कलाकार – लेख

सृजनशिलता ऑनलाईन!

चित्रकला आणि हस्तकलेची सुरुवात अगदी शिशू असल्यापासून होते. सहजपणे ओढलेल्या रेघोटयांतून मुले आपल्याला हवी ती चित्रे दाखविण्याचा प्रयत्न करतात. हस्तकलेची सुरुवात कागदाच्या होडया, पंखा करण्यापासून होते. काही अपवाद वगळता बहुतेक वेळा शाळांमधून निव्वळ तास म्हणून हे विषय घेतले जातात. त्यामुळे मुलांना ह्या कलेचा आनंद मिळण्यापेक्षा निव्वळ ‘ग्रेड’ मिळवण्यासाठी ह्या विषयांचा उपयोग होतो. त्यामुळे बहुतेक वेळेला लहान वयातच ह्या दोन्ही सृजनात्मक कलांकडे दुर्लक्ष होते. भारतापेक्षा अमेरिका, युरोपच्या देशांमधून पहिली दहा वर्षे चित्रकला, हस्तकला आणि खेळांवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे इंटरनेटवरही ह्या दोन्ही विषयांवर भरपूर वेबसाईट्स उपलब्ध आहेत.

क्रीस येट्स ह्या अमेरिकन आईने पालकांसाठी www.freekidcrafts.com ही वेबसाईट उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या तीन मुलांना वाढवतांना क्रीसने वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यात विविध हस्तकला आणि चित्रकलेच्या उपक्रमांचा रोज उपयोग केला. त्याच्या मुलांना अनेक प्रकारे फायदा झाला जसे स्वयंशिस्त, चिकाटी, संयम, कष्टाची तयारी, एकाग्रता, दुस-यांना मदत, नवीन शिकण्याची उमेद आणि सृजनशिलतेला वाव. त्याचबरोबर त्यांच्यातली भांडणे कमी होऊन आपआपसांत अधिक सामंजस्य आले. ह्या साईटवर हस्तकला आणि चित्रकलेसाठी अनेक उपक्रम आणि टीप्स दिल्या आहेत. त्यामध्ये क्रीसने सांगितलेली ‘रेझोल्यूशन बूक’ अगदी वेगळी वाटली. प्रत्येकजण नवीन वर्ष सुरु झाले की काहीतरी ‘रेझोल्यूशन’ करत असतो. पण त्यातली बरीचशी पाळली जात नाहीत. त्यासाठी ‘रेझोल्यूशन बूक’ करायची. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी काही पाने राखीव ठेऊन त्यावर त्यांचा फोटो, आवडते चित्र, जमल्यास ज्याचे ‘रेझोल्यूशन’ करायचे आहे त्याचे चित्र अथवा संदेश चिकटवायचा. दर महिन्याला त्या वहीत नोंदी करायच्या. अश्या त-हेने वर्षाच्या शेवटी प्रत्येकाला किती यश मिळाले हे सहज लक्षात येते.

www.creativekidsathome.com ह्या साईटवरही वेगवेगळ्या प्रसंगी प्रत्येकासाठी स्वहस्ते केलेल्या भन्नाट भेटी कश्या तयार करता येतील ह्या विषयी भरपूर लिंक्स आहेत. एका आईने सांगितले की तिच्या सहा वर्षाच्या चिमुरडयाने महिन्याभरात त्याला त्याचे बाबा का आवडतात ह्याची तीस कारणे लिहून काढली. एका मोठया कॅनव्हॉसवर ‘ती कारणे’ चिकटवली आणि बरोबरीने दोघांचे फोटो सुध्दा. आज त्यांच्या घरी लावलेला हा कॅनव्हास बाबांना मिळालेली सर्वात खास आणि मोठठी भेट आहे. विशेष ‘इंडीयन टच’ असणा-या www.pitara.com/activities/craft.asp ह्या वेबसाईटवर सात ते बारा वयोगटातल्या मुलांनी घरच्या घरी करण्यासारख्या अनेक गोष्टी छायाचित्रांसह दिलेल्या आहेत.

मुलांना पेपरबॅगचा कुत्रा, पेपरप्लेटची बाहूली, अंडयाच्या टरफलांपासून टयूलिपची फुले, ओरिगामी फुलपाखरु, कागदाचे ख्रिसमस ट्री सारख्या इतर अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करायच्या असतील तर www.enchantedlearning.com/crafts आणि www.kinderart.com ह्या साईटला भेट द्यायलाच हवी. येथे आपल्याला शिकायचे असलेल्या हस्तकलेवर क्लिक करायचे की प्रत्येक कृती चित्रांनुसार आपल्या कृती वाचता येते. अत्यंत सोप्या शब्दात कृती आणि चित्रांच्या सहाय्यामुळे मुलांना स्वत: वाचूनही ह्या वस्तू बनवता येतील. त्याचबरोबर ह्या हस्तकलेची काही ऑनलाईन पुस्तकेही प्रिंट करता येतात. हस्तकलेबरोबरच ऑनलाईन चित्रकला शिकण्याची सोयही www.artistshelpingchildren.org/howtodraw.html ह्या साईटवर उपलब्ध आहे. येथे विषयानुरुप आपल्याला चित्रे शिकता येतात. जसे पेंग्वीन पक्षी काढायला शिकायचा असल्यास अगदी गोल काढण्यापासून ऑनलाईन शिकवायला सुरुवात होते. पुढे क्लिक करत गेल्यास आपल्याला प्रत्येक भाग, रेषा कश्या काढायच्या हे सांगितले जाते. ह्याच पध्दतीने मुले वेगवेगळी चित्रे काढायला शिकू शकतात. भारतातली विविध पारंपारिक चित्रकला जसे की वारली, मधुबनी, मांडणा, बाटीक, बांधणी इत्यादी विषयी इंटरनेटवर माहिती आणि चित्रांचे नमुने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. www.ethnicpaintings.com, www.craftsinindia.com/paintings ह्या साईट्स वरुन भारतातल्या विविध कला आणि कलाकारांविषयी आपल्याला माहिती मिळते.

काही वर्षांपासून ‘ओरिगामी’ ही ‘पेपर फोंल्डींगची’ कला भारतात लोकप्रिय होत आहे. ओरिगामी मूळ जपानची कला. जपानी भाषेत ‘ओरु’ म्हणजे दुमडणे (folding) आणि ‘कामी’ म्हणजे कागद. ओरिगामीचे वैशिष्टय म्हणजे चौकोनी किंवा आयातकृती कागद दुमडून, घडी घालून विशिष्टय आकार तयार करणे. हे करतांना कात्री, डिंक ह्यांचा वापर अजिबात करायचा नाही. पहिल्या शतकात ही कला चायनिज पेपरफोल्डींग म्हणून अस्तित्वात होती. सहाव्या शतकात बौध्द भिकूंनी कागद जपानमध्ये नेऊन ओरिगामी कलेची सुरुवात झाली. ह्या कलेची महती इतकी वाढली की युध्दावर जातांना समुराई सैनिक एकमेकांना शुभेच्छा देत. जपानी शिन्तो लग्नामधूनही कागदी फुलपाखरांचा वापर होत असे. आज ही कला भारत, अमेरिका आणि युरोप मध्ये लोकप्रिय आहे.

ओरिगामी प्रमाणेच ‘पेपर क्विलींगची’ कलाही आपल्याकडे लोकप्रिय होत आहे. पेपर क्विलींग म्हणजे रंगबिरंगी पेपर्सची गुंडाळी किंवा फोल्ड करुन त्यांचे विविध डिसाईन्स तयार करणे. हे करतांना डिंक आणि कात्रीचा उपयोग केला तरी चालतो. ही कला इजिप्त मधून आली असे मानतात परंतु इटालियन आणि फ्रेन्च नननी ही कला अधिक पुढे नेली. ही कला मुख्यता वस्तू आकर्षक आणि सजविण्यासाठी वापरात येत असे. आता ह्याचा प्रसार बहुतेक देशांमध्ये झाला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय पेपर क्विलींगची सभा भरविण्यात येते त्यासाठी देशभरातून ‘क्विलर्स’ आपली कला दाखविण्यासाठी हजर होतात. अधिक माहिती आणि डिसाईन्स आपल्याला www.quilledcreations.com, www.kinderart.com/crafts/quilling.shtml ह्या वेबसाईटवर मिळू शकतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात एखादी कला जोपासणारे मूल आपला वेगळा ठसा उमटवते. निरिक्षणांती सिध्द झाले आहे की कुठल्याही प्रकारची कला व खेळ जोपासतांना मुलांची एकाग्रता, चिकाटी, नवे शिकण्याची उमेद, स्वयंशिस्त आणि सृजनशिलता वाढीला लागते. अपयश किंवा नैराश्य घालविण्यासाठी तसेच चमूच्या बरोबरीने काम केल्यास परस्पर संवाद आणि एकमेंकाना मदत करण्याचे गुण अंगी बाणवतात. प्रत्येक मुलाने आवडत्या कलेत शिखरच गाठले पाहिजे असे नाही तर त्याचा आनंद त्याला घेता आला पाहिजे. मोठेपणी ह्या कला त्याला आयुष्याचा ‘बॅलन्स’ साधायला तसेच ’स्ट्रेस रिलीव्हर’ म्हणूनही मदत करतात. मुलांमधील कला फुलत असतांना व्यक्ती म्हणूनही मुले अधिक समृध्द आणि समंजस होत असतात. म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे “Creativity is allowing yourself to make mistakes. Art is knowing which ones to keep.”

– भाग्यश्री केंगे