तुझ्या गावात आमची एस् टी शिरली तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. मला मान्य आहे की एखाद्या गावाच्या पहिल्यावहिल्या दर्शंनासाठी दुपारची वेळ बरोबर नाही. नव्या गावात शिरावं ते अगदी उजाडताना किंवा दिवेलागणीला. पण सगळयाच गोष्टी आपल्या हातात थोडयाच असतात !
चंद्रभागेच्या पुलाची रूंदी इतकी मोठी की समोरून दुसरी बस येत होती तोपर्यंत आम्ही ताटकळत विचार केला की तेवढया वेळात चंद्रभागेचं दर्शन घ्यावं. पात्रात पाणी अगदीच कमी. उरलेले पात्र.. वाळू आणि माणसांनी केलेली घाण. दोन चार जनावरे पात्रातच पाण्याजवळ उभी केलेली, एक टाटा सुमो. उथळ पाण्यात डुबकळया मारणारी पोरे, इतस्त: वाळत घातलेले कपडे, त्यातच मधूनच जाणवणारा भगवा रंग… तेव्हां विठोबा, नेमके सांगायचे तर तुझ्या गावाचे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते.
आमची बस पूल ओलांडून गावात शिरली अन् एका ठिकाणी थांबली. मला जे दिसेल ते बघण्याचा साठविण्याचा प्रयत्न सुरूच होता. का म्हणशील तर आतून काहीतरी जाणवत होते अन् ते बाहेरच्या दृश्याशी विसंगत होते. खरं तर विठ्ठलराव, आपल्या प्रत्यक्ष भेटीचा योग अजून आलेला नाही. पण तसं तरी कसं म्हणता येईल? दुर्गाबाईंच्या, दिवामोकाशींच्या साहित्यातून भेटलेला तुकारामाच्या अभंगात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे वावरणारा तो तूच होतास की, त्या गावातल्या पहिल्या थांब्यावर दोन चार उतारूंची चढउतार झाली. पलिकडच्या बाकावर एक वारकरी येऊन बसला. बसमधली इतर दोन चार डोकी त्याच्या परिचयाची होती. त्यांच्याबरोबर मुलाबाळांची चौकशी, हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर तो जागेवर येऊन बसला. विठूमाऊली, तुमचा हा भक्त आहे तरी कसा म्हणून नीट बघितलं, फाटकं धोतर, मळकी पैरण, रबरी चप्पल, डोईला रंग विटलेले मुंडासे, गळयात माळ आणि काठीला गुंढाळलेले भगवे निशाण. त्याला निशाण म्हणणे जरा धाडसाचेच होते. बर त्या निशाणाचा भगवा रंग इतका विटला होता की तो पांढराच वाटावा, म्हणजे ही वारकऱ्याची विजयपताका की नियतीपुढच्या शरणागतीचे निशाण असा संभ्रम पडावा. पण खरी गंमत पुढेच होती. जागेवर बसल्यावर त्याने हरिपाठाच्या अभंगांची एक छोटीशी पुस्तिका काढली आणि वाचायला सुरवात केली. मी त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बघत होतो. त्याची तन्मयता इतकी होती की त्याला आजूबाजूचे अजिबात भान नव्हते. त्याच्याकडे बघता बघता माझा संभ्रम हळुहळु कमी होतोय असं वाटायला लागलं.
बस गावात शिरली अन् आणखीनच मजा झाली, दोन चार सरकारी कचेऱ्यांच्या इमारतींना नावे….’मुक्ताई निवास’, सोपान निवास’… माझ्या मनातले चित्र अगदी स्वच्छ झाले. आजूबाजूची अस्वच्छता, कलकलाट, गजबज अजिबात जाणवेनाशी झाली. या सगळयाच्या मागे उभे असलेले तुम्ही विठ्ठलपंत, प्रत्यक्ष दिसायला लागतात. अन् तुमच्या चोखामेळयाचीच भाषा वापरायची तर
‘गाव डोंगा परी, भाव नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ॥’
हे आता कुठेतरी जाणवले. तेंव्हा Mr. Vitthal, प्रत्यक्ष भेटीचा योग कधी येईल ते तुमच्यावरच अवलंबून आहे. का vitthal@pandharpur.com वर इ- मेल टाकू ? तुम्ही म्हणाल तसं !
– अनिल बोकील