मासिक सदरे


टी.व्ही.वरचा सुंदर कौटुंबिक कार्यक्रम

tv programs ‘हनी, वुइ आर किलिंग किड्स’ नावाचा एक कार्यक्रम हल्ली टी.व्ही.वर दर गुरुवारी लागतो. कार्यक्रमात दरवेळी एक नवे कुटुंब असते – नवरा-बायको व मुले. कार्यक्रमाची संचालिका दांपत्याला त्यांच्या मुलांविषयीची माहिती विचारते… ही मुले काय खातात, केव्हां खातात, किती वेळ टि..व्ही. पहातात, बाहेर खेळायला जातात का, काय खेळतात, पालकांच्या सवयी काय आहेत, ते धूम्रपान करतात का वगैरे. ही माहिती मिळाल्यावर मुलांचे फोटो घेतले जातात. प्रश्नांची मिळालेली उत्तरे व मुलांचे फोटो कॉप्यूटरवर घातले जातात. मुलांच्या सवयी अशाच राहिल्या तर अजून १५ वर्षांनंतर , ४०व्या वर्षी, ६० व्या वर्षी ही मुले कशी दिसतील याची चित्रे आणि त्यांचे आयुर्मान किती असेल याविषयीचा अंदाज कॉप्युटर ठरवितो. ती चित्रे पालकांना दाखविली जातात. आणि बहुतेक पालकांना चांगलाच धक्का बसतो. काही आया किंवा वडील तर इतके हादरून जातात की ते बोलूच शकत नाहीत किंवा चक्क रडायला लागतात. या धक्का तंत्राचा उपयोग चांगल्या सुधारणा घडविण्याच्या दृष्टीने प्रेरणा म्हणून वापरला जातो.

मुले चॉकलेट, बटाटयाचे वेफर्स, कोक असले नको ते पदार्थ खात असतात. पाच-पाच सहा-सहा तास कोचावर बसून एकीकडे खातखात टी.व्ही पहात असतात. त्यांना शारिरिक श्रमांची, खेळाची बिल्कुल आवड नसते. काहीही घरकाम करीत नाहीत. त्यांना शिस्तच नसते. कुटुंबालाच एकूण काहीही शिस्त नसते. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसतो. आणि याचे त-हेने मुले वाढली तर ती अत्यंत बेढब, आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत अशा व्यक्ती बनतील, कौटुंबिक जिव्हाळा अजिबात उरणार नाही हे कॉप्यूटर दाखवितो.

मग संचालिका पालकांना समजावून सांगते … की ह्या ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. या बदलणे आवश्यक आहे. ती प्रत्येक वेळेस तीन नियम सांगते . ते साधारणत: असे असतात -1) मुलांचा टी.व्ही. पहाण्याचा वेळ फक्त एक तासच असेल. 2) मुले डब्यात, जेवताना भरपूर भाज्या, फळे व कसदार अन्नच खातील. 3) मुलांना रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेच लागतील. त्याशिवाय त्यांना बेडरूममधे जाताच येणार नाही. हे नियम आई-वडिलांबरोबर मुलांनाही समजावून सांगितले जातात. मग आठवडाभर हे नियम पाळून कुटुंब पुन्हा येते. आई-वडील त्यांचे आठवडाभराचे अनुभव सांगते. मुले सुरुवातीला कशी खूप त्रास देतात, असले बेचव जेवण नको म्हणून जेवण थुंकून देतात, रडतात, आरडा-ओरडा करतात… हे सगळे प्रकार आई-वडील सांगतात व ते दाखविलेही जातात.

मग मुलांना बोलावून सर्व कुटुंबाला दुस-या आठवडयाचे नवीन तीन नियम सांगितले जातात. पहिल्या आठवडयाच्या तीन नियमांबरोबर हे नवे तीन नियमही कुटुंबाने राबवायचे असतात. ते साधारणत: अशा प्रकारचे असतात 1) टी.व्ही पहाण्याचा जो वेळ वाचलेला आहे, त्या वेळात मुलांनी घरातल्या कामात मदत करायची आहे 2) पालकांनी सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन बागेत जायचे आहे व त्यांच्या बरोबर खेळ खेळणे, गोष्टीची पुस्तके वाचून दाखविणे असे उपक्रम करायचे आहेत. 3) पालकांनी त्यांच्या धूम्रपानावर नियंत्रण करायचे आहे.

आठवडाभरानंतर परत तिस-यांदा हे कुटुंब येते. दुस-या आठवडयात काय झाले, हे नियम पाळताना काय काय घडले, मुलांची किती चिडचिड झाली याविषयीची चर्चा आई-वडिलांशी होते. बहुतेक वेळी मुलांचा पहिल्या आठवडयात झालेला त्रागा कमी झालेला असतो. पालकांनी स्वत:च्या वागण्यावरही बधने घालण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग पुन्हा मुलांना बोलावून सर्व कुटुंबाला तिस-या आठवडयाचे नवीन तीन नियम सांगितले जातात. पहिल्या दोन आठवडयाच्या सहा नियमांबरोबरच हे नवे तीन नियमही आता राबवायचे असतात. ते साधारणत: असे असतात 1) मुलांनी सुट्टीच्या दिवशी बागकाम करून घरासाठी लागणारा भाजीपाला स्वत: पिकविण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2) मुलांना सायकल चालविता येत नसेल तर त्यांना सायकल चालवायला पालकांनी घेऊन जायचे आहे. 3) घरी कुणाचा तरी वाढदिवस किंवा तत्सम समारंभ आहे. त्यासाठी आईने चविष्ट पण पौष्टिक पदार्थ बनवायचे आहेत. पौष्टिक पदार्थांच्या पाककृतीचे पुस्तक आईला दिले जाते.

शेवटी तीन आठवडयांच्या अनुभवांचा विचार करून काय काय घडले, कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या, कोणत्या गोष्टी आचरणात आणताना त्रास झाला याचा विचार केला जातो.चांगल्या सवयी लावताना मुलांनी भरपूर आदळ-आपट केलेली असते. मुलांबरोबरच पालकांनाही ही नवीन जीवनपध्दती फार सोपी किंवा सुखाची नक्कीच वाटत नसते पण ती योग्य आहे आणि आपली मुले चांगली निघाली पाहिजेत याविषयीची तळमळ नक्कीच असते. सुरुवातीला पाहिलेली मुलांची भविष्यातली चित्रे आठवून ते नवीन सवयी आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करताना आढळतात. नियम पाळल्यानंतर १५ वर्षांनंतर, ४०व्या वर्षी व ६०व्या वर्षी ही मुले कशी दिसतील याची चित्रे कॉप्यूटर तयार करतो. ती चित्रे पालकांना दाखविली जातात. आधी दाखविल्या गेलेल्या भयानक व्यक्तींपेक्षा ही मुले इतकी सुदृढ व चांगली दिसतात की पालक खूश होतात. समाधानाने हसतात. मग पुन्हा मुलांना बोलावून संचालिका पालकांबरोबरच मुलांशी बोलून हे सगळे नियम पाळणे कसे योग्य आहे त्याचा तुमच्या आयुष्यावर कसा चांगला परिणाम होईल असे अगदी सोप्या शब्दात सांगते व एक तासाचा हा कार्यक्रम संपतो.

कार्यक्रमाची संचालिका प्रशिक्षित असते. मुलांचे किंवा पालकांचे काय चुकते आहे व त्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत याचा अभ्यास तिने केलेला असतो व त्या त्या परिस्थितीनुसार आवश्यक असे नियम ती बनवून सांगते. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कुटुंबाबरोबरच प्रेक्षकांचेही चांगलेच शिक्षण झालेले असते.

अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडेही नाही का राबविता येणार? टी.व्ही. चे आपल्या इथे माजलेले खूळ म्हणून त्याचा धिक्कार करण्यापेक्षा हव्या त्या शिक्षणाचे, नीतीनियमांचे शिक्षण देण्यासाठी या शक्तिमान माध्यमाचा वापर का नाही करायचा?हल्ली हिंदी सिनेमा, हींसाचार, तोकडया वस्त्रातली शरीरे आणि विवाहबाह्य संबंध ह्यांवर आधारित मालिकांचे पेव फुटलेले आहे. त्यात जाहिरातींची भर. पालक टि.व्ही पहात असतात आणि मुलांच्याही कानावर हेच पडत असते. वर आपण कुटुंबव्यवस्था बिघडलेली आहे म्हणून खंतही करीत असतो. मग सर्व कुटुंबाने एकत्र बसून पहाण्याजोगे , व ‘काय करू नका’ पेक्षा ‘काय करा’ हे दाखविणारे कार्यक्रम जर टी.व्ही.वर दाखविले तर? मुलांना अभ्यासात येणा-या अडचणींचे कसे निवारण करायचे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित न करू शकणा-या मुलांच्या समस्या कशा सोडवायच्या, सुट्टीत मुला-पालकांनी राबविण्याचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, अशा प्रकारचे विषय घेऊन ‘हसत खेळत शिक्षण’ देणाऱ्या मालिकांची मागणी प्रेक्षकांनीच करायला हवी.

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड