चारोळ्या – जगणं …

जगणं …
जगणं सर्वांनाच जमतं असं नाही,
वास्तव आणि कल्पनांचा तो खेळही बनतो.
रोज हक्कांची जाणीव
आणि कधीतरी कर्तव्याशी मेळ जमतो.
– आदिती
ओळख …
तुझी माझी ओळख कुणी नव्याने
करून दिली तर माझा होकार
मिळवताना तुला … पुन्हा तितकाच
त्रास सहन करावा लागेल ना?
– आदिती
आठवण …
एकांतात असा कधी
तुझ्या आठवणींचा पूर येतो.
उन्हाच्या कवडशालाही तेंव्हा चांदण्याचा नूर येतो.
– आदिती
तू …
तू माझा असण्यापेक्षा,
मी तुझी असणं माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे.
तुझं कधीही स्वागतच होईल हृदयात
जागा फक्त तुझ्याचसाठी आहे.
– आदिती
बाजार …
प्रेम हया गोंडस नावाखाली
हल्ली लोक काहीही खपवतात. ‘
भावनेला किंमत दे’ असं म्हणत –
शरीराचा बाजार भरवतात.
– आदिती
तुझं फसवं रूप …
तुझं फसवं रूप मला कळत नाही
असं नाही मीच मुकेपणी सोसायचं ठरवलंय.
नाहीतर तुझ्या मुखवटयाला तितकाही मान नाही.
– आदिती
कन्फरमेशन
सरकारी कागदांना,
रबर स्टॅम्पचं कन्फरमेशन
प्रेमाच्या बोलांना,
शपथांचं कन्फरमेशन
– अभिजीत
लग्न-संसार
लग्नाच्या मंडपात,
लोकं काय म्हणतात?
संसाराच्या जाळयांत,
दोन मासे अडकतात!
– अभिजीत
मिलन
‘व्हॅलेंन्टाईन’च्या चंदेरी चांदण्यात,
मी मुक्त झालो
माझं शरीर तुला देऊन,
मी आता तुझाच झालो
– अभिजीत
वाढदिवस
वाढदिवसाच्या गलबलाटात
तुझे डोळे मला शोधतात
शोधून शोधून तेही थकतात,
त्यातले अश्रूं मलाच भेटतात
– अभिजीत
तुझ्या आठवणी तुझ्या आठवणीच्या पानाचा प्रत्येक कोपरा
मी दुमडून ठेवतो आणि पुस्तक उघडल्यावर वाचायला सुरवातही तिथुनच करतो ! – अर्पित
दैव दैवही माझ्यावर
असं का रागावलंय
जे मला आवडलं
ते नेहमी हिरावलंय ! – अर्पित
अपवाद
निर्जीव दगडाचाही आकार बदलतो
‘कायमचं’ काहीच टिकत नाही,
मग तूच एक नियमाला अपवाद
बोलतही नाहीस, बदलतही नाहीस
– अनघा
मार्ग
तुझं बरं आहे रे,
एकदा फक्त बोट दाखवलंस
मला मात्र दाखवल्या रस्त्यावर
चालत राहणं भाग आहे
– अनघा
क्षण जाण्याआधीचे काही क्षण
डोळे येतात भरून
जीवन जगताना प्रत्येक क्षण
जगावा समरसून
– अनुज
प्रेम दोघांमध्ये तिस-याचा
नेहमी त्रास होतो
उभारणा-या प्रेमाचा
तिथेच -हास होतो
– आकांक्षी
नाका नाक्यावरचं सारं
नाक्यावर विसरायचं
नाका संपला कि
नाकासमोर चालायचं
– आकांक्षी
वेडा प्रवाहाविरूध्द जाणा-याला
वेडा म्हणून हिणवायचा
भविष्यात त्याच्याचं नावाचा इतिहास म्हणून घोकायचा
– आकांक्षी
फुलं
बागेतली फुलं
बघ कशी डोलतात
मला वाटतं ती
तुझ्याविषयीच बोलतात
– अनिरूध्द भाले
आठवण
तशी प्रत्येक आठवण
तुझी गोड असते
येणारी प्रत्येक आठवण
पुढील भेटीची ओढ असते
– अनिरूध्द भाले
हर्ष
माझ्यापेक्षा त्या पावसाला
अधिक हर्ष झाला
एवढया दुरून येऊनही त्याने
माझ्याआधी तुला स्पर्श केला
– अनिरूध्द भाले
पाऊस
पावसातील तुझा विरह
यावेळी खूपच लांबलाय
वाट बघुन पाऊस सुध्दा
डोळयांत येऊन थांबलाय
– अनिरूध्द भाले
जगात
तुला बघताच
मी तुझा झालोच
अगं वेडे त्यासाठीच
तर मी या जगात आलोच
– अनिरूध्द भाले
चांदण
आजही चांदण
मला दिसलच नाही
तुझ्या विरहामुळे कदाचित
ते हसलंच नाही
– अनिरूध्द भाले
वाट
तुला असंच बघायच होतं
माझी वाट बघतांना
काही क्षण का होईना
माझ्यासाठी जगतांना
– अनिरूध्द भाले
सोबत
खुप बोलायचय तुझ्याशी
पण तू साक्षातच येत नाहीस
तुझी आठवण सोबतच असते
विसरायचं लक्षातच येत नाही
– अनिरूध्द भाले