कलाकार – लेख

कॉलेज करा, संगीतज्ञ व्हा

एका संस्कृत सुभाषितामध्ये संगीताविना जगणा-या मानवाची तुलना ही साक्षात पशूशी केलेली आहे. संगीत ही केवळ कला राहिली नसून विविध आजार बरे करणारे ते एक शास्त्र म्हणून देखील आजमितीस गणले जात आहे. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत या दोन शास्त्रीय संगीत शैली फार पुरातन काळापासून आपल्या भारतवर्षामध्ये प्रचलित असून गुरू-शिष्य परंपरेने तसेच विद्यापीठीय शिक्षण परंपरेने या संगीताचे जतन, संवर्धन केले जात आहे ही खरोखरच समाधानाची बाब आहे. हल्लीच्या दशकामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण यांची एक लाट अर्थ, राजकारण तसेच समाजकारण यांचा ताबा घेताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये विविध शैलीप्रवाह सामावून घेणे ही काळाची गरज ठरत आहे. शास्त्रीय संगीताचा बाज, त्या पाठी असणारा वर्षानुवर्षांचा रियाझ हे प्रत्येकाला मानवते, शक्य होतेच असे नाही. सुगम संगीत भावणा-या सामान्य वर्गाला प्रत्येक वेळी अशी संगीत-साधना जमतेच असे नाही. कित्येकदा शास्त्रीय संगीतामधील ताना, सम गाठणे, रागछाया, सुरांची बांधणी यांची मजा लुटण्यासाठी लागणारी त्या विषयाची मूलभूत माहिती सामान्य लोकांना असतही नाही. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, वाढत्या स्पर्धा, वैयक्तिक ताणतणाव यामुळे अलिकडच्या काही वर्षांत मनोरंजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मनोरंजन, चित्रपटनिर्मिती, विविध कॅसेट सी.डी. यांची निर्मिती ही आजच्या युवा भारतीयांची गरज बनली आहे.

लाईट म्युझिक किंवा हलके-फुलके सुगम संगीत हा कित्येक वर्षांपासून आवडीचा ठरणारा असा संगीताचा दमदार प्रवाह देशभरातून तसेच महाराष्ट्रातही वाहता राहिलेला दिसतो. ‘स्वरगंगेच्या काठावरती’ सारखे गाणे कुठल्या रागामध्ये बांधले आहे, (मारवा), याची माहिती नसताना देखील त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो. गुणगुणू शकतो. लाईट म्युझिक हे सामान्य जनांपर्यंत सहज पाझरते, ही एक बाजू तर दुसरीकडे संगीताला कला, शास्त्र याबरोबरच उद्योग हे परिमाण लाभले आहे.

सुगम संगीताबरोबरच संगीतसृष्टीला दखल घ्यावी लागते आहे असा एक महत्त्वाचा संगीत प्रकार म्हणजे, ‘फ्युजन म्युझिक’ होय. ‘फ्युजन म्युझिक’ ही तशी आधुनिक संकल्पना आहे. पौर्वात्त्य संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा अनोखा, हृद्य मेळ ह्या संगीतामध्ये असतो. पाश्चात्त्य संगीताबरोबर हिंदुस्थानी किंवा कर्नाटक अशा कोणत्याही पौर्वात्त्य संगीताशी खुबीने केलेला समन्वय यामध्ये असतो. सहाजिकच ‘फ्युजन म्युझिक’ शिकणाऱ्याला आणि विशेषत: ते शिकवणा-याला, हिंदुस्थानी, कर्नाटक तसेच पाश्चात्त्य संगीतावर प्रभुत्त्व असणे/मिळवणे हे अनिवार्य ठरते. अनेकानेक संमेळ/कॉम्बिनेशन्समुळे खरेखुरे ‘फ्युजन’ हे सदाबहारीचे, ताजे, सकस असे संगीत ठरते. ‘फ्युजन म्युझिक’च्या या बहुआयामी पैलूंवर जास्त प्रकाश टाकता आला पाहिजे, तसेच या बहुआयामी घटकाचा ‘फ्युजन म्युझिक’मध्ये कसून अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. त्यातून संगीत सादरीकरणाच्या अनेक नवनव्या शक्यता प्रत्यक्षात येतील.

‘फ्युजन म्युझिक’चा हिंदी चित्रपटसंगीतावरील प्रभाव लक्षणीय म्हणावा लागेल. प्रशिक्षित संगीतकार ही आजच्या मनोरंजन उद्योगाची महत्त्वाची गरज आहे. एफ् एम् रेडिओ, फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, जाहिराती या सर्वांसाठीच चांगले संगीत आवश्यक ठरते. प्रत्येक फिल्म्स किंवा कार्यक्रमामध्ये उद्दिष्टांनुसार, गरजेनुसार संगीत देणे हे एक कौशल्य आहे. जीवनाच्या नाना परींना व्यापून उरणारे फ्युजन संगीत हे आता एक सर्वस्पर्शी साधन झाले आहे. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये लागणारे संगीताचे धडे देणारा कोणताही शिक्षणक्रम सध्या कुठेच उपलब्ध नाही. यामुळे या क्षेत्रात येणारी मंडळी जुजुबी माहिती, तुटपुंजे आकलन याची शिदोरी घेऊन म्युझिक व्यवसायात प्रवेश करतात हे जवळून बघितल्यास लक्षात येते. परंतु स्पर्धेत टिकण्यासाठी, अपयश टाळण्यासाठी असा माफक अनुभव कामास येत नाही. उद्याच्या गरजा लक्षात घेऊन, तरूणाईच्या आशा-आकांक्षा ओळखून, श्री. अलेक्स डिसिल्व्हा आणि डॉ. स्वयंभू दिक्षीत यांनी ‘सेंट ऍण्ड्रयूज कॉलेज ऑफ फ्युजन म्युझिक’ची स्थापना केली. श्री. अलेक्स डिसिल्व्हा यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या ‘म्युझिक अकादमी ऑफ इंडिया’तर्फे हे महाविद्यालय स्थापन केले आहे.

या शिक्षणक्रमाच्या अभ्यासामध्ये संगीताशी निगडीत सर्व घटकांचा समावेश केलेला आहे. भारतीय संगीताचे मूलभूत शिक्षण, राग, ताल, ख्याल, ठुमरी, गझल याचे शिक्षण दिले जाते. तसेच पाश्चात्त्य संगीतामधील गोष्टींचा अंतर्भावही करण्यात आला आहे. स्टुडिओ रेकॉर्डिंग, साउंडस् चा विविध अंगांनी वापर, म्युझिक, ऑडिओ-व्हीडिओ तंत्रज्ञान आदि घटकांचा समावेशही या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. ध्वनी तंत्रज्ञान आणि ध्वनी मुद्रणाचा अनुभव विद्यार्थ्याना देण्यासाठी डिजीटल स्टुडिओची सोय उपलब्ध आहे. भारतीय व पाश्चात्त्य संगीतामधील उच्च विद्याविभूषित अनुभवी अध्यापकवृंद, चित्रपट सृष्टीतील म्युझिक अरेंजर, संगीत क्षेत्रातील मान्यवर गेस्ट फॅकल्टीज् या नात्याने विद्यार्थ्यांना अनमोल असे ज्ञान देतात. विद्यार्थ्यांमधील कौशल्याची चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास केंद्र, कलासादरीकरणासाठी अद्ययावत सभागृह व इतरही दर्जेदार आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांची पुढची वाटचाल सुखकर, यशस्वी ठरते. डिग्री शिक्षणाच्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इंटर्नशिपचं आयोजन आहे. या इंटर्नशिपमध्ये ख्यातनाम संगीतज्ञ, ध्वनीमुद्रक यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना लाभते.

नवीन कलावंतांना प्रशिक्षण देऊन त्यातूनही त्यांना रोजगार निर्मिती करणे हाही एक उद्देश प्रस्तुत कॉलेजची स्थापना करण्यामागे आहे. ‘कॉलेज ऑफ फ्युजन म्युझिक’मधून पदवी अथवा पदविका प्राप्त केल्यानंतर काय काय करता येते? फ्युजन संगीतामध्ये पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी हा सिने संगीत दिग्दर्शन, म्युझिक अरेंजर, संगीत अल्बम्स् काढणे, जाहिरातींचे संगीत, जॅझ बॅण्ड अशा निरनिराळया दिशांनी पुढे सरकू शकतो. विविध हॉटेल्समध्ये ‘फ्युजन’ संगीताचे कार्यक्रम करणें, टि.व्ही. मालिकांना संगीत देणे तसेच टि.व्ही.वरील संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे, हे देखील तितकेच सशक्त पर्याय आहेत.

‘फ्युजन संगीत’ आत्मसात करणे हे एक कौशल्य आहे. यासाठी पाश्चात्त्य तसेच भारतीय शास्त्रीय संगीताची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन्ही परंपरांची चांगली जाण, दोन्ही अंगांचा साकल्याने विचार असल्याशिवाय या दोन परंपरांचा मेळ घालणे, हे तसे अवघड काम आहे. एकाच वेळी पाश्चात्त्य व पौर्वात्त्य या दोन भिन्न प्रकृतीच्या संगीत शाखांचा संगत-बिंदू काय असू शकतो, याचा मूळातून विचार ‘फ्युजन म्युझिक’च्या विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे.

तर अशा प्रकारे अनेक संगीतधारा एकवटणारे हे कॉलेज प्रत्यक्षात येण्यासाठी श्री. अलेक्स डिसिल्व्हा यांना अथक परिश्रम करावे लागले. या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. फ्युजन समवेतच पाश्चात्त्य संगीतामध्ये देखील छंद, पदविका तसेच पदवी या कॉलेजमधून मिळवता येते. या कॉलेजच्या सल्लागार मंडळामध्ये सुरश्री जगजित सिंग, सारीका, वनराज भाटिया, फादर रॉडनी स्पॅरन्स, सुरेश वाडेकर, संगीत दिग्दर्शक राम संपत इत्यादि प्रभृती आहेत.

संपर्क
सेंट ऍण्ड्रयूज कॉलेज ऑफ फ्युजन म्युझिक,
सेंट डॉमनिक रोड, वांद्रे प., मुंबई ५०. भ्रमणध्वनी- ९८२१५४०६१९
रसिक हजारे