माणसातले मी पण ही एक अशी गोष्ट आहे की जी योग्य रीतीने तिचा उपयोग झाला तर माणसाला कुठे एका उच्च पदावर बसवते पण जर त्याचा योग्य उपयोग झाला नाही तर रसातळाला आयुष्य जाते.
हे मी पण असते तरी काय? प्रत्येकाला वाटत असते की अमुक आहे. मी तमुक आहे लोकांनी मला असं वागवायला पाहिजे, तसं वागवायला पाहिजे. पण मी कोण आहे? किंवा मी कसा आहे? हे इतरांपेक्षा आपले मन आपल्याला चांगले सांगू शकेल कारण लोक राग येऊ नये म्हणून खोटी स्तुती पण करतात परंतू आपले मन हा एक स्वच्छ आरसा असतो. ज्यात आपले खरे प्रतिबिंब आपल्याला पहायला मिळते कधी कधी इतरांच्या चांगल्या गुणाविषयी एखाद्याला हेवा, मत्सर वाटतो का? कारण त्याच्यामध्ये ते चांगले गुण नसतात पण हा हेवा किंवा मत्सर वाटून घेण्यापेक्षा त्याच्यातील चांगले गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न केला तर? कारण प्रत्येकात प्रत्येक गुण नसतो असे नाही फक्त चांगले किंवा वाईट या गुणांचे प्रमाण कमी जास्त असते. कारण मनुष्य स्वभाव हा काही कुठे फारसा वेगळा नसतो. फक्त त्यात असणाऱ्या गुणांचे प्रमाण कमी जास्त असते.
जेव्हा आपण इतरांना उपदेश देतो तेव्हा आपण जो उपदेश देतो. त्याचे आपण स्वत: खरोखरीच पालन करतो का? ही बाब खूप महत्वाची असते. कारण आजकाल खूप साधूसंत, किर्तनकार आपल्या किर्तनातून प्रवचनातून इतरांना उपदेश देतात की तुम्ही संपत्ती ऐषोआराम या सर्व गोष्टीचा मोह त्याग करा. पण ते स्वत: काय करतात. आजच्या युगातील महागातली महाग गाडी या लोकांना फिरण्यासाठी असते. रहायला पण सर्व सुखसोयींनी युक्त असे घर असते आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे त्याच्या ऐषोआरामी जीवनाविषयी प्रवचन, किर्तन ऐकायला आलेल्या श्रोत्यांना माहीत असते मग प्रश्न पडतो की हा उपदेश मानायचा की नाही?
तेव्हा प्रत्येकांनी स्वत:च ठरवायचे की माझ्यातल्या मी पणाचा म्हणजे माझ्यातील गुणांचा उपयोग मी कुठे व कसा करायचा आणि त्याची योग्य दिशा एकदा कळली की मग जीवनाची खरी गरूकिल्ली आपल्या हातात येते. बऱ्याचदा असेही प्रसंग येतात की समोरची व्यक्ती कारण नसतांना आपल्याशी भांडते आपल्याला अपशब्द बोलते शिव्या देते पण जर आपणही त्याला प्रतिउत्तर दिले तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय रहातो? उलट आपल्याला काही दिले आहे भले त्या शिव्या असोत, काही घेतले तर नाही ना आपल्याकडून? हा विचार करून पुढे चालले तर जीवन अधिक सुखकर होते. आपल्याला मिळणाऱ्या वेळेचा म्हणजे मोकळया वेळेचा उपयोग स्वत:साठी चांगला कसा करून घेता येईल हे जर ठरवता आले तरच व्यक्तीला स्वत:तील ‘मी’पणाचा खरा अर्थ कळेल.
– सौ. मनिषा नवले, पुणे