मासिक सदरे


कृती करूया

भारत सोडून परदेशी रहायला गेलेल्या लोकांना त्या देशातून सहसा भारतात परत जावेसे वाटत नाही. याचे कारण म्हणजे डॉलरचे आकर्षण? नाही. तो एकमेव निर्णायक घटक नसतो. त्यासाठी आमच्या येथील वास्तव्यातले सर्वसामान्य आयुष्यातले अनुभव पहाणे योग्य ठरेल. ते वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की येथील जीवन सुखाचे का वाटते.

सर्वसामान्य माणसाला रोजच्या व्यवहारातल्या साध्यासाध्या गोष्टी सुखाने व तणावविरहीत रितीने करणे गरजेचे असते. त्या गोष्टी येथील वास्तव्यात जागोजागी आढळतात. याची उदाहरणे पाहू यात.

कोणतीही वस्तू विकत घेतली व बिल भरले की पावती मिळते. पावती न घेण्याबद्दल सवलत व टॅक्स चुकविण्याची प्रथा इथे नाही. ही पावती जपून ठेवली की आपले काम झाले. समजा घेतलेली वस्तू घरी गेल्यावर योग्य नव्हती असे वाटले किंवा इतर काहीही कारणासाठी बदलाविशी वाटली तरी काळजीचे कारण नाही. वस्तूची पावती घेऊन जिथून विकत घेतली त्या दुकानात किंवा त्यांच्या कोणत्याही शाखेत गेले व पावती दाखवून वस्तू परत केली तर पैसे परत मिळतात. याबाबतचे एक उदाहरण आवर्जून सांगावेसे वाटते. आमच्या नातीसाठी आम्ही एक सायकल ८० डॉलरला विकत घेतली. ती घेतल्यानंतरच्या आठवड्यात टी.व्हीवर जाहिरात पाहिली तर तीच सायकल सवलतीत ४० डॉलरला विकत होते. आम्ही आमची सायकल परत करायला गेलो. सेल्स गर्लने कारण विचारले. आम्ही खरे कारण सांगताच तिने कोणतीही कटकट न करता सायकल परत घेतली, आम्ही सायकलचे दुसरे खोके घेतले , तिने ४० डॉलर हातावर ठेवले. सायकल पुढे नातीसाठी जपानला घेऊन गेलो आणि ती जोडतानाच एक पार्ट तुटला. सायकल पुन्हा खोक्यात गुंडाळून ठेवून २ महिन्यांनी न्यूझीलँडला आणली. पुन्हा पावती घेऊन दुकानात गेलो व मोडलेला पार्ट दाखविताच ४० डॉलर लगेच परत मिळाले.

इलेक्ट्रिक ब्लॆंकेट थंडीत घेतले व ५ महिने वापरल्यावर ते चालेनासे झाले. त्याची गॅरंटी वर्षाची होती. पुन्हा पावती घेऊन गेल्या गेल्या “पैसे परत हवेत का बदली ब्लेंकेट हवे ?” असे सेल्समनने विचारले. बदली ब्लेंकेट मागितल्यावर लगेच कोरे ब्लेंकेट मिळाले वर एक डॉलरही, कारण नव्या ब्लेंकेटची किंमत पूर्वीच्या ब्लेंकेटपेक्षा एक डॉलरने कमी होती.

स्त्रीयांना मिळणारी वागणूक हा एक मोठा महत्वाचा भाग. तरूण मुली, स्त्रीया यांना माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो इथे बजावला जातो. स्त्रीयांनी त्यांच्या आवडीचे (व कितीही तोकडे) कपडे घातले तरी त्यांच्याकडे टक लावून बघणे, चिमटे काढणे, घाणेरडे व अर्वाच्च शब्द वापरणे, अश्लील हावभाव करणे यातील काहीही घडत नाही. नोकरी केल्यावर घरी गेले की स्त्रीने मुलाबाळांकडे पहायचे, स्वयंपाक करायचा, धुणी-भांडी करायची व नवरोजी टीव्ही पहात बसले आहेत ही पुरुष वर्चस्वाची वागणूक नाही. एक तर येथील स्वयंपाक करणे पुष्कळ सोपे असते कारण अनेक पदार्थ तयारच मिळतात. शिवाय भांडी घासण्याचे काम बहुदा पुरूषच करतात. नोकरीमधे पुरूषांपेक्षा स्त्रीयांना प्राधान्य दिले जाते.

कचेरीत बॉस म्हणजे “सर्वश्रेष्ठ” ही भावना नाही. तुम्ही तुमचे काम केलेत की संपले. हांजी हांजी करण्याची अपेक्षा नसते. तुमच्या अधिकारांबाबत तुम्ही जागरूक असलात तर त्याचा आदर केला जातो. कचेरीची वेळ संपल्यानंतर तुम्ही घरी गेलात तर भारतात जसे वाटते, तसे “अपराधी” वाटणे गैर समजले जाते. तुमच्या जेवणाच्या वेळेत जर वरिष्टांना काही मदत लागली तर तुमच्या जेवणाच्या वेळेवर “हक्क” न सांगता, वरिष्ठ तुम्हाला “विनंती” करून मदतीची याचना करतात. रजा शिल्लक आहे तर ती तुम्हाला पाहिजे तेव्हां घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुमची शिल्लक रजा मंजूर केल्याबद्दल साहेबाचे “उपकार” मानण्याची प्रथा नाही.

कोणत्याही कामासाठी लागणारे कागदपत्र व त्यांची पूर्ती ही जटिल समस्या येथील माणसांचे आयुष्य कुरतडत नाही. रिटायर्ड पेन्शनरांना पेन्शन चालू रहाण्यासाठी आपण “जिवंत” असल्याचे दर तीन महिन्यांनी सिद्ध करावे लागत नाही. सरकारतर्फे ६५ वयाच्यापेक्षा जास्त असलेल्या सर्व नागरिकांना दर आठवड्याला “सुपर अन्युएशन ” मिळते, ते तुमच्या खात्यात न चुकता जमा होते, मग तुम्ही करोडोपती असा वा रंक. इनकम टॅक्स हा मिळणा-या प्रत्येक डॉलरमधून कापला जातोच. वर्षाच्या शेवटी इनकमटॅक्स डिपार्टमेंट तुमचा हिशोब तुमच्याकडे पाठविते – त्यात काही चूक असेल किंवा तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही इनकमटॅक्स डिपार्टमेंटशी संपर्क साधायचा. भारतात मार्च महिन्याच्या शेवटी आपणच कमावलेल्या पैशांसाठी करावी लागणारी केविलवाणी धावपळ इथे करावी लागत नाही.

कागदपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या मागणीमुळे माणूस कावतो. शिवाय त्यावर सही शिक्का लागतो व त्यासाठी प्रत्येक अधिका-याला द्यावी लागणारी दक्षिणा वेगळीच. हा प्रकार इथे नाही. पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसेन्स हे प्रमाण मानले जातात. या देशाचे नागरिकत्व घेण्यासाठीचा फार्म भरणे हे अक्षरश: ३० ते ४० मिनिटांचे काम होते. यावर विश्वासच बसू शकत नाही. शिवाय ज्या सरकारी अधिका-यांच्या सह्या लागतात त्यांच्याकडे तुम्ही वेळ ठरवून जाऊ शकता. “जस्टिस ओफ पीस” नावाच्या नियुक्त व्यक्ती हे काम विनामोबदला करतात. त्यांनी केलेल्या सह्यांबाबत कुठेही तुमच्यावर “उपकार” केल्याची भावना नाही. हे आपले काम आपण केले आहे अशी भूमिका. पहिल्यांदा जेव्हा जे.पी. ची सही अशी विनासायास मिळाली तेव्हां विश्वासच बसत नव्हता, कारण भारतात उन्हातान्हात खेटे घालणे, साहेब जागेवर नसणे, चिरीमिरीशिवाय चपराशाचेही तोंड न दिसणे याची सवय अंगी भिनलेली होती.

ज्याच्या त्याच्या मालमत्तेबाबत आदर दाखविला जातो. तुमच्या कुंपणावर आलेली डेरेदार फुले किंवा फळे चुकूनही कोणी तोडणार नाही. शिवाय “देवासाठीच तोडतोय ना?” असा उद्दाम प्रश्नही कोणी करणार नाही.

दुकानात असो, लायब्ररीत असो, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असो, कोणीही सौजन्य दाखविले की “धन्यवाद” हा शब्द तोंडातून बाहेर पडतोच. बसड्रायव्हरला सुद्धा येता जाता प्रत्येक उतारू आवर्जून धन्यवाद देत असतो.

तुम्ही कंपनीचे सर्वोच्च अधिकारी असा अथवा सफाई कामगार असा, व्यक्ती म्हणून मिळणारा सन्मान तुमच्यापासून कधीही हिरावला जात नाही. कोणत्याही सार्वजनिक समारंभात अधिकारी व झाडूवाला एकाच टेबलावर बसून जेवताना दिसतील.

रांग लावण्याची शिस्त हा अंगी भिनलेला गुणच. तुमचा नंबर येईपर्यंत शांतपणे वाट पहायची. दोनापेक्षा जास्त व्यक्ती आल्या की रांग आपोआप तयार करणारच… बलवानांनी हडेलहप्पी करून पुढे घुसण्याचा प्रयत्न करणे इथे नसते. रस्ता ओलांडताना, बसमधे चढताना ढकलाढकली तर दूरच कुणीही तुम्हाला चुकूनही स्पर्श करत नाहीत. लहान मुले, म्हातारी माणसे यांना रस्ते ओलांडताना कोणताही त्रास नाही कारण वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातात.

बाजारात किडका माल विकणे, भेसळ हे प्रकार नाहीत. शिळे पदार्थच पुन्हा कशाततरी मिसळून त्यापासून बनविलेला पदार्थ विकण्याची “चतुराई(?)” नाही. मॅकडोनाल्ड वगैरेंसारख्या ठिकाणी तर तयार बर्गर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवला तर फेकून देण्याची सक्ती आहे. विक्रीसाठी ठेवलेले तयार पदार्थ (मांसाहारी पाय वगैरे) त्या दिवशी खपले नाहीत तर फेकून देणे सक्तीचे आहे. अथवा फुड इनस्पेक्टर लगेच कारवाई करतील व ती कारवाई फार महागात पडते. या सर्व गोष्टींच्या विरुद्ध भारतातील चित्र किती विदारक आहे हे रंगविण्याची गरज नाही.

एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते कि इथे असलेली सगळी माणसे काही गुणांचे पुतळे अथवा संतमहात्मे आहेत असे नाही. मानवीस्वभावात आढळणारे सर्व गुणदोष येथील माणसांमधेही त्याच प्रमाणात आहेत. पण तरीही प्रत्येक व्यक्तीच्या काही मूलभूत हक्कांबाबत समाज काटेकोरपणे वागतो. सरकारचे त्यावर नियंत्रण असते व वर्षानुवर्षे असे वागत आल्यामुळे समाजाची जडणघडण , लहान मुलांसमोर ठेवले गेलेले आदर्श व प्रत्यक्षात त्यांनी पाहिलेली मोठया व्यक्तींची वागणूक यातून हे बाळकडू पाजले जाते व सर्वच समाज एका वेगळ्या उच्च स्तरावर जातो.

विकसित देशामधे भ्रष्टाचार नाही कां? आहे … चांगल्या भल्या मोठ्ठ्या प्रमाणावर आहे पण तो सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधे आड येत नाही. मूठभर उच्चपदस्थ राजकारण्यांशी ते निगडीत असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन खूप सुखाचे व तणाव विरहीत होते.

आर्थिक संपन्नता हेच याचे मूळ कारण आहे असा युक्तिवाद केला जातो. तो खरा नाही. आपण नीट विचार केल्यास आपल्याला कळेल की आपण भारतीय आपली अस्मिताच गमावून बसलेलो आहोत. बोलायचे एक, करायचे एक. राजकारणी लोकांनी समाजाचे भले करण्यासाठी राजकारणात पडण्याऐवजी, राजकारण म्हणजे सत्ता व आर्थिक सुबत्तेचा एक महामार्ग झाला आहे. धर्माचे आचरण करण्याऐवजी धर्मांधतेने केलेले हिंसाचारच समाजाला अधिकाधिक दुर्बल बनविताना दिसत आहेत. प्रचारमाध्यमांना नट-नटयांच्या लफडयांविषयी चर्चा करणे अधिक गरजेचे वाटते. जी माणसे भारतात फारशी चमकत नाहीत अशी माणसे भारताबाहेर गेली की चांगली चमकतात कारण त्यांच्या क्षमतेला वाव देणारी, पूरक ठरणारी परिस्थिती तिथे उपलब्ध असते. चांगले काही करणा-याला त्याचे प्रयत्न हाणून पाडण्याऐवजी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे अनेक सर्वसामान्य वाटणारे भारतीय लोक परदेशी गेले की चमकतात. त्यांच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेला योग्य वातावरण प्राप्त होते.

आपल्या देशातील हा ब्रेनड्रेन थोपविण्याची गरज राजकर्त्यांच्या डोक्यात येऊन गेली. पण त्यासाठी लागणारे धोरण आखणे व अवलंबिणे अजून झालेले नाही. सर्वसामान्य माणसाने कष्टाने मिळविलेल्या संपत्तीचा उपभोग सुखाने घेऊ देण्याजोगी परिस्थिती नाही. प्रदूषण – हवेचे, पाण्याचे व नैतिकतेचेही… हा स्थायी भाव झाला आहे. त्यामुळेच आपला देश, आपली माणसे, आपली संस्कृती प्रिय असूनही परदेशात रहाणे लोक पसंत करतात. या गोष्टी लिहिताना मनाला यातना होतात. पण ही वस्तुस्थिती आहे याकडे काणाडोळाही करता येत नाही.

सर्वसामान्य माणसांनी जे घडेल ते नुसते पहात रहायचे किंवा चांगले घडेल याविषयी आशादायक विचार मनात बाळगायचे व जे जे चांगले ते ते करीत रहायचे. जगामधे घडणा-या अनेक घटनांचे परिणाम म्हणून जे घडते, त्यात भारतालाही चांगले दिवस येतील हे म्हणत रहायचे. तुमच्या-आमच्या हातात याशिवाय काय आहे? हा निराशाजनक विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.

न्यूझीलँडमधील वास्तव्यात नजरेस आलेले अनेक गुण, चांगले अनुभव, अनुकरण करण्याजोग्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचविण्याची संधी मराठी वर्ल्डने दिली त्याबद्दल त्यांना शतश: धन्यवाद. हे तुमच्यापुढे मांडताना आपणच आपली उणीदुणी काढणे हा विचार नव्हता.. काय आहे व काय बदलता येणे गरजेचे आहे, व ते तसे कुठेतरी अस्तित्वात आहे याचा प्रत्यय वाचकांना देणे ही यामागची भूमिका होती. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वांना उद्युक्त करणे ही प्रेरणा होती.

यातील एखादी गोष्ट जरी आपल्याला आचरणात आणता आली तर किती छान होईल ना? मग ते करण्यासाठी सर्व वाचकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा.

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड