चारोळ्या – आई

आई
उपेक्षेच्या उन्हात वठणारं वार्ध्यक्य
पाहून काळजात एक कळ उठते
रस्त्यावरच्या प्रत्येक म्हातारीत मग
मला माझी आई दिसते
– यतीन सामंत
माणूस
फांदीवरची नग्नता ते कपडयातली सभ्यता
होता हिंस्त्र जंगलातून श्वापदांचा प्रवास
पाशवी या कल्लोळात कधी कळलंच नाही
माकडाचा या कसा काय झाला माणूस?
– यतीन सामंत
आयुष्य
आयुष्य उजळायला लागत नाहीत
प्रचंड सूर्याच्या प्रखर वाती
मनाच्या उबाऱ्याला होतात पुरेशा
ओंजळीत जपलेल्या इवल्या ज्योती
– यतीन सामंत
प्रेम
प्रेमाचा शिडकावा असा
उगा आभाळातून होत नसतो
जीवाचा जीवलग जोडायला
जीव आधी लावावा लागतो
प्रेमाचा मळा बहरून यायला
जीवाभावाने तो शिंपायला लागतो
– यतीन सामंत
दक्ष
आपण सारीच भली माणसं
मुद्दाम कुणा दु:ख देत नसतो
पण कुणा आनंदाचं कारण व्हावं
म्हणून कधी दक्षही नसतो
– यतीन सामंत
ध्येय
पाण्यासारखं कुठलंच पेय नाही
गाण्यासारखं दुसरं गेय नाही
कुणा आनंद-इंद्रधनुचे रंग व्हावे
यापरतं आयुष्याचं ध्येय नाही
– यतीन सामंत
जग
जग धावताना
जगात धावताना
जग नाही भावलं
म्हणून माझं मन
आणखी वेगानं धावलं
– मकरंद मनगोळी
छत्री
मी मुद्दाम छत्री आणत नाही
आज पाऊस येणार म्हणून
मला भिजताना पाहिल्यावर
तू छत्रीत घेणार म्हणून
– दिनेश कुटे
नातं भावासारखे तर नक्कीच नाही
मित्रापेक्षा भरपूर जास्त
नव-यापेक्षा तर खूपच कमी
काय नाव देऊ आपल्या नात्याला
– अनिल कदम
काय सांगू तुला काय माझ्या मनात
म्हटलं एकदा सांगू तुझ्या कानात,
जे प्रेम तू मजला दिलंस
ते व्यक्त करू कसे शब्दांत
त्यासाठी मी राहीन
उतराई जन्मभर आज.
– दिनेश सहदेव तर्फे
भार पाणावलेल्या डोळयांनी मनाशी
उगाच अशी खंत केली
‘आसवांचा भार आम्हीच का वाहायचा?
किंचित हसून मन म्हणे,
‘स्वप्नं कुणी पाहिली होती?’
– ओमप्रकाश देशमाने
आर्जव डोळयांतून कळले मला
तुझ्या मनातील भाव
आता तरी प्रियकरा,
माझ्या नवसाला तू पाव
– मीनल जोगळेकर