मराठी कोश वाड्मय

कृषिज्ञानकोश

मराठीतच नाही, तर कोणत्याही भारतीय भाषेत न झालेला एक प्रयत्न मराठीत करण्यात आला आहे तो म्हणजे ‘कृषिज्ञानकोश’. सोमवार, ६ नोव्हेंबर २००० ला पुण्यात या कोशाचा पहिला खंड प्रकाशित झाला. हा कोश अशोक महादेव जोशी यांनी संपादित केला आहे.

भारतीय संस्कृतीचा कृषी म्हणजे शेती, हा अविभाज्य भाग आहे. तरीही या विषयाबाबत योग्य प्रकारे माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. जगात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. राष्ट्र श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाला तांदूळ आणि गहू लागतोच. शेती करणा-या आपल्या शेतक-याला अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. उदा. फ्यूज म्हणजे काय, तो कशासाठी असतो, पंपाचे पाणी बंद झाले तर काय करायचे, वगैरे गोष्टी ठाऊक नसल्याने त्याला दुस-यावर अवलंबून राहवे लागते. त्यामुळेच तो लुबाडला जातो. म्हणून तो थोडा मेकॅनिक हवा, थोडा इलेक्ट्रिशियनही हवा. त्याला पशु-पक्ष्यांवर प्रथमोचार तरी करता यायला हवा. औषध मारायचा पंप दुरुस्त करता यायला हवा. तो कागदोपत्री मालक हवा, सातबाराचा, फेरफाराचा उतारा, इच्छापत्र इ. गोष्टी त्याला ठाऊक असायला हव्यात. म्हणजे त्याला कायद्याचे ज्ञानही हवे. ही गरज लक्षात घेऊन या कोशात ही माहिती घातलेली आहे.

याच बरोबर भारतात शेती किती प्रकारांनी होते, वापरायच्या साधनात किती वैविध्य आहे, अवजारांचे कसे अनेक प्रकार आहेत याची मनोरंजक माहिती आहेच, शिवाय तिचा अचानक उपयोगही होऊ शकतो. पूर्वीच्या वराहमिहिर, पराशर, शाडजर्धर यांसारख्या ऋषींनी बीजप्रक्रिया, औषधयोजना, रोगनियंत्रणासाठी त्याकाळी करण्यात येणारे उपाय, गुरांच्या रोगांवरील औषधे यांबाबत दिलेली माहिती संस्कृतमध्ये बंदिस्त होती. ती या कोशाद्वारे मराठीत उपलब्ध झाली आहे. याखेरीज जुन्या लोकांना ठाऊक असलेल्या अनेक गोष्टी काळाच्या ओघात गडप होतात उदा. मोट, तिच्यासाठी दोर कसा वापरावा वगैरे गोष्टी कालबाह्य झाल्या असल्या, तरी ही माहिती ग्रंथित होणे महत्त्वाचे आहे. वनस्पती आणि त्यांच्या नावांची माहिती तर कोशात हवीच. हा कोश मराठीनंतर सर्व भारतीय भाषांतून येणार असल्याने त्या सतरा भाषांतील नावे पुढील खंडात तर येतीलच. शिवाय लॅटिन व इतर मिळतील तेवढया भाषांतील नावे शिवाय औषधी वनस्पतींची माहितीही या कोशात दिली जाणात आहे. पारिभाषिक सूची अर्थातच आहे. थोडक्यात, कडधान्ये, तेलबिया, फळझाडे, भाजीपाला, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, तंतुपिके, तसेच शेतीशी संबंधित दुग्धव्यवसाय, म्हणजे गाय, म्हैस. शेळी पालन, रेशीमउद्योग, कुक्कुटपालन, वराहपालन, मधुमक्षिका पालन, उतिसंवर्धन (टिशूकल्चर), रतिगृह (ग्रीन हाऊस) तंत्र, कलमे, रोपवाटिका उद्योग, जमिनीचे प्रकार, बांध-बंदिस्ती, पाणलोट व्यवस्थापन, किडी व रोगांचे नियत्रंण, शेतीतील हत्यारे व साधने अशा विषयांवरील सर्व उपलब्ध माहिती या कोशात येईल. चित्रे, छायाचित्रे आणि आकृत्या यांची जोड या माहितीला आहेच.

प्रकाशक – भारतीय संस्कृतिकोश मंडळ,४१० शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०. फोन ४४५१९३९

प्रमुख संपादक – अशोक महादेव जोशी ( पंडित महादेवशास्त्री जोशी यांचे सुपुत्र)

एकूण खंड – १५, प्रकाशित खंड १

पृष्ठ संख्या – ३०० पाने प्रत्येकी

किंमत – रु. ५००० सर्व खंड मिळून (खंडांची संख्या वाढली तरीही किंमत तीच राहील.)

मिळण्याचे ठिकाण – भारतीय संस्कृतिकोश मंडळ,४१० शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०. फोन – ४४५१९३९

महाराष्ट्र चरित्रकोश

महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींचा त्रोटक परिचय करून देणारा ‘महाराष्ट्र चरित्र कोश’ नुकताच प्रकाशित झालेला आहे. इ.स. १८०० ते २००० या २०० वर्षांचा कालखंड घेऊन त्यांत होऊन गेलेल्या व आजही हयात असलेल्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश यात केलेला आहे. आपापल्या क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबरोबरच तूलनेत अगदीच बेताची कामगिरी असली तरी आपापल्या मर्यादित क्षेत्रात नोंद घ्यावी अशी काही वैशिष्ठयपूर्ण कामगिरी केलेल्यांचाही यात समावेश आहे.

इ.स. १८०० ते २००० हा कालखंड भारत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्त्वाचा काळ आहे. ब्रिटिशांचे आगमन, नव्या विचारांमुळे घडणारे सामाजिक परिवर्तन, स्वातंत्र्ययुध्द व स्वातंत्र्यानंतरची ५३ वर्षे याचा विचार करता अनेक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. धर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, शेती, उद्योग, सहकार, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, परमार्थसाधना, नाटय, संगीतादि कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील उल्लेखपूर्ण काम केलेल्या व्यक्तींची माहिती त्यात दिलेली आहे.

परंतु काही काही नोंदी इतक्या त्रोटक आहेत की त्यांचा उल्लेख केवळ नावापुरताच असल्यासारखे वाटते. तरीही एकूण विचार करता या कालातील महत्त्वाच्या १२४४ व्यक्तींची चांगली सूची तयार झाल्यामुळे हा चरित्रकोष वाचकांना चांगलाच उपयोग होईल. हा कोश कालांतराने अद्ययावतही करण्यात येणार आहे.

प्रकाशक – सुनिती पब्लिकेशन्स, १४५७/ब, शुक्रवार पेठ, पुणे ४११ ००२. फोन – ०२०-४४५१६५६,४४८०२९१

प्रमुख संपादक – श्री कामिल पारखे

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – २०२

किंमत – रु. २५०.००

मिळण्याचे ठिकाण – पुष्प प्रकाशन लिमिटेड, ३०२ ब, नारायण चेंबर्स, ५५५, नारायण पेठ, पुणे ४११०३० फोन-०२०-४४५२७९५