मराठी कोश वाड्मय

नाटयकोश

marathinatya मराठी रंगभूमीचे अभ्यासक आणि जेष्ठ नाटय समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी तयार केलेला मराठीतला पहिला नाटयकोश निशांत प्रकाशन आणि कला प्रतिष्ठान यांच्यातर्फे ८ जानेवारी २००१ रोजी प्रकाशित झाला.

दीडशेहून अधिक वर्षांची मराठी रंगभूमी म्हणजे महासागर आहे. यातली महत्त्वाची नाटकं, नाटककार, दिग्दर्शक, प्रयोगतंत्रज्ञ, समीक्षक, नाटयनिर्माते, पडद्यामागील सहाय्यक, नाटयगृहे, नाटयसंस्था, संगीतकार यांचा समावेश कोशामध्ये केला आहे ; पण त्याचबरोबर सातशे नाटकांच्या पहिल्या प्रयोगांचे तपशील दिले आहेत. अनुवादित नाटकांचा समावेश करीत असताना ज्यांचा मराठी नाटक रंगभूमीशी कोणत्या ना कोणात्या स्वरूपाचा महत्त्वाचा संबंध आलेला आहे, अशा अमराठी नाटकार – कलाकार – दिग्दर्शक यांचीही माहिती यात दिली आहे. तसेच जे अभारतीय नाटककार आहेत आणि ज्यांच्या नाटकांचा, नाटयशैलीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मराठी रंगभूमीवर परिणाम आहे, त्यांचाही परिचय थोडक्यात दिला आहे.

संस्कृत, कन्नड, बंगाली, तमीळ, तेलगु, मल्याळम्, गुजराती, उर्दू, हिंदी, पारसी, सिंधी, पंजाबी, आसामी, उडिया, तंजावरी नाटक-रंगभूमीचा तपशील टिपणवजा स्वरुपात लिहून या कोशात भारतीय रंगभूमी हे एक स्वतंत्र प्रकरण संक्षिप्त स्वरूपात तयार झालं आहे. पथनाटय, बाल रंगभूमी, कामगार, दलित नाटक. एलिचपूरची रंगभूमी, प्रसंगनाटयं, ग्रिप्स थिएटरचा मराठीवरचा परिणाम इत्यादि अनेक अंगांनी उपयुक्त असणारी माहिती मिळवून तीही यात दिलेली आहे.

नाटयपरिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) यावर खूप बोलले जाते, पण त्याचे नेमके नियम, पध्दती याबद्दल फारच थोडयांना माहिती असते. ती सर्व माहिती प्रत्यक्ष घेऊन तपशिलासह या कोशात दिली आहे. याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या नाटकांवर कोणत्या कारणांसाठी बंदीं आली होती याचेही तपशील दिले आहेत. नाटयविषयक संकल्पनांना तर स्थान दिलं आहेच, पण नाटयप्रशिक्षण देणा-या व्यक्ती-संस्था, तसेच नाटयविषयक वस्तूंचा संग्रह करणारी माणासं, संस्था, संमेलनाध्यक्ष यांचाही अंतर्भाव आवर्जून केला आहे. पडद्यामागचे सहाय्यक, जाहिरातदार, व्यवस्थापक यांच्या नावांची सूची तयार केली. नाटयविषयक ग्रंथ, नियतकालिके आणि नाटयविषयांवरचे मराठीतले प्रबंध यांचीही यादी एकत्रित केली. शिवाय चारशेच्यावर छायाचित्रांचा यात अंतर्भाव आहे.

प्रकाशक – निशांत प्रकाशन व कला प्रतिष्ठान,अकल्पित, ३९/७ पटवर्धनबाग, एरंडवन, पुणे ४००००४. फोन ५४३४८६१

प्रमुख संपादक – डॉ. वि. भा. देशपांडे

एकूण खंड – १

पृष्ठ संख्या – १२०० पाने

किंमत – रु. १०००

मिळण्याचे ठिकाण – सौ. विनिता देशपांडे,अकल्पित, ३९/७ पटवर्धनबाग, एरंडवन,पुणे ४००००४. फोन – ५४३४८६१ आयडियल बुक डेपो, दादर, मुंबई

कोकणी विश्वकोश

१९८७ मध्ये गोव्याची राजभाषा बनलेल्या कोकणी भाषेतील पहिल्या वहिल्या विश्वकोषाचे खंड आता तयार झाले आहेत. गोवा विद्यापीठाने स्थापनेनंतर लगेचच, १९८६ मघ्ये कोकणी विश्वकोश प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पांतर्गत पहिला खंड १९९२ मध्ये शिवराम कारंथ यांनी प्रकाशित केला. दुसरा खंड १९९७ मध्ये गिरीश कर्नाड यांच्या हस्ते तर तिसरा खंड मे. पु. रेगे यांच्या हस्ते १९९९ मध्ये प्रकाशित झाला होता. चारही खडांनी मिळून चार हजार पृष्ठे असून यात एकंदरीत पाच हजार नोंदी आहेत. या नोदींच्या जोडीला सुमारे आठशे चित्रे, तक्ते, नकाशे आहेत.कोकणी विश्वकोशाचे प्रकाशन हे या भाषेच्या विकासाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. विश्वकोशामुळे कोकणी भाषेच्या विकासाला एक निश्चित आणि सुनियोजित दिशा मिळाली आहे.

प्रकाशक – गोवा विद्यापीठ

प्रमुख संपादक – डॉ. तानाजी हळर्णकर

एकूण खंड – ४

पृष्ठ संख्या – ४००० पाने चारही खंड मिळून

मिळण्याचे ठिकाण
– गोवा विद्यापीठ.