चारोळ्या – कस्तुरी

कस्तुरी
सौंदर्य न्याहळतांना आरशासमोर
नाक मुरडतांना मी तुला पाहलयं.
स्वत:च्याच सुगंधाचा कंटाळा आलेल्या
कस्तुरीचं जगणं तुझ्याही नकळत तु अनुभवलंय
– नितीन
आवाज
हो, तु म्हटल्याप्रमाणे वाटतोय,
माझा तो निर्णय चूकीचा होता.
कारण, तेव्हाही बुध्दीपेक्षा
मनाचाच आवाज निर्णायक होता.
– नितीन
आपलं
मरणाच्या यातनाही सुसह्य वाटतील
इतक्या यातना देवून गेलयं कुणी.
आपलं-आपलं म्हणतांना परक्यागत
माझ्याशी वागून गेलंय कुणी.
– नितीन
वाट
आवडणा-यांना दूर जातांना पाहण्याचा
आता अगदी कंटाळा आलांय,
हात जोडून, पापण्या ओलावून, कुणाची
वाट पाहणं, हा आता नेहमीचाच उद्योग झालांय.
– नितीन
प्रेम
प्रेम करायचं
ते वाहून जाण्यास
नसतं रहायचं उभं
ते काठावर पाहण्यास
– निनाद
विरह
केवळ तुझ्या विरहाने
भरकटल्यात दाही दिशा
उष:काल सरली तरीही
दरी अशी ही जीवनातील निशा
– निनाद
जागरण
तू येणार म्हणून
मी रात्रीलाही जागवलं
अश्रुंच्या थेंबांनी कोरडं
तलावही साठवलं
– निनाद
स्वप्नं
स्वप्नेही क्षणभंगूर वाटतात
जेव्हा ती खोटी ठरतात
पण अशावरच तर
आपली मने बेतलेली असतात
– निनाद
एकटेपण
प्रेम वगैरे कवितेतून
ऐकायला बरं वाटतं
प्रत्यक्षात कोणी कोणाचं नसतं
जगात आपण एकटेच असतो
– नीता सोहनी
तडा
विश्वासाला तडा गेल्यावर
काही नातंच उरत नाही
तरीपण विश्वास ठेवावाच लागतो
नाहीतर जगण्याची आसच राहात नाही
– नीता सोहनी
तू नं मी
अस्तित्त्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही
सगळं कळतंय मला, पण,
तुला सोडून दूर ही जाववंत नाही
– नीता सोहनी
बंधन
प्रेमाला काळ, वेळ, वय, स्थळ
कसलंच बंधन नसतं
तरीपण प्रेम हे एक बंधन असंतं
असं जग का म्हणतं?
– नीता सोहनी
प्रेमा
प्रेम वगैरे कवितेतून
प्रेम काय आहे
ते तुझ्याकडून शिकलो
नाही नाही म्हणता,
मीच तुझ्या प्रेमात पडलो
– प्रशांत म्हसकर
डोळे
डोळे लावून बसलो होतो वाटेकडे
तू आता येशील तेंव्हा येशील
तू शेवटपर्यंत आलीच नाहीस
तुझी वाट बघतच राहीलो, तरीही…
– प्रशांत म्हसकर
तू
अस्तित्त्वाची किंमत
तू नसतेस तेंव्हा तुला आठवत असतो
तू असतेस तेंव्हा स्वत:ला विसरतो
तू नसताना तुझ्याशी बोलत असतो
तू जवळ असताना मी अबोल असतो
– प्रशांत म्हसकर
कविता
कविता सुचायला
निराळीच धुंद लागते
तुझ्या आठवणींसोबत
वा-याची झुळुक मंद लागते
– प्रविण देशपांडे
आठवण
तुझ्या आठवणीला
मी देत नाही थारा
तरी ती करत असते
तुझ्या अस्तिवाचा मारा
– प्रविण देशपांडे
महत्व
महत्व नसते मला
तू जवळ असलीस की
पारा वाढतो माझा
नुसतं कोणाजवळ बसलीस की
– प्रविण देशपांडे
भावना
आठवते मला, मी
तुझ्या मांडीवर निजलेलो
ओशाळ तुझ्या भावनांनी
भान हरपून भिजलेलो
– प्रविण देशपांडे
हे असे का घडते?
हे असे का घडते?
नकळतच प्रीत जडते
क्षणात मन पराधीन होते
पण जिच्यासाठी मन झुरते
तिचे मन कळताच आपले मन क्षणार्धात तुटते
– संतोष परब
माझी कधी होशील?
स्पर्शात कधी सांगशील मनातल्या भावना
सत्यात कधी येशील, सांगना…
तुझ्या प्रितीचा गंध दरवळे भोवताली सदा
माझी कधी होशील?- सांगना…
– संतोष परब
सहवास
कसा, कधी, केंव्हा, कुठे?
गुंतलो मी कळत नाही
नकळत जडलेली प्रीत अवगत नाही
कोणास ठाऊक हे सत्य आहे की आभास?
तरीही वाटतो, तुझा हवाहवासा सहवास
– संतोष परब
आज
आज असतं
तर उद्या नसतं
नात्यासारखं अनित्य
काहीच नसतं
– जयंत खानझोडे
त्याग
माझा त्याग मोठा की,
तुझा त्याग मोठा?
अरे, ज्याचा त्याग मोठा,
त्याचा त्यागच खोटा!
– जयंत खानझोडे
चारोळया
‘कविता’ तूला ब-याच वेळा
एकांतात भेटतो
तुझ्या माझ्या गप्पा मधून
‘चारोळया’ लिहितो
– पोपट कोरे
वात्रटिका
लाच दिल्याशिवाय
पुढं पेपर सरकत नाही
म्हणे, या हाताचे, त्या हाताला
कधीच कळत नाही

एकमेकास सहाय्य करू
एक कोटीचे टारगेट करू
आळी, मिळी गूप चिळी
वरच्यानांच कमिशन मिळी

निवडणूक आल्या की
यांना ‘राम’ आठवतो
सेनेचा ‘बाण’
कमळाला फुटतो ‘घाम’

जाती-जातीचे राजकारण
यानां लागलयं सत्तेच ग्रहण
शिवशक्ती, भिमशक्ती
एकत्र आणण्याचे धोरण

खड्डेच, खड्डे चोहीकडे
त्यात पावसाची भर पडे
‘पालीकेला’ त्याचे काय
गरिबांचे हाल गडे

लोक जातीसाठी
‘माती’ खातात
सरकारी नोकर
‘दाखल्या’ साठी
पैसे खातात.
– पोपट कोरे