पावसाळा संपतो त्यावेळी ऑक्टोबर-नोव्हेंबरात नदीनाले झुळझुळ पाण्याने वाहत असतात. हे पाणी वाहून वाया जाते. ते पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याचे हे सोपे तंत्र आहे. खूप कमी खर्चाचे आहे. त्यासाठी इंजिनियर लागत नाही. वनातील बंधारा बांधण्यासाठी सरकारची परवानगी लागत नाही. सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात वाळू अथवा माती भरायची. पोत्याचे तोंड शिवायचे. घराची भिंत बांधताना विटा बांधकाम ज्या पद्धतीने करतात त्याप्रमाणे पोटी रचायचा. पोत्याच्या काळ्या मातीचा थर देऊन बुजवल्या की झाला वनातील बंधारा तयार.
गेल्या २० वर्षापासून या बंधार्याची चळवळ महाराष्ट्रात सुरु झाली आहे. शंभर पोत्यांपासून १० ते २५ हजार पर्यंतचा बंधारा बांधता येतो. बंधारा हा तात्पुरता टिकणारा असला तरी कमी खर्चाचा व जास्त उत्त्पन्न देणारा आहे. या बंधार्यात वाहून जाणारे पाणी अडते. हे पाणी जमिनीत मुरून विहिरीतील पाण्याची पातळी टिकते. शेतीची व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होते. गुरांना प्यायला पाणी मिळते. बंधार्यातून आसपासच्या शेतीसाठी पाणी वापरता येते. एक नाला व नदीवर अनेक बंधारे बांधता येतात. एक बंधार्याच्या पाण्यातून दोन तीन एकर शेतीला पाणी मिळून शेतकरी दीड लाखापर्यंत उत्पन्न काढू शकतात. ५०० पोत्यांच्या एका बंधार्यासाठी पोत्यांचा खर्च अवघा ५०० रुपये येतो. मात्र बंधारा बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी श्रमदान करण्याची गरज आहे. दुष्काळाचे दोन प्रकार आहेत. एक नैसर्गिक दुष्काळ आणि मानवनिर्मित दुष्काळ. सागरी प्रदेशात मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले नाही तर पाऊस लांबतो. अथवा त्यावर्षी दुष्काळ पडतो. त्याला नैसर्गिक दुष्काळ म्हणतात. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विनाशातून मानवनिर्मित दुष्काळ निर्माण होतो. त्यात वृक्षतोड, चराऊ कुरणांचा र्हास, पाण्याची उधळपट्टी, पाणी मुरण्याची नैसर्गिक यंत्रणा थांबवणे, वाढते प्रदूषण व त्यामुळे वाढते तापमान आहे. हवामानात धोकादायक बदल होत आहेत. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा परिणाम नैसर्गिक संतुलनावर होत आहे. प्रत्येक गावात प्राचीन काळापासून जलसंचायाची कामे झाली आहेत. त्यामुळे वनातील बंधारे निर्माण करण्याची गरज आहे. बंधारे बांधण्याचे विविध पर्याय आज उपलब्ध आहे.
अनघड दगडाचे बांध :
पाणलोटातील डोंगरमाथ्यावरून ओघळीची सुरवात होते. या ओघळीद्वारा वाहून जाणारे माती व पाणी अडविण्यासाठी ओघळीच्या आकाराप्रमाणे अनघड दगडाचे बांध घालतात. हे बांध आकाराने छोटे असतात. २ ते ३ मीटर लांब व जास्तीत जास्त एक मीटर उंचीचे हे बांध अनघड दगड एकमेकांवर सांधेमोड पद्धतीने रचून बांधले जातात. त्यांच्यामुळे पाणी वाह्ण्याचा वेग कमी होतो. वाहून जाणारे पाणी अडून राहते.
मातीचे नाला बांध :
एक मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या आणि १५ मीटरपेक्षा कमी रुंद असणाऱ्या नाल्यावर मातीचे नाला बंध घालतात. ह्यासाठी नाल्याच्या तालाचा उतार ३ टक्क्यांपेक्षा कमी असावा. मातीच्या नाला बांधामुळे जमिनीची धूप थांबते. बंधापासून १ ते २ कि.मी. च्या परिसरातील विहिरीच्या भूजल साठ्यात वाढ होऊन बागायती क्षेत्र वाढते. तसेच पाणवहाळ क्षेत्रातून वाहून आलेला गाळ खतासारखा वापरता येतो.
वळण बांध :
नाल्याच्या प्रवाहातून वाहणारे पाणी अडवून ते शेतात वळविण्यासाठी वळण बांधांचा उपयोग होतो. वळण बंधांचे संपूर्ण बांधकाम अनघड दगडाचे १:५ या प्रमाणात सिमेंट व वाळू या मिश्रणाने करतात. उघड्या भागात पॉईटिंग करतात व वरच्या बाजूस १० सेंमी जाडीचे १:२:४ सिमेंट कॉंक्रीटचे कोपिंग करतात. साठलेले पाणी शेतात वळवण्यासाठी बांधाच्या खालच्या बाजूंला ६० सेंमी. जाडीची दगडी भिंत बांधतात. तेथून नाल्याचे दोन्ही काठ खाडून शेतात पाणी वळवितात.
सिमेंट नाला बांध :
काळ्या आणि खोल जमिनीतील नाल्यावर सिमेंट नाला बांध बांधला जातो. अशा बांधा शेजारची जमिन पाणी धरून ठेवणारी नसावी. सिमेंट नाला बांधामुळे सभोवतालच्या विहिरींच्या पाणी साठ्यात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होते. एकूण बागायती क्षेत्रात २५ टक्के वाढ होते. पाणी जास्त जास्त दिवस टिकून राहत असल्याने पावसाळा संपल्यावर पिकांना पाणी देता येते. मात्र हे बंधारे खर्चिक आहेत.
भूमिगत बंधारा :
ज्या नाल्यामध्ये वाळूचा थर १ मी. पेक्षा जास्त असेल अशा नाल्यातील पाणी जमिनीत मुरवण्याकरिता भूमिगत बंधार्याचा वापर करतात. नाल्याच्या पत्रातील वाळू उकरून जमिनीच्या पक्क्या खडकापर्यंत खोदाई केली जाते. खोदलेल्या भागात खाली माती घालून त्यावर पाणी मारून व धुम्मस करून ठराविक घनता आणण्यासाठी दबाई केली जाते. ही माती नाल्याच्या तळापर्यंत भरतात. अशा भूमिगत बंधार्यांमुळे नाल्याच्या लगतच्या क्षेत्रात पाणी मुरते. त्याचा फायदा शेजारच्या विहिरींना कायमस्वरूपी होतो. पाणी वाळूमध्ये व कच्च्या खडकात जमिनीखाली असल्याने बाष्पीभवन होत नाही. उपलब्ध पाणी पूर्णपणे वापरता येते.
पडणारा पाऊस हा आपणास मिळणारा निसर्गरूपी वरदान आहे. हे जपण्यात आणि संवर्धन करण्यात आपले चिरंतन कल्याण आहे. जलपुनर्भरणाचे अनेक उपक्रम राबविले जातात. पावसाचे पाणी विहिरीत सोडले जाते. तळी आणि तलावात वळवले जाते. आपल्या घरावरील छताचे पाणी खाली वाहून जाते. हे छताचे पाणी पन्हाळी लावून एकत्रित पद्धतीने पावसाचा प्रत्येक थेंब आपण जपला, पाण्याचा आदर राखला तर दुष्काळ व जलटंचाईचे संकट कधीच उद्भवणार नाही.ळ खाटेवर करून ते पाणी सांडपाणी किंवा कपडे धुण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणजे तेच पाणी २ ते ३ वेळा वापरले जाऊ शकते.
– अमोल मारुती निरगुडे