मासिक सदरे


फळांची तोड – एक रम्य अनुभव

Straberryनोव्हेंबर महिना सुरू झाला की न्यूझीलँडच्या बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू होते. लालचुटुक स्ट्रॉबेरी हिरव्यागार देठांमुळे अगदी सुंदर दिसतात. डिसेंबर-जानेवारीत त्या खूपच स्वस्तही होतात. ऑकलँडच्या आसपास खूप शेतकरी स्ट्रॉबेरी पिकवितात. ख्रिसमसनंतर ऑकलँडच्या आसपासच्या शेतात पाटया लागतात PYO म्हणजेच Pick Your Own. याचा अर्थ आपण त्या शेतावर जायचे. मालकाकडून टोपल्या घ्यायच्या. कुठल्या भागातल्या स्ट्रॉबेरी तोडायच्या हे माहीत करून घ्यायचे आणि आपल्याला पाहिजेत तशा स्ट्रॉबेरी खुडायच्या. खुडताना अर्थातच कितीही स्ट्रॉबेरी मोफत खाण्याची मुभा असते. फक्त आपण आपल्या टोपलीत घेतलेल्या स्ट्रॉबेरींचे वजन करून त्या मात्र विकत घ्यायच्या. कुणी हौस म्हणून खुडतात तर कुणी स्ट्रॉबेरी आइसक्रीमसाठी ताजी फळे तोडतात. गो-या आजीबाईंना आपल्या नातवंडांसाठी स्ट्रॉबेरी जॅम करायचा असतो. तरूण मंडळी स्ट्रॉबेरी आणि क्रीम यांचा क्रिकेटची किंवा रग्बीची मॅच पहाताना आस्वाद घेत असतात.

स्ट्रॉबेरी प्रमाणेच सफरचंदे, द्राक्षे, मक्याची कणसे, प्लम, पेअर यांचीही तोड PYO पध्दतीने करता येते. हा देश शेतीप्रधान असल्यामुळे या फळांच्या तोडीसाठी त्यांना भरपूर मनुष्यबळ लागते. त्यामुळे व्यवसाय म्हणूनही काहीजण हे काम करतात. त्याची मजुरीही चांगली भरभक्कम असते ( एका तासाला 20 डॉलर – म्हणजे साधारणत: 640 रुपये!)

फळे तोडायला जाणे हा सुट्टीच्या दिवशीचा एक चांगला उपक्रम असतो. अगदी लहान मुलांना घेऊन आई-वडील गाडीतून येतात. मुलांच्या बरोबर जाऊन कोणती फळे तोडायची, कोणती नाही हे पालक मुलांना नीट समजावून सांगतात. मुलांना स्वत: फळे तोडण्याचा आनंद मिळतो व आपण किती महत्वाचे, जबाबदारीचे काम केले आहे असा भाव त्यांच्या चेह-यावर आढळतो. शेतावर मोकळी जागा असते. बरेच लोक मोठा ग्रूप करून येतात. स्ट्रॉबेरी तोडून झाल्या की घरून आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गाणी ऐकत किंवा काही खेळ खेळत छान पिकनिकही साजरी करतात. मुलांना शेती दिसते. स्ट्रॉबेरीचे झाड कसे असते, त्याला फळे कशी लागतात हे कळते.

आपला भारत देशही शेतीप्रधान देश आहे. खेडेगावात रहाणा-या लोकांना किंवा ज्यांचे नातेवाईक खेडेगावात राहून शेती करतात अशा लोकांना शेतीचा थोडाफार तरी अनुभव असतो. पण मोठमोठया शहरात रहाणा-या मुलांना मात्र त्याविषयी काही माहिती नसते. ते या आनंदापासून आणि निसर्गाच्या सान्निध्यापासून वंचित असतात. टि व्ही आणि का प्यूटरला चिकटलेल्या मुलांना आपण कोणत्या सुखाला मुकत आहोत याची कल्पनाही नसते.

आपल्याकडे शेतक-यांनी सुगीच्यावेळी, फळांची तोड करण्याच्यावेळी जर अशाप्रकारचे काही उपक्रम राबवायला सुरुवात केली तर ते खात्रीपूर्वक चांगले चालतील.

उदा. उन्हाळयातील शाळेच्या सुट्टीच्या दिवसात उन्हाळी शिबीर म्हणून 4 दिवस कै-या तोडीसाठीचे शिबीर घ्यायचे. मग त्यात मुले शेतावर रहायला जातील. मातीच्या घरात अत्यंत साधेपणाने कसे रहाता येते हे अनुभवतील. विहिरीतून पाणी कसे काढतात ते पहातील. आब्यांची आढी कशी घालतात ते पहातील. शेतक-यांच्या कामात आपापल्या परीने मदत करतील. शिवाय शेतावर रहाण्याबद्दल शेतक-याला निवासखर्च देतील. त्यांच्यासमवेत शिक्षक असले तर फारच बहार. अन्यथा पालकांच्या बरोबर किंवा तीन-चार कुटुंबे मिळून जाऊन हा अनुभव घेऊ शकतील.

तरूण मुले ऊसतोडीच्या वेळी जाऊन शेतात काम करून अंगमेहनतीचा अनुभव घेऊ शकतील. तरूण मुला-मुलींचा ग्रूप तर हा अनुभव नक्कीच उत्सुकतेने घेतील. विशेषत: शेतकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर हा अगदीच स्तुत्य उपक्रम ठरेल. देशातील विविध भागातील विविधप्रकारच्या फळाफुलांच्या हंगामात हे विद्यार्थी जर गेले तर त्यांच्यादृष्टीने ही कार्यानुभवाची उत्तम संधी ठरेल.

झेंडू-शेवंतीच्या मोसमात फुले तोडायला जायचे, काकडी-कलिंगडाच्या मोसमात कोवळया लुसलुशीत काकडया तोडून घ्यायच्या, काकडयांना असलेले काटे अनुभवायचे, लालभडक-गोड कलिंगड कसे ओळखायचे हे शिकायचे आणि स्वत:च्या कष्टाची कमाई आनंदाने चाखायची.

दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेची सहलच जर हरब-याच्या शेतावर गेली तर मुलांना किती आनंद होईल. हुळा (भाजलेला ओला हरबरा) त्यांना चाखायला मिळेल व ‘गहू-हरबरा ही रब्बीची पिके’ असे यांत्रिकपणे न घोकता अभ्यासाच्यावेळी त्यांच्या डोळयासमोर हरब-याचे हिरवेगार शेत, व हरब-याची नाजुक जांभळी फुले येतील. यातूनच शेतीची आवड निर्माण होऊन एखादा महान शेतीशास्त्रज्ञही निर्माण होऊ शकेल.

शेतक-यांना यामुळे थोडेफार का होईना रोख उत्पन्न मिळायला सुरुवात होईल व शहरातील लोकांना- लहान व तरूण मुलांना आपण खातो ते अन्न कुठून येते याची माहिती होईल. मग मुंबईतील मुलगा ‘दूध कोण देते?’ या प्रश्नाचे उत्तर ‘भैय्या’ असे न देता ‘गाय/म्हैस’ असे देईल.

चला तर. ग्लोबलायझेशनमुळे बदललेल्या परिस्थितीत, कॉम्प्यूटर व कॉलसेंटर क्रांतीमुळे हाती खुळखुळणारा पैसा चांगल्या कामी लावूया.

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड