५७१