मराठी कोश वाड्मय

मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी

आनंद मासिकाचे संपादक श्री वा. गो. आपटे यांनी हा कोश १९१० साली तयार केला. यात मराठी म्हणी व संप्रदाय यांची माहिती दिलेली आहे. संप्रदाय म्हणजे वाक्प्रचार (ज्याला इंग्रजीमध्ये idioms असे म्हणतात). शिवाय मराठी म्हणींच्या समानार्थी असलेल्या इंग्रजी म्हणीही या कोशात दिलेल्या आहेत. ह्या कोशाचे पुनर्मुद्रणाचे काम वरदा प्रकाशनाने केले आहे.

प्रकाशक – ह.अ. भावे, वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – वा.गो. आपटे

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – २६०

किंमत – रु. ७०

मिळण्याचे ठिकाण
– वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

पाचहजार आदर्श सुविचार कोश

हा निवडक सुविचारांचा कोश आहे. डॉ. व. दि. कुलकर्णी हे नागपूर विद्यापीठाचे ग्रंथपाल आणि प्राध्यापक होते. शेकडा लोकांची हजारो पुस्तके वाचून त्यांनी निवडक सुविचार एकत्र केले आहेत. त्यांचे हे काम अखंड २५ वर्षे चालू होते. यावरून या कोशा मागील मोठे काम व त्यातील विचारधनाचे वैविध्य लक्षात येईल.

प्रकाशक – ह.अ. भावे,वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – डॉ. व.दि.कुलकर्णी

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – ६२७

किंमत – रु. ५००

मिळण्याचे ठिकाण – वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

संख्या संकेत कोश

श्रीधर श्यामराव हणमंते यांचा ‘संकेतकोश’ हा ग्रंथ मराठीतील एक विलक्षण स्वरूपाचा कोश आहे. श्री. हणमंते हे रेल्वेत स्टेशनमास्तर म्हणून नोकरी करीत. संदर्भ म्हणून उपयोगी पडणा-या ग्रंथाची त्यांनी अनेक कामे केली आहेत. प्रथम बिचकत बिचकत प्रकाशित केलेल्या संकेतकोशाची सहा वर्षात दुसरी आणि आणखी बारा वर्षात तिसरी आवृती निघाली. शिवाजी महाराजांच्या काळात जनार्दनपंत हणमंते आनि रघुनाथपंत हणमंते असे मुत्सद्दी बंधू होते. त्याच घराण्यातील हे कोशकार. त्यांच्या तिस-या आवृतीला ‘संख्या संकेतकोश’ असे नाव दिलेले असून त्यात दहा हजारापर्यत संख्याचे वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत.

‘साडेतीन शहाणे’ हा शब्दप्रयोग आणि त्यात नाना फडणीस अर्धा शहाणा, हे तुम्हाला माहिती असेल, पण राहिलेल्या तीन शहाण्यांची नावे या कोशात सापडतील. ते तिघे म्हणजे सखारामबापू बोकील, देवाजीपंत चोरघडे, आणि विठ्ठल सुंदर. सखारामबापू बारभाईच्या कारस्थानातील मुत्सद्दी , विठ्ठल सुंदर निजामाच्या दरबारातील मुत्सद्दी आणि देवाजीपंत चोरघडे नागपूरकर भोसल्यांच्या दरबारातील मुत्सद्दी म्हणून गाजले होते. आता बारभाई शोधण्याचा प्रयत्न केला तर ते कोशात सापडणार नाहीत; पण शोधता शोधता बारा बलुतेदार, बारा अलुते, बारा इमाम, बारा कडधान्ये सापडतील; मात्र बारा मावळे, बारा धान्ये सापडणार नाहीत. साडेतीन शहाणे पाहताना तुम्हाला साडेतीन मुहूर्त कोणते ते समजेल.

या प्रकाराने कुठलीही संख्या घेतली तरी अनेक गमतीजमती सापडतील. वेगवेगळया प्रकाराचे श्लोक किंवा सुभाषिते मिळतील. तीन संख्येबद्दल ‘पुस्तकं वनिता वित्तं परहस्तगतं गतम् | यदिचेत्पुतरायाति नष्टं भ्रष्टंच खंडितम् |’ (म्हणजे पुस्तक, स्त्री व पैसा या तीन गोष्टी जर परक्याच्या हाती गेल्या व परत मालकाकडे आल्या तर त्या भ्रष्ट, मोडलेल्या अशा अवस्थेतच येतात), चार संख्येबद्दल ‘तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात | मूर्खहस्ते न दातव्यम् एतद् वदतिपुस्तकम् |'( तेल, पाणी किंवा सैल बांधणी या तिन्ही गोष्टींपासून एखाद्याचे रक्षण करणे शक्य आहे, परंतु ती वस्तू जर एखाद्या मूर्खाच्या हाती पडली तर त्याचे रक्षण करणे अशक्य आहे . म्हणून मूर्खाच्या हाती ती लागू देऊ नये) असे श्लोक सापडतील. प्रत्येक संख्येबद्दलचे असे निवडक श्लोक पाठ करण्यासारखे आहेत.

चौदा विद्या, चौसष्ट कला, षड्रस म्हणजे सहा चवी, नाटकातील नवरस, बारा ज्योतिर्लिंगे, बत्तीस लक्षणे, छत्तीस गुण, बहात्तर रोग, शंभर कौरव असे संख्यावाचक संदर्भ वेळोवेळी आपल्या वाचनात, ऐकण्यात आलेले असतात; पण ते नेमके माहिती नसतात.

या कोशात साडेतीनशे विषयांवर पाच हजारांपेक्षा जास्त संकेतांची माहिती दिलेली आहे. अष्टप्रधान, सप्त पाताळ, अकरा नरक अशा प्रकारे शोधत जा किंवा कुठलेही पान उघडून वाचायला सुरुवात करा. तुमच्या ज्ञानभांडारात सतत भरच पडत राहील.

प्रकाशक – मनोहर यशवंत जोशी, ‘प्रसाद प्रकाशन’,१८९२ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. फोन-४४७१४३७

प्रमुख संपादक – श्रीधर श्यामराव हणमंते

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – ५७५

किंमत – रु. ५०

मिळण्याचे ठिकाण – मनोहर यशवंत जोशी, ‘प्रसाद प्रकाशन’,१८९२ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
फोन -४४७१४३७