मराठी कोश वाड्मय

मराठी विश्वकोश

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृध्दीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाची स्थापना १९ नोव्हेंबर १९६० रोजी झाली. या मंडळाने ‘मराठी विश्वकोश’ हे फार मोलाचे काम हाती घेतले. मराठीमध्ये ‘एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका’ प्रमाणे सर्वसंग्राहक विश्वकोश संपादित करून प्रकाशित करण्याचे काम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली वाई तेथे सुरू झाले. या कामात भारतातील अनेक विद्वान सहभागी झाले आहेत. प्रत्येकी एक हजार पानांचा एक असे वीस खंड प्रकाशित करण्याची ही योजना आहे. १९६१ मध्ये सुरू झालेल्या विश्वकोशाचे पहिले पाच खंड १९७५ मध्ये प्रकाशित झाले. त्या वेळी एक हजार पानांची मर्यादा संभाळली गेली होती. पुढचे खंड मात्र वाढत जाऊन अकराशे, बाराशे, चौदाशे पानांचे झाले आहेत. त्यामुळे वीस हजार पानांची ही योजना बावीस-तेवीस हजार पानांपर्यत जाईल अशी चिन्हे आहेत.

या कोशाचे सतरा खंड मुख्य मजकुराचे, अठरावा परिभाषा कोश, एकोणिसावा नकाशा खंड आणि विसावा सूचिखड अशी रचना राहील. हे ज्ञान सर्व लोकांपर्यत जावे म्हणून एका खंडाची किंमत अत्यल्प आहे.

मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा हा कोश आहे. त्याची भाषा मराठी असून कोशातील ज्ञानविज्ञानाची परिभाषा इंग्रजीच्या आधारे केली आहे. म्हणून इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी असा दुहेरी परिभाषासंग्रह (१८ वा खंड) कोशाच्या पहिल्या खंडापूर्वीच प्रकाशित केला गेला. रेखाचित्रे, छयाचित्रे,रंगीत चित्रे, आलेख,आकृत्या,नकाशे यांनी हे कोश परिपूर्ण आहेत. आजवर त्याचे १ ते १६ (‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण या नोंदी असलेला) व १८वा खंड प्रकाशित झालेले आहेत. १८वा खंड म्हणजे संदर्भासाठी केलेला परिभाषा कोश आहे.

विश्वकोशात मिळणारी माहिती विविध प्रकारची आणि परिपूर्ण असते. उदाहरणार्थ त्यातील ‘ताजमहाल’ ही नोंद पाहिली तरी त्याची कल्पना येईल. एक पुस्तक वाचून मिळणार नाही इतकी माहिती एकेका नोंदीत सापडते. चिनी आक्रमणाला पंचवीस वर्षे झाली त्या वेळी सर्व वर्तमानपात्रात आलेल्या लेखांमधील एकत्र माहितीपेक्षा विश्वकोशातील माहिती जास्त होती. त्यातील नकाशे तर अप्रतीम म्हणावे असे आहेत.

प्रकाशक सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, डी ब्लॉक, एन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई ४००००१
प्रमुख संपादक तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी
एकूण खंड २०, १ ते १६ व १८ वा खंड प्रकाशित
पृष्ठ संख्या सुमारे १००० पाने (प्रत्येक खंडाची)
किंमत रु. २५० प्रत्येकी
मिळण्याचे ठिकाण बालभारती, सेनापती बापट मार्ग, पुणे. फोन – ५६५९४६३
वेबसाइट http://balbharati.in

भारतीय समाजविज्ञान कोश

मराठी भाषेत सामाजिक शास्त्रांचा कोश संपादन करण्याची योजना १९७४ साली ठरविली गेली. १९७६ साली समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांच्या नोंदींची विस्तृत सूची करून या योजनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी ‘समाजविज्ञान मंडळ’ स्थापन केले गेले.

समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांच्या आणि त्यांच्या अनुषंगाने येणारे पूरक विषय यांविषयीचा हा कोश आहे. ही सर्व माहिती भारताच्या संदर्भात आहे हे त्याचे वैशिष्ठय. भारताची परिस्थिती, प्रगती, भारताच्या समस्या व संकल्प यांचा विचार या नोंदी करताना केला आहे. राज्यशास्त्रविषयक नोंदी करताना या कोशात स्वातंत्र्य, समता, लोकशाही, समाजवाद, अधिकार यांसारख्या मूलभूत तत्त्वांबरोबरच या संज्ञांचे अर्थ आणि कक्षा भारतीय राज्यघटनेच्या संदर्भासह दिलेल्या आहेत. अर्थनीती व अर्थपध्दती यांच्या नोंदी करताना आर्थिक सिध्दांत, अर्थतत्त्वांचा इतिहास या बरोबरच भारताचे आर्थिक नियोजन, समाजांचे राहणीमान, भारतातील उद्योग्धंदे, शेती, अर्थव्यवस्था, चलनव्यवस्था यांची माहिती दिलेली आहे. समाजशास्त्राच्या नोंदी करताना सामाजिक मूल्ये, व्यक्ती, कुटुंब व समाज यांचे परस्परसंबंध त्यांच्या परंपरा याचबरोबर भारतीय समाजाची रचना, भारतातील लोकजीवन, सामाजिक वर्ग, जाती-जमाती इत्यादी विषयांनाही प्राधान्य दिलेले आहे. परंतु ह्या कोशातील संदर्त्ब केवळ भारतविषयक माहितीपुरतेच मर्यादित नाहीत. जागतिक पातळीवरील विषयांचाही यथायोग्य व यथाप्रमाण समावेश यात करण्यात आला आहे. उदाहरणार्थ अलिप्ततावाद, अल्पसख्यांक, एकात्मता, आंतरराश्ट्रीय कामगार संघटना यात भारतीय व जागतिक दोन्ही संदर्भ दिले आहेत. चरित्रपर नोंदीत ऍरिस्टॉटल, रूसो, ऍडम स्मिथ याचबरोबर कौटिल्य, रामचंद्रपंत अमात्य, राममोहन रॉय, गांधीजी, आंबेडकर यांचेही विचार कोशात घेतलेले आहेत.

कोशाची भाषा मराठी आहे. याचे एकूण सहा खंड असून त्यातील ६ वा खंड हा पारिभाषिक शब्द संग्रह आहे.

प्रकाशक समाजविज्ञान मंडळ, ‘ज्ञानेश’, १२०५/४ शिवाजीनगर, पुणे ४११ ००४ ,
फोन ५५३२८१५
प्रमुख संपादक स. मा. गर्गे
एकूण खंड
पृष्ठ संख्या ३००० पाने सर्व खंड मिळून
किंमत रु. २०० प्रत्येकी
मिळण्याचे ठिकाण समाजविज्ञान मंडळ, ‘ज्ञानेश’, १२०५/४ शिवाजीनगर, पुणे ४११ ००४,
फोन – ५५३२८१५.