स्वप्न
स्वप्नात तू येशिल
असे स्वप्नात नव्हते वाटले
ज्या स्वप्नी तू आलिस
ते स्वप्न मी स्वप्नात पाहिले.
– तुषार खेर |
अश्रू
नेत्रातून निसटून, गालावरुन गळून,
हृदयांच्या जखमांवर प्रेमाने हात फिरवून
सांत्वन आमचे केले
आभार तुमचे अश्रूराजे.
– तुषार खेर |
रात्रं दिवस
दिवसा नंतर रात्र
रात्री नंतर दिवस
ह्याचे स्मरण सर्वांस
असावे रात्रंदिवस.
– तुषार खेर |
प्रीत
जरी तू दूर आहेस माझ्यापासून
परि तुझी प्रीत हृदयाजवळ भासते
जरी प्रीत लपविलीस माझ्यापासून
तुझी उणीव मला क्षणोक्षणी त्रासते.
– तृप्ती पाटील |
आठवणी
प्रेमाच्या नगरी जाऊया आपण
प्रेमाचे गीत गात-गात
प्रत्येक आठवणींना साठवूया आपण
आपल्या एकमेव हृदयात
– तृप्ती पाटील |
नशिब
आपल्या नशिबात जर एकत्र यायचं असेल
तर, कसेही करुन एकत्र येऊ आपण
जर नशिबालाच हे मंजूर नसेल तर,
हृदयात जपून ठेऊया प्रत्येक आठवण
– तृप्ती पाटील |
चाहूल
डोळे तुझे पाहताच, मला
चाहूल लागते तुझ्या मनाची
अश्रू वाहूनी सांगतात मला
तुझ्या मनात लपलेल्या प्रेमाची
– तृप्ती पाटील |
साथ
तुझ्या प्रेमाची साथ मला आयुष्यभर पाहिजे
तुझ्या प्रितीची सावली मला जीवनभर पाहिजे
कितीही दु:ख मिळाले तरी चालेल मला
पण कधीच राहू शकणार नाही मी सोडून तुला
– तृप्ती पाटील |
आयुष्य
तुझ्या प्रेमाला मिळवून
अर्धे आयुष्य मी जगले
पढचे अर्धे आयुष्य मिळे ना मिळे
अर्ध्या आयुष्यात पूर्ण आयुष्य मी जगले
– तृप्ती पाटील |
स्वप्न
आजकाल स्वप्ने पहायला मन धडधडते
कारण स्वप्ने खूप छळतात या मनाला
स्वप्ने पहायला खूप सोपी वाटतात
पण तितकीच अवघड असतात ती पूर्ण व्हायला
– तृप्ती पाटील |
वक्ते
आकाशात ढग जमतात तेव्हा
कोकिळा मौन पाळतात
कारण, तिथं कोकिळा नाही
बेडूक वक्ते असतात
– दीपक शिंगण |
पुतळे
चौकाचौकात आज
पुतळे उगवतायत
वाढलेल्या गवतातून
बिचारे डोकावतायत
– दीपक शिंगण |
आरसा
मला नेहमी वाटतं
आरसा व्हावं
तू माझ्यात पाहताना
तूला न्याहाळावं
– दीपक शिंगण |
विसरतो
तुझ्याबरोबरचा तो दिवस
मला आजही आठवतो
तुला विसरायचं ठरवलंय
पण, तेच विसरतो दीपक शिंगण
– दीपक शिंगण |
प्रयाग
जाण्याआधीचे काही क्षण
डोळे येतात भरून
जीवन जगताना प्रत्येक क्षण
जगावा समरसून – दीपक शिंगण |
माणसं
देवळात जाताना माणसं
बरोबर फुलं नेतात
येताना जुन्या ठेऊन
नव्या चपला आणतात
– दीपक शिंगण |
चिठ्ठी
परवा तू दिलेली चिठ्ठी
मोठया आशेने वाचली
खरं सांगू, मला ती
जिन्नसांची यादीच वाटली
– दीपक शिंगण |
दात
आजी म्हणाली
मलाही चणे दे
आणि हो कपाटातले
दातंही दे
– दीपक शिंगण |
आठवलं
परवा एकदम आठवलं
मला बाजारातून परतल्यावर
खरेदीसाठी मी तुलाही
नेलं होतं माझ्याबरोबर
– दीपक शिंगण |
गंध
आता प्रत्येक श्वासाला येतो
तुझ्या आठवणीचा सुगंध ।
मनाच्या अंगणात सदा बहरतो
तुझ्या प्रेमाचा निशिगंध ॥
– दीपक शिंगण |
जीवन
मला अजूनही समजत नाही
जीवन म्हणजे ‘तडजोड’ आहे ।
पाण्याबाहेर तडफडणा-या माशाची
श्वास घ्यायची ‘धडपड’ आहे ॥
– दीपक शिंगण |
चित्र
कित्येक दिवस ठरवित होते
तुझं ‘चित्र’ काढायचं ।
चित्रासमोर उभं राहून
आपलंच ‘प्रतिबिंब’ न्याहाळायचं ॥
– दीपक शिंगण |
प्रेम
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,
गुलाबांचं जणू ‘रान’च असतं ।
सुवास धुंद करीत असतो,
काटयाचं मात्र ‘भान’ नसतं ॥
– दीपक शिंगण |
|