मासिक सदरे


वाचाल तर वाचाल

3Daustralia2 थंडीचा मोसम सुरू झाला की लवकर अंधार पडतो. थंडीच्या जोडीला पाऊस असतो. तो वातावरण उदास करूनसोडतो. ही उदासीनता नाहीशी करणारा एक हमखास उपाय म्हणजे सिटी काउन्सिलच्या लायब्ररीत जाऊन बसणे. या लायब्र-या एकतर चांगल्या ऊबदार असतात. शिवाय नवनवी पुस्तके, नवीन सी.डी., नवीन सिनेमे, मासिके, वृत्तपत्रे यांनी समृध्द असतात. तिथे भेट दिल्यावर खास करून जाणीव होते ती येथील ‘लायब्ररी संस्कृती’ ची.भारतीय घराचा, ‘देवघर’ – मग ते आलिशान मंदिरासारखे असो, एखादा कोनाडा असो किंवा भिंतीवर फळी ठोकून त्यावर स्थापित केलेला देव्हारा असो – हा एक अविभाज्य भाग असतो. त्याचप्रमाणे पुढारलेल्या व विशेषत: थंड हवामानाच्या देशात लायब्ररी हा घराचा एक अविभाज्य भाग असतो. पुस्तके विकत घेणे, ती जपून ठेवणे हा हाडीमाशी खिळलेला एक संस्कार असतो. पुस्तके अर्थातच खूप महाग असतात. पण सार्वजनिक लायब्ररीतून एकावेळी ४० ते ५० पुस्तके ठराविक मुदतीसाठी घरी घेऊन जाता येतात… तीही मोफत. वेळेवर पुस्तके परत न केल्याबद्द्ल मात्र दंड होतो. पुस्तकाची खराबी केल्यास त्याची किंमत भरून द्यावी लागते.

लायब्र-या अगदी जागोजागी असतात…. संदर्भ ग्रंथांपासून ते कथा-कादंब-या, मासिके, वृत्तपत्रे, इंटरनेट असल्या सर्व सोयी उपलब्ध असतात. काही माहिती संदर्भांसाठी लागत असल्यास त्या पानांची फोटोकॉपी काढून देण्याची सोय असते. विशेषत: लहान मुलांसाठी या लायब्र-या म्हणजे शिक्षणाचा एक अविभाज्य भागच असतो. लहान मुलांसाठी तिथे असलेले उपक्रम पाहून धन्य धन्य वाटते.

अगदी तान्ह्या मुलांपासून ते रांगणा-या – नुकतेच चालायला लागलेल्या मुलांसाठीही लायब्ररीत उपक्रम असतात. मुलांच्यासाठी गोष्टींची, चित्रांची भरपूर पुस्तके असतात. मुलांच्या विभागात भलामोठा फळा असतो. त्याजवळ रंगीत खडूंची पेटी असते. मुलांनी चित्रे काढणे, हवे ते लिहिणे या गोष्टींना उत्तेजन दिले जाते. मुलांना आपल्या हाताने पुस्तके निवडण्याची, ती हाताळण्याची मुभा असते. पालक बरोबर असतात आणि पुस्तके ही टरकावण्यासाठी नसतात हे बूच चोखणारे तान्हुलेही लहानपणापासून पहात असते. त्यामुळे मुले पुस्तके व्यवस्थित हाताळतात. त्यांच्यासाठी असलेल्या त्यांच्या उंचीच्या बेताच्या ट्रॉलीमधे पुस्तके भरून ती ऑटोमॅटिक मशिनच्या सहाय्याने आपापल्या नावावर नोंदवून घेतात.

आठवडयातून दोन ते तीन वेळा त्यांच्यासाठी गोष्टी सांगण्याचे कार्यक्रम असतात. पालक मुलांना घेऊन लायब्ररीत येतात. लायब्ररीतील कर्मचारी मुलांच्या समोर पुस्तक धरून पाने उलगडून त्यातील गोष्ट हावभावासहित वाचून दाखवितात. गाण्याच्या तासाच्या वेळी वेगवेगळया विषयावरील गाणी असलेले पुस्तक हाती धरून, त्या गाण्याची कॅसेट लावून हातवारे करून लायब्ररीतील कर्मचारी गाणी म्हणतात आणि मुले समोर बसून ती गाणी म्हणतात.
या सार्वजनिक लायब्र-यांइतक्याच समृध्द अशा शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांच्या लायब्र-या असतात. येथील शिक्षणपध्दतीचा भर हे स्वत:हून वाचून शोधून ज्ञान मिळविण्यावर असतो. त्यामुळे अगदी पहिलीतल्या मुलापासून सर्वांना ‘प्रोजेक्ट’असतात. त्या प्रोजेक्टसाठी लागणारी माहिती त्यांनी पुस्तकातून मिळवायची असते. शाळेत पुस्तके कशी शोधायची याचेही शिक्षण दिले जाते. याशिवाय शाळांच्या सहली मोठया लायब्र-यांमधूनही जातात. तिथे त्यांना अमुक एखाद्या विषयावरचे पुस्तक कसे शोधायचे, ते कुठे आहे हे कसे सापडवायचे इत्यादीचे प्रात्यक्षिक त्यांना दाखविले जाते.

3Daustralia2 लहान मुलांच्या विभागात वेगवेगळया विषयाला पूरक अशी माहिती देणारी छोटी छोटी प्रदर्शने भरविली जातात. उदा. भूकंप. ऑकलँड या शहरातच एक ज्वालामुखी आहे. सध्या तो सुप्त आहे. पण तो जागृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयावरील माहितीची पुस्तके, भूकंप झाल्यास कोणती खबरदारी घ्यायची याचीमाहितीपत्रके, भूकंपाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी कोणती यंत्रणा वापरली जाणार आहे, आणीबाणीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जाताना बरोबर काय घ्याल याची माहिती दाखविण्यासाठी एक रुकसॅक, पाण्याची बाटली, कपडे, सुके अन्नपदार्थ… असे सगळे मांडून ठेवलेले असते. दर पंधरा दिवसांनी हे प्रदर्शन बदलते… कधी संगीत हा विषय … मग विविध वाद्ये, वादकांचे फोटो, कधी विशिष्ट सणाविषयी माहिती, कधी १०० वर्षापूर्वीचे शहर… मग त्यावेळी लोक काय कपडे वापरत, रस्ते कसे होते, कोणत्या इमारती होत्या त्यांचे फोटो , त्यावेळी वापरली जाणारी स्वयंपाकघरातली उपकरणे…. असे विविध विषय असतात.
लहान मुलांच्या भेटीसाठी लेखक येतात. मुलांनी त्या लेखकाचे पुस्तक वाचून यायचे. मग लेखकाला हवे ते प्रश्न विचारायचे… आपल्याला त्या पुस्तकातले काय आवडले हे सांगायचे, काय समजले नाही ते विचारायचे अशा त-हेचा हा कार्यक्रम असतो.

मे महिना हा संगीताला वाहिलेला महिना. म्हणून संगीतात गती असलेल्या मुलांची निवड करण्याचा कार्यक्रम होता. विविध वाद्ये – पियानो, व्हायोलिन वाजवणारी मुले तसेच शिशुविहारातले बडबड गीत हावभावांसह म्हणणा-या मुलांपासून ते डोळयांवर झिप-या आणून पॉप किंवा रॉक म्हणणारी ६ ते ७ वर्षांची मुले-मुली यात सहभागी झालेली होती. लायब्ररीतले सगळे वातावरणच संगीतमय होऊन गेलेले होते.

टी.व्ही.वर सुजाण पालकत्वाविषयीचा कार्यक्रम असतो. त्यात पालकांनी सुट्टीच्या दिवशी मुलांना बागेत व लायब्ररीमधे नेणे कसे महत्वाचे व अत्यंत गरजेचे आहे याविषयी वारंवार सांगितले जात असते.
अशा त-हेने लायब्ररी संस्कृती मुलांमधे रुजविली जाते.

आपल्याकडे काय परिस्थिती असते? आमच्या लहानपणी तरी ग्रंथालय ही लहान मुलांसाठी वर्जच असलेली जागा होती. शाळेतील ग्रंथालये पुस्तके देण्यापेक्षा ती कपाटाला कुलूप घालून जपून ठेवण्यासाठीच आहेत असे आम्हाला वाटे. ग्रंथपाल हे मुलांना हुसकावून लावण्यासाठी व पुस्तकांच्या रक्षणासाठी नेमलेले अधिकारी आहेत असे वाटण्याची परिस्थिती होती. शिक्षणपध्दतीतही ‘गप्प बसा’ हाच एकमेव नियम. अशा परिस्थितीत पुस्तकांची गोडी लागणार तरी कशी? आता आर्थिक समृध्दि काही विशिष्ट वर्गापर्यंत तरी पोचलेली आहे. पण ही आर्थिक सुबत्ता टी.व्ही.च्या समोर बसून निरर्थक कार्यक्रम बघण्यात वाया जाते आहे. काही सुजाण घरे सुट्टीच्या वेळेत आपापल्या खोलीत बसून किंवा सार्वजनिक रित्या काही पुस्तकाचे वाचन करताना आढळतात. पण त्याचे प्रमाण खूपच कमी.
मराठी पुस्तकाची आवृत्ती १००० पुस्तकांची…. परदेशात पुस्तकाच्या प्रती लाखात सहज असतात. ही उंची आपण कधी गाठणार? ते अशक्य नाही. पण त्यासाठी पुस्तक संस्कृती मुलांमधे रुजवायला पाहिजे. मग पुस्तकांची मागणी वाढेल. मग पुस्तकांची काळजी घेणे, त्यातील पाने न फाडता ती वेळेवर परत करणे, पुस्तकांवर आचरट किंवा अश्लील मजकूर न लिहिणे ही सभ्यता आपोआपच अंगी रुळेल. ज्ञानार्जनाचे दरवाजे खुले करून संपन्न व्यक्तिमत्व घडविण्याचा हा संस्कार देशाला एका उंचीवर नेऊन ठेवेल. पुस्तकातले ज्ञान ‘पुस्तकी’ म्हणून हिणविण्यापेक्षा त्यामागचा इतिहास, विचार, विविध विषयांची ओळख ही अंधश्रध्दा आणि खुळचट कल्पनांपासून माणसांचे रक्षण करेल.

चला तर मग. मुलांच्या बारशापासून त्यांना भेट म्हणून पुस्तके द्यायला सुरुवात करू या. हा संस्कार आपल्या घरापासून सुरू करू यात. आपण म्हणतोच ना – ‘चॅरिटी बिगिन्स ऍट होम’. मुलांच्या कपडे-फटाके असल्या चैनीपेक्षा रंजक पुस्तकांची भेट त्यांना देऊ या!

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड