दीपावली

deepawali आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत जो महोत्सव असतो तो दिवाळी किंवा दीपावली या नावाने साजरा करतात. दीपावली हा दिव्यांचा सण आहे. मातीच्या पणत्यांमध्ये तेल-वात घालून जागोजागी ते लावून दिवाळी साजरी केली जाते. साधारणत: चार दिवस हा सण साजरा केला जातो.

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी) गुरुवार, ९ नोव्हेंबर २०२३

vasubaras वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पध्दत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून चाफ्याच्या फुलांची माळ त्यांच्या गळयात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३

dhanteras धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतक-यांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडूची व शेवंतीची फुले वापरतात.

या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. ह्या दिवशी संध्याकाळी थोडी कणीक घेऊन त्यांत थोडे तेल व हळद घालून एक दिवा करतात. तो दिवा अंगणात मुद्दाम दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. ह्याला ‘यमदीपदान’ असे म्हणतात. मृत्यूची देवता यमराज – याची अवकृपा होऊ नये म्हणून त्याच्या नावाने दीप ठेवून त्याला हळद-कुंकू वाहून त्याची पूजा करतात.

व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठया उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी) रविवार, १२ नोव्हेंबर २०२३

narak chaturdashi आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले.

ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी देवाची पूजा देखील सूर्योदयोपूर्वी करतात. स्नानानंतर घरातील सर्व मंडळी फराळ करतात. फराळाच्या पदार्थांमध्ये चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनरसे, चिरोटे इ. पदार्थ प्रामुख्याने असतात.

या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृध्दी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

दीपावली – लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या) लक्ष्मी पूजन मुहूर्त : रविवार, १२ नोव्हेंबर २०२३, संध्याकाळी ०५.५९ ते रात्री ०८.३३ पर्यंत

lakshmi poojan या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की फार पूर्वी बळी नावाचा राजा होऊन गेला. तो खूप श्रीमंत व पराक्रमी होता. त्याने पराक्रमाच्या जोरावर सर्व पृथ्वीची भूमी जिंकून घेतली होती. त्याच्या वाढत्या समृध्दीने देवांना व प्रत्यक्ष लक्ष्मीला सुध्दा अस्वस्थता निर्माण झाली. बळी राजा अत्यंत दानशूर होता. ही गोष्ट जाणून श्री विष्णूने वामनाचे (अत्यंत बुटक्या ब्राह्मणाचे) रूप धारण करून बळीराजाकडे तीन पावले टाकण्यापुरत्या भूमीचे दान मागितले. प्रत्यक्षात मात्र जेव्हा वामनाने एक पाऊल टाकले तेव्हां तो मोठा मोठा होत गेला व एका पावलात त्याने पृथ्वी व आकाश व्याप्त केले, दुस-या पावलात पाताळ व्याप्त केले व तिसरे पाऊल टाकण्यासाठी जागाच उरली नाही म्हणून बळीचे त्याचा माथाच पाऊल ठेवण्यासाठी पुढे केला. विष्णूने त्याच्या माथ्यावर पाय ठेवल्यावर बळी पाताळात गाडला गेला व सर्व देवतांची सुटका झाली. लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले. याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.

व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, मोत्यांचे दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. ह्या पूजेकरिता झेंडूची फुले, बत्तासे, लाह्या, धणे, गूळ, हळद-कुंकू, अगरबत्ती इ.साहित्याची गरज असते. ह्या दिवशी झेंडूच्या फुलांचे तोरण करून दरवाज्याला लावतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते अशी धारणा असल्याने पुष्कळ ठिकाणी लोक या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

दिपावली पाडवा (कार्तिक शुध्द प्रतिपदा) मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३

diwali padwa या सणामागील पौराणिक कथा ‘लक्ष्मीपूजन’ या सणाच्या मागील कथेशी संलग्न आहे. बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदा होय. तेव्हापासून दानशूर बळीराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. ह्या दिवशी सकाळी केरवारे काढून अंगण स्वच्छ करून अंगणात शेणाची बळीची प्रतिकृती करतात. हळद-कुंकू वाहून तिची पूजा करतात. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला तबकांत ओवाळणी घालतो. ओवाळणी म्हणून साडी, दागिना किंवा कोणतीही जरूरीची वस्तू देतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.

भाऊबीज-यमद्वितीया (कार्तिक शुध्द द्वितीया) मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३

bhubij या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

या दिवशी भाऊ विवाहित बहिणीला भेटायला जातो. अविवाहित बहिण भावंडे आई-वडिलांबरोबर एकत्र रहाण्याची पध्दत आहे. भाऊ बहिणीकडून ओवाळून घेतो. आपल्या ऐपतीनुसार तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.

या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.