तुम्हाला माहिती आहे का?

अजब दुनिया – प्राण्यांचे राशीचक्र

परवा सहज कुणीतर बोलता बोलता अजब माहिती दिली. माणसाप्रमाणेच प्राण्यांच्याही राशी असतात! त्यांच्या जन्मवेळेप्रमाणे त्या ठरविता येतात. म्हणजे कुणी एक प्राणी इनामदार असेल, तर तो अमुक राशीचा, कुणी सातत्याने वखवखत असेल तर तो तमुक राशीचा, दारासमोर दाणे वेचणारी ही चिमणी या राशीची, दाणे वेचताना इतर दोघींना दूर करणारी दुसरी चिमणी अजून कुठल्या राशीची, एसा कुणी ‘ऍनिमल राशीचक्राचा’ अभ्यास केला तर? हाताला चावणारे डास वेगळया राशीचे, पायाचा कडाडून चावा घेणारे निराळे, असे भविष्याच कुणी मांडून बसले तर….

घरात सर्वांना चोरून दबक्या (मांजरीच्या) पावलांनी आत घुसून दूध पिणार्‍या आणि सर्वांसमोर बेधडकपणे खिडकीतून आत उडी मारून येणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या मांजरींच्या राशी कशा काय सांगणार बरं…? आजकाल काही मांजरी कितीही हाकलले, तरी जागच्या हालत देखील नाहीत, उलट त्या आपल्यालाच गुरकावतात! रात्री उशिरा घरी परतताना गाडीमागे लागणारे, धावत भुंकत सुटणारे कुत्रे आणि निमूटपणे मालकाच्या दारापाशी पहुडणारे (भूंक म्हटले, तरी न भुंकणारे) कुत्रे यांचा फरकही या मंडळींनी ‘राशीचक्रात’ बसवलाय!

शिंगांनीमस्ती करणार्‍या, ‘गरीब गाय’ हा शब्द सार्थकी लावणार्‍या, रस्त्यात नको तिथे बसणार्‍या, गायींचेही त्यांच्या राशीनुसार कुणीतरी वर्गीकरण करून टाकले तर….तुरूतुरू धावणारी झुरळं, नको तिथे घोटाळणाऱ्या काळयाकुट्ट माश्या, माणसांच्या घरात कधीही कुठेही शिस्तीत फिरणार्‍या मुंग्या, जुन्या कापडात, कापसात, गालिच्यांखाली दडणारे ढेकूण यांचे ‘राशीकरण’ करण्यासाठी हातात मुव्ही कॅमेरा घेऊनच बसावं लागेल… त्यांच्या सवयी टिपण्यासाठी!

अचानक खिडकीतून भिरभिरत येणारी फुलपाखरं, मध्येच केव्हातरी सर्रर्रकन घरात घुसणारे, इलेक्ट्रिकच्या सॉकेटमध्ये घुसून कुजबुजणारी आणि काम झालं, की तितक्याच झर्रर्रकन परत पळणारी मधमाशी यांच्या राशी कसं काय ठरविणार बुवा? दूध नासविणार्‍या, लोणचं आंबविणार्‍या, इडली फुगविणार्‍या सूक्ष्मजीवांची जन्मवेळ कोण आणि कशाला काढत बसेल?

हे झाले माणसाच्या सान्निध्यात वावरणार्‍या सजीवांचे राशीचक्र! पण निसर्गातील इतर लाखो वैशिष्टयपूर्ण सजीवांच्या राशी ठरविता-ठरविता नाकी नऊ येईल. हवेत उंच झेपावणार्‍या पक्ष्यांच्या राशींसाठी दुर्बिण वैगरे घेऊन बसावे लागेल. दिवसभर हिंडूनही खाद्य न मिळणार्‍या प्राण्याला ‘साडेसाती’ च्या चक्रात झक्कास अडकवता येईल. तुम्हीच अगदी ठरवून मारल्यासारखे नजर ठेवून ‘खल्लास’ केलेल्या एखाद्या मच्छराला राहू, केतू, शनिच्या ‘वक्रदृष्टी’ पेक्षा तुमचीच वक्रदृष्टी महागात पडेल!

हे ही ठीक…पण काय हो, मातीत अगदी नकळतपणे, अंकुरणार्‍या इवल्याश्या रोपटयांची जन्मवेळ कशी काय सांगणार? ही जन्मवेळच नाही समजली तर मग वनस्पती-प्राण्यांच्या राशीचक्राचे काय होणार…!!
त्यापेक्षा नकोच हे चक्र.!!

महाकाय शार्क

महाकाय शार्क समुद्री अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानावर असणारा, करवतीच्या पात्यांसारखे दात असलेला म्हणूनच त्याचे शास्त्रीय नाव आहे. ‘कार कॅरोडॉन’ ‘कारकॅरिऍस’ हया महाकाय शार्कची जास्तीत जास्त लांबी बावीस तेवीस फूट असू शकते. अपवादात्मक उदाहरणांमध्ये हीच लांबी पंचवीस फूटापर्यंतही जाऊ शकते आणि हया शार्कचे वजन …सहा हजार पौंड! म्हणूनच तर महाकाय शार्कला इंग्रजीत ‘ग्रेट व्हाईट शार्क’ असे संबोधतात. पण हया शार्कची वाढ अतिशय हळूहळू होत असते. वर्षाला साधारण सात-आठ इंच वाढ आता सांगा बरं, बावीस फूटाचा शार्क मासा किती वर्षांचा असेल? जन्मत: तीन ते पाच फूट लांबी असणारा हा मासा कमीत कमी तेवीस व त्यापेक्षा अधिक वर्षे समुद्रात वास्तव्य करत असतो. ज्याप्रमाणे कापलेल्या झाडाच्या खोडातील वलय मोजून झाडाचे वय सांगता येते, त्याचप्रमाणे शार्कच्या हाडांपासून शार्कचे वय काढता येईल का, यावर शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.

हया माशांचा पाण्यात पोहण्याचा वेग दोन-तीन मैल प्रति तास असतो. पण स्वसंरक्षणार्थ हाच वेग ताशी चाळीस मैल इतका वाढूही शकतो. आहे ना चमत्कारिक! शार्कची दृष्टीही अशीच केवळ लांबचं पाहू शकणारी. जवळचं त्यांना काही दिसतच नाही. शार्कचे डोळे जवळचा प्रकाश परावर्तित होऊच देत नाही. त्यामुळे ही अशी लांबदृष्टी! शार्क मासे समुद्रातील इतर महाकाय व भयावह प्राण्याच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. इतर समुद्री सजीवांच्या आकर्षक, चमकदार रंगांमुळेही शार्क त्याची शिकार करतात. समुहावर हल्ला करण्यापेक्षा, समुद्रातून मागे राहिलेल्या, समुद्रात एकटया पडलेल्या सजींवावर हल्ला करायला शार्कला जास्त आवडते. त्यामुळे समुद्राच्या तळाशी जाऊन संशोधन करणारे वैज्ञानिक गटागटाने समुद्रात उतरतात.

समुद्रात सातत्याने होणारे प्रदूषण, तेलवाहू जहाजे फुटल्याने होणारे ऑईलस्पीलस्, शार्क माशांची मानवी स्वार्थासाठी होणारी शिकार समुद्रातील जैवसंपदेस घातक ठरत आहेत. शार्कपासून बचावासाठी काही समुद्री सजीव रंग बदलून दूर निघून गेल्याचा आभास निर्माण करतात. त्यामुळे जवळचे फारसे पाहू न शकणा-या शार्कच्या हल्यापासून ते बचावतात. मानवी हव्यासापासून बचावासाठी शार्क माशांनाही असंच काहीसं करता आलं असतं तर…..

स्पायडरमॅन सारखे आपणही भिंतीवर चालू शकतो?

हातातले घडयाळ आणि घरातील पाल यांचा काय संबंध असा निष्कर्ष काढण्यापूर्वी एक प्रयोग करून बघा. पालींना भरदिवसा घराबाहेर न मारता, न फवारता काढण्यासाठी हे घडयाळ मस्त कामास येते. भिंतीवरच्या पालीच्या आसपास तुमच्या हातातील घडयाळाने उन्हाने आलेला कवडसा (रिफ्लेक्शन) फिरवून बघा. त्या किरणांनाच कीटक समजून ही पाल झक्कास त्या परावर्तनावरच हल्ला करू बघते. हळूहळू हे परावर्तन दाराच्या, खिडकीच्या बाहेर चमकवा. तुमच्या घरातील पाल तिच्याही नकळत तुमच्या घराबाहेर पडेल!
आता तुम्ही म्हणाल लहान मुलांना हे काय पालीच्या नादी लावायचे….शी! काहीतरीच!

पण भिंतीवरून कुठूनही कशाही फिरणा-या पालीकडून माणूस खूप काही शिकू शकतो. तुमच्या घरात बाहेरून अचानक उडून येणा-या कितीतरी किडे-कीटकांना पाली फस्त करतात व त्यांची संख्या मर्यादित ठेवतात. त्यांचे हे सर्व हल्ले आपण आपल्याच घरात ‘लाईव्ह’ अभ्यासू शकतो. सरडयांप्रमाणेच पालीदेखील काही प्रमाणात त्यांचे रंग बदलून परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. अंधारात वावरणा-या पाली काळयाकुट्ट तर ब-यापैकी उजेडात फिरणाऱ्या पाली भुकरट पांढ-या दिसतात. झाडाच्या आडोशाला लपणा-या, नारळाच्या फांद्यामधे दडणा-या पाली त्या त्या ठिकाणची थोडीशी ‘शेड’ त्यांच्या त्वचेवरही आणतात आणि आपल्यासारख्याला दिसूनही दिसेनाशा होतात! काही पाली अत्यंत विषारी असतात. पण त्यांच्या अंगावर, तोंडात अढळणा-या सूक्ष्म जीवांमुळे.

पालींच्या पायाच्या विशिष्ट मऊ गाद्यांमुळे व हजारो लहान लहान केसांमुळे त्या भिंतीवर चालू शकतात. भिंतीवर चालण्यात त्यांना काही ठराविक विद्युत लहरीही त्यांना मदत करतात. या व लहरींची फारशी माहिती माणसाला अजूनही मिळालेली नाही. पण पालींसारखे हात-पाय (पायच!) माणसाला विकसित करता आले तर आपणही भिंतीवर चालू शकतो. कुणाच्याही आधाराशिवाय… अगदी ‘स्पायडरमॅनच्या शोसारखे!’

मनुष्यप्राण्याला पालींसारखे पाय नसले तरीही आपण पालींच्या पायांशी साधर्म्य असणारे असे काही कृत्रिम अवयव बनवून ते हातात, पायात अडकवून भिंतीवर ये जा करू शकतो. इमारतीच्या पाचव्या, सहाव्या मजल्यावरही एखादी व्यक्ती जिना, लिफ्टन वैगरे न जाता भिंतीवरूनच झपझप चढून गेली तर…काही प्रयोगशाळांमध्ये असेच तर प्रयोग सुरू आहेत! त्यासाठी शेकडो पालींचा अभ्यास व निरीक्षण सुरू आहे…

आळशी सिंह आणि हुशार हत्ती

कल्पना करा की, एखादा कोळी त्याचं भलं मोठ्ठ जाळं समुद्रात टाकून बसलाय… मासे अडकण्याची आतुरतेने वाट बघत … कोळयाने समुद्रात ठाकलेले जाळे जवळजवळ एंशी मीटर खोल गेले आहे आणि अचानक जाळयात मासे नाही, पण त्यांची अंडी अडकतात! अहो… हो व्हेल शार्क नावाचे मासे समुद्रात पुष्कळ खोलवर जाऊ शकतात आणि तिथेच ते त्यांची अंडीदेखील देतात. ही अंडी जगातील सर्वात मोठी अंडी म्हणूनच प्रसिध्द आहेत. किती मोठी असतील बरं ही अंडी? सर्वप्रकारच्या समुद्री माशांमध्ये तीस सेंटीमीटर लांब, चौदा-पंधरा सेंटीमीटर रुंद, जवळपास दहा सेंटीमीटर उंच अशी ही अंडी समुद्रात ‘उठून’ नाही दिसली तर नवलच !

समुद्रातल्याच देवमाश्याचंही असंच एक वैशिष्टय. हे महाशय झक्कास ‘डायव्हिंग’ करतात समुद्रात… जवळ-जवळ दीड हजार मीटर खोल ! जगातील ‘सर्वात मोठा’ प्राणी अशी स्पर्धा घेतली, तर हत्तीचंच अढळस्थान आहे. पण आपल्या भारतातील हत्ती त्यांच्या आफ्रीकन ‘मित्र-मैत्रिणींपेक्षा’ थोडे लहानच असतात. त्यामुळे आफ्रिकन हत्तीच ‘सर्वात मोठा’ ची स्पर्धा जिंकतात ! पूर्णपणे शाकाहरी असूनही ते धष्टपुष्ट असतात. सर्व आफ्रिकन हत्तीमध्ये आजपर्यंत एकच ‘अतिउंच’ म्हणून समजला जातो. पण दुदैवाने तो पन्नास वर्षापूर्वी मारला गेला. चार मीटर उंच, दहा मीटर लांब व जवळपास १३ टन वजन इतका ‘भारदस्त’ होता तो ! त्याचे हे भारदस्त व्यक्तीमत्व त्याच्या सांगाडयाच्या रुपाने अमेरिकेत संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. हत्तीच्या दातांचे… एकाच दाताने वजन किती असेल हो… ? जवळपास पन्नास किलो !!!!

आता जरा बघू मगरींचे विश्व. नेहमीच सुस्तावून पडून राहण्यात त्यांचा पहिला नंबर लागतो. कधी अगदीच ‘आणीबाणी’ उद्भवली, तर त्या हत्तीलाही त्यांच्या विळख्यात पकडू शकतात. पण एरवी मात्र त्या शिकार वैगरे करण्यासाठी अजिबात कष्ट करत नाहीत. ‘असेल हरी, तर देईल समुद्रातळी’ अशी खास म्हण त्यांच्यासाठी तयार करता येईल ! याचे कारणच तसे आहे. ह्या मगरी इतक्या सुस्तपणे पडून राहतात की, त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच इतर पक्षी-प्राण्यांना होत नाही आणि ती जाणीव होईपर्यंत भक्ष्य थेट मगरीच्या जबडयात ! मगरीचे अजून एक वैशिष्टय म्हणजे त्यांचे दात. दातांचा वापर अन्न चावण्यासाठी असतो, हे समीकरणच मगरींनी बदलून टाकले आहे. दातांचा वापर त्या फक्त भक्ष्य पकडण्यासाठी करतात. नंतर त्यांचा ‘आंळस’ सांभाळत ते भक्ष्य त्या फस्त करतात. पोट एकदा भरले, की पुन्हा आरामच आराम!

समजा ह्या मगरींना दोन-चार दिवस खाद्यच मिळाले नाही, तर काय होईल हो ? ‘कशासाठी…. पोटासाठी’ वगैरे म्हणीदेखील त्यांना लागू होत नाहीत. अन्न मिळाले नाही, तर त्या ऊन ‘खात’ बसतात, समुद्र, नद्यांच्या काठावर ! त्यातूनच त्यांना ऊर्जादेखील मिळते. विश्रांती घेत पडून राहण्यात नरसिंहदेखील आघाडीवर असतात. संपूर्ण आयुष्यात ते खुपच कमी काळ शिकार वगैरे करतात. मादी सिंहांवरच नरांनाही ‘खाऊ’ घालायची जबाबदारी टाकून ते मोकळे होतात! बच्चेकंपनीला शिकवायचे, फिरवायचे, खाऊ घालायचे कामही तिचेच, नर सिंह फक्त ‘झोपा’ काढतात.

झोपेचा कंटाळा आला की झक्कास आठ-दहा किलोमिटरपर्यंत ऐकू जाणारी दमदार डरकाळी फोडून मोकळे होतात…. म्हणूनच त्यांना ‘जंगलचा राजा’ म्हणत असावेत! सुस्तावणा-या, अत्यंत आळशी प्राण्यांमध्ये सिंहाचाच नंबर वरचा असतो. सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरींचा आणि अफाट सहनशक्तीत, एकमेकांना समजून घेऊन कळपा-कळपाने प्रवास करण्यात, मादी हत्तीकडे कळपाची सत्ता सोपविण्यात आणि विलक्षण स्मरणशक्तीत हत्तींचाच ‘पहिला नंबर लागतो.. हे मात्र अगदी खरे!

त्यामुळे, अनुकरणच करायचे झाले, तर हत्तींना ‘आदर्शवत’ मानायला हरकत नाही !!!

प्राची पाठक – नाशिक