कितीतरी दिवसांनी आई एकटीच पुण्याला चार दिवस रहायला आली. मी अनेकदा बोलावते तिला. आग्रह करते, मस्त फिरू, सिनेमा बघू वगैरे अमिष दाखवते, पण तिला जमत नाही. या वेळेला गळच घातली मी तिला, म्हटलं आलंच पाहिजे! आणि तिनेही जमवलं. मनमुराद फिरलो, सिनेमा झाला, हॉटेलींग झालं आणि गप्पाही. ”आज मी तुला आमच्या लहानपणीची एक गोष्ट सांगणार आहे,”माझ्याजवळ पलंगावर बसत आई म्हणाली. माझे कान टवकारले. आईच्या लहानपणीच्या आठवणी मला आमच्या आजोबांच्या जुन्या इनामदारकीत घेऊन जातात. तेव्हाचं वैभव, माझ्या आजोबांची हुशारी, धडाडी, आजीचं कुलीन सौंदर्य, नऊ भावडांच बालपण सगळं सगळं डोळयासमोर तरळतं. मी एकदम सरसावून बसले. आई सांगू लागली…..
आमची आई दररोज देवळात जायची. जरीचं लुगडं, नाकात नथ, हातात घसघशीत चांदीचं भांड असा तिचा थाट असायचा. एवढया माणसाचं खटलं आटोपून घराबाहेर पडायला तिला तिन्हीसांजा व्हायच्या. उन्हं कललेली आणि गाव अंधारात गुडूप व्हायच्या तयारीत. कर्जत काही खेडं नाही. तेव्हाही नव्हतं. पुण्या – मुबंईच्या मधोमध, अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेलं, एक लहानसं गाव आहे. इंजिन जोडायला किंवा सोडायला इथे थांबावच लागतं. त्यामुळे गाडी येण्याच्या वेळेस रस्त्यावर रहदारी ठरलेली. गर्दी बघून इंजिन लोकल आली वाटतं किंवा ‘अगंबाई, डेक्कन आली एवढयात?’ अशी वाक्य नेहमीच कानावर पडतात तिथे. तर सांगायची गोष्ट, आई संध्याकाळी देवळात जायची.
एकदा देवदर्शनाहून बाहेर पडतांना तिला दोन स्त्रियांनी हटकलं. घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेतल्या, डोईवर पदर, हातात लहानशी पिशवी घेतलेल्या त्या दोघी आईजवळ आल्या आणि म्हणाल्या, ‘बाई आम्ही उच्च कुलीन स्त्रिया आहोत, झाशीच्या राणीच्या वंशज आहोत. आज आम्ही अडचणीत सापडलो आहोत. पुढची गाडी चुकलेय आमची. खूप सामान आहे आमचं. पण ते आम्ही स्टेशनात लॉकरमध्ये ठेवलंय. आम्हाला एक रात्र रहायला जागा हवीय. तुम्ही चांगल्या घरातल्या दिसता म्हणून विचारण्याचं धाडस केलं’ त्याचं विनंम्र बोलणं ऐकून आमची आई म्हणाली, ‘चलाकी आमच्या घरी, खुशाल रात्र काढा. सकाळ झाल्यावर जा सावकाश’.
तिघी घरी आल्या. ‘बेबी, या आपल्या पाव्हण्या, झाशीच्या राणीच्या वंशज आहेत. आपलं भाग्य म्हणून आपल्याकडे आल्या आहेत. त्यांची बडदास्त ठेवायची आहे चांगली, तुझी मदत लागेल मला’. बाजूला घेत आईने बजावलं. मी चांगली कळती होते त्यावेळेस म्हणून आठवतंय सगळं. कौतुकानं मी त्याना न्याहाळत होते, हवं नको ते पहात होते. हात पाय धुवायला विहिरीवर घेऊन गेले. एकीने हात धुतेवेळी पिशवी दुसरीच्या हाती दिली आणि माझा पुढे सरावलेला हात मागे झाला. आम्ही घरात आलो. पण नाही म्हटलं तरी खटकलं मला, त्याचं पिशवी न सोडणं.
आईने छान जेवण केलं. तळणं तळलं, चांदीची ताटं, वाटया- भांडी मांडली. आम्ही कौतुकानं वाढलं आणि त्या दोघी यथेच्छ जेवल्या. हात धुऊन सुपारी चघळत बाहेर जाऊन गप्पा मारीत बसल्या. स्वयंपाकघरात आईची झाकपाक चालली होती. तेव्हढयात वसुलीसाठी बाहेर गेलेले आमचे वडील, नाना घरी आले. ‘बाळे (आजीला म्हणत असत) पाव्हण्या कोण ग?’ पानावर बसत नानांनी चौकशी केली. ‘त्या ना झाशीच्या वशंज आहेत, मला देवळात भेटल्या, अडचणीत आहेत, खूप सामान आहे त्याचं’ वगैरे सविस्तर वर्णन आईने केलं. जेऊन नाना घराबाहेर गेले व त्या दोघींशी गप्पा मारू लागले. तुम्ही कोण? कुठच्या वगैरे चौकशी सुरू केली. त्या दोघींनीही पुन्हा तीच हकीकत सांगितली. बराच वेळ इकडचं तिकडचं बोलल्यानंतर नाना म्हणाले, ‘हे बघा मी कंदील आणि गडी देतो बरोबर, तो तुम्हाला स्टेशनवर पोचवेल, तुम्हाला आमच्या घरी रहाता यायचं नाही.’ असं म्हटलं मात्र! झालं त्यांचा मोहराच बदलला. रागारागाने चढया आवाजात त्या भांडायला लागल्या. आम्ही नाही जाणार, अशा कसा जाऊ? असं म्हणायला लागल्या. जरावेळाने त्या ‘कुलीन'(?) स्त्रिया अर्वाच्य शिव्या द्यायला लागल्या. आवाज तर एवढा कर्कश्श काढला होता की त्या पुरूषच होत्या की काय असा संशय यावा पण आमचे नाना घाबरणारे नव्हते. नानांची आणि त्यांची चांगलीच जुंपली, शेजारी गोळा झाले. शेवटी भांडण विकोपाला गेलं आणि नाना म्हणाले ‘आता गडीबिडी काही देत नाही, बऱ्याबोलाने चालत्या हा, नाहीतर फटके देईन! त्यांचा नूर पाहून दोघी घाबरल्या असाव्यात, आता डाळ शिजत नाही असं पाहून त्या जीव घेऊन आणि त्यांची पिशवी घेऊन पळत सुटल्या.
‘बाळे, कशी फसतेस ग अशी ? अग त्या बनेल बायका होत्या. हातात पिशवी पाहिलीस त्यांच्या? भुलीचं औषध असणार त्यात. रात्री आपल्याला भूल घालून घर लुटून नेलं असतं. आणि हो, स्टेशनवर चौकशीला मी माणूस पाठवला होता, सामान बिमान काही नव्हतं तिथे!’
आम्हा सगळयांची खात्रीच पटली त्या खोटारडया होत्या म्हणून. आमच्या नानांच्या हुशारीमुळे केवढं तरी संकट टळलं घरावरचं.
सुनिता अगं, पुढे कितीतरी वर्षांनी मी लग्न होऊन मुंबईत रहायला गेले ना तेव्हा गिरगावात तीच जोडगोळी रस्त्याने तुरूतुरू चाललेली पाहिली मी. अशी हबकले सांगू!…….
– सुनिता केळकर, सिंगापुर