तुम्हाला माहिती आहे का?

हॅलो हॅम

‘हॅलो हॅम!’ हे शब्द वाचल्याबरोबर तुमच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला असेल, की ‘हॅम’ म्हणजे काय? हॅलो हया शब्दावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच की टेलिफोन आणि हॅमचा काहीतरी संबंध असला पाहिजे.

अगदी बरोबर, मित्रांनो! वरवर पाहता हॅम यंत्रणा, टेलिफोन यंत्रणेसारखी वाटते. पण हया दोन्हीत एक मोठा मूलभूत फरक आहे. सर्व टेलिफोन हे एकमेकांना तारांच्या द्वारे जोडलेले असतात, पण हॅम यंत्रणा मात्र रेडियो लहरींवर चालते व त्याला म्हणतात बिनतारी संदेश यंत्रणा आणि यावर आधारीत आहे हॅमचा रोमांचकारी छंद. तुम्हाला माहीतच आहे की, मार्कोनीने रेडियोचा शोध लावला. पुढे हर्टज्, आर्मस्ट्राँग आणि मार्कोनी हया तिघांनी मिळून, विद्युत चुंबकीय लहरींद्वारे संदेश पाठविण्याचा शोध लावला. त्यामुळे हया तिन्ही शास्त्रज्ञांच्या अद्याक्षरांवरून HAM हॅम हा शब्द अस्तित्त्वात आला.

१९०१ मध्ये पहिला बिनतारी संदेश इंग्लंडहून न्यू फाऊंडलंडला पाठविला आणि मार्कोनीपासून स्फूर्ती घेऊन अनेक रेडिओ प्रक्षेपण केंद्रे उभी राहिली. मात्र त्यावर सरकारी नियंत्रण आले. कही ठराविक लघुलहरींचा वापर करून, संदेश पाठविण्याच्या कल्पनेतून हौशी रेडिओ केंद्रांची निर्मिती झाली. हा हौशी रेडिओ म्हणजेच ‘हॅम रेडिओ’ आणि त्याचा वापर करणारे हौशी कलाकार म्हणजेच ‘हॅम्स’. आवड, जिज्ञासा आणि कुतूहलापोटी जगातील निरनिराळया देशातील लोकांशी बोलता यावे, मैत्री करता यावी या रोमांचकारी कल्पनेतून हॅमचा छंद सुरू झाला. तिकीटे जमविणे, नाणी जमविणे तसे एकमेकांशी संभाषण करून माहिती मिळविणे व एकमेकांना मदत करणे, हे या छंदाचे उद्दिष्ट आहे.

आपण ब-याच वेळा पाहतो की, मोठया प्रमाणावर येणारे पूर, भूकंप इ. मुळे गावे उध्वस्त होतात. झाडे पडून विजेच्या तारा तुटतात आणि त्या गावाचा इतर भागांशी संपर्क तुटतो. अशा वेळी हॅम रेडिओ द्वारा त्या भागातील लोकांशी सतत संपर्क ठेवून त्यांना हवी असलेली मदत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पोहोचविता येते. गुजराथमधील मोरवी येथे आलेला प्रचंड पूर आणि महाराष्ट्रातील लातूर गावातील भयंकर भूकंपाच्या संकटात, हया हॅम्स मंडळींनी फार मोठे कार्य केले आहे.

४ फेब्रुवारी १९७८ रोजी केरळमध्ये घडलेली ही घटना. ६ वर्षांचे एक बालक ल्युकेमियाने (रक्ताचा कॅन्सर) आजारी होते. त्याला हवे असलेले औषध कोचीनमध्ये उपलब्ध नव्हते. म्हणून कोचीनमधील हॅमने हाँगकाँगमधील हॅमशी संपर्क साधून प्रयत्न केला. दिल्लीतील एका हॅमने लंडनमधील एका हॅमला कळविले. स्टॉकहोम येथे हे औषध असल्याचे समजले, व लगेच ते मनीला येथे आणून, विमानाने मुंबईमार्गे कोचीनला रवाना झाले. हया सर्व गोष्टी केवळ २४ तासात घडून, वेळेवर औषध मिळाल्यामुळे त्या बालकाचे प्राण वाचले.

वरील घटनेवरून एक गोष्ट लक्षात आली असेल की एखादा संदेश रेडिओ लहरींद्वारा एकाच वेळी कितीही ठिकाणी पसरू शकतो आणि कुठूनतरी मदत मिळते. मात्र जिथे संपर्क साधायचा तेथे हॅम रेडिओ केंद्र असायला हवे. त्यामुळे पूर किंवा भूकंपाच्या ठिकाणी आपापले रेडिओ घेऊन हॅम हेलिकॉप्टरच्या मदतीने उतरतात आणि मोठया शहरांतील हॅमशी संपर्क साधतात.

अशाच पध्दतीने समुद्रातील वादळात सापडलेले बोटीवरील खलाशी, गिर्यारोहक, हिमालयातील कार रॅलीतील स्पर्धक, यांच्याशी संकटकाळात किंवा येणाऱ्या संकटाची सूचना देऊनही हॅम मदत करू शकतात.

हॅम रेडिओ हा जरी हौशी छंद असला तरी, त्याच्याद्वारे इतर देशात संपर्क साधता येत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये, म्हणून सरकारने काही बंधने घातली आहेत. सर्वप्रथम म्हणजे, हया छंदांचा उपयोग पैसा कमावण्यासाठी करता येत नाही. तसेच कुठल्याही प्रकारचा राजकीय संपर्क यावरून साधता येत नाही. जाहिरात किंवा व्यापारासाठी हया रेडिओचा वापर करता येत नाही. हया नियमांचे पालन करण्यासाठी सर्व ठिकाणच्या संभाषणांवर सरकारी नियंत्रण असते. कोणी गैरवापर केला
तर त्याला शिक्षा मिळते, म्हणजे, त्याचा परवाना रद्द होतो.

ज्याप्रमाणे गाडी चालविण्यासाठी ड्रायव्ंहिगचा परवाना लागतो, त्याप्रमाणे हया हौशी रेडिओचा वापर करण्यासाठी सरकारी परवाना लागतो. विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर, वकील, कोणीही भारतीय नागरिकाला हॅम बनता येतं. मात्र यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि थोडं इलेक्ट्रॉनिक्सचं जुजबी ज्ञान आवश्यक असतं. कारण परवाना मिळवण्यासाठी परिक्षा द्यावी लागते. त्यासाठी ‘मोर्स कोड’ नावाची भाषा शिकावी लागते. ही सांकेतिक भाषा असून त्यामुळे संभाषण थोडक्यात करता येते. हॅम रेडिओ बनविण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. मुंबईत वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र व गोराई येथील दळणवळण मंत्रालयाचे कार्यालय, येथे हा अभ्यासक्रम शिकविण्याची सोय आहे. प्रत्येक देशात मोठया शहरांमधून हॅम क्लब असतात. तेथील मंडळी हॅम बनू इच्छिणाऱ्याला सर्व प्रकारची मदत करतात.

आजकाल टी. व्ही. च्या आकर्षणामुळे रेडिओ विशेष वापरला जात नाही. पण गंमत म्हणून रात्रीच्या शांत वेळी रेडिओ चालू करून, लघुलहरी स्टेशन फिरवित राहिलात तर, मधेच कुठेतरी हॅमचे मोर्स भाषेतील संकेत ऐकू येतील. अर्थात ते समजायला तुम्हाला हॅम बनायला हवे. टी. व्ही. रेडिओप्रमाणे हॅम रेडिओसाठी संदेश ग्रहण करायला अधिक शक्तिशाली ऍंटेना लागते. आजकाल आपण टी. व्ही. वर हाँगकाँगहून प्रक्षेपित केलेले कार्यक्रम पाहतो, किंवा कोणत्याही देशात खेळल्या जाणाऱ्या खेळांचे थेट प्रक्षेपण उपग्रहाद्वारे पाहू शकतो. असाच एक ‘ऑस्कर’ नावाचा उपग्रह अमेरिकेने खास हौशी हॅम्ससाठी अंतराळात सोडला आहे. त्यामुळे दूरवरून येणारे संदेश अधिक स्पष्ट येऊ शकतात.

अशा प्रकारे कार्य करणारे दोन दशलक्ष हॅम्स सध्या पृथ्वीच्या पाठीवर आहेत. जपानमधील हॅम्सची संख्या सगळयात जास्त असून, भारतातील हॅम्सची संख्या सर्वात कमी आहे. कारण हया छंदाबाबत होणारा प्रचार फारच कमी असून, हॅमचे रेडिओ बनविण्यासाठी येणारा खर्च बराच मोठा आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, तंत्रज्ञान संस्था हया सर्वांनी पुढाकार घेऊन हॅम रेडिओसाठी लागणारी छोटी स्टेशन्स तयार करण्यासाठी मदत केली, तर अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घ्यायला तयार होतील. आणि देशासाठी, समाजासाठी कार्य करू शकतील.

२४ मार्च हा जागतिक हॅम दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच ‘जंबोरी ऑन दि एअर’ म्हणजेच दरवर्षी ऑक्टोबरमध्ये एका ठराविक दिवशी अवघ्या जगातील लहान मुले हॅम रेडिओद्वारे परवान्याशिवाय एकमेकांशी बोलू शकतात. चला तर मग, भारतातल्या हॅमविषयी आणखी माहिती मिळवून ऑक्टोबरमधील ‘त्या दिवशी’ हॅमशी संवाद साधूया !

सौ. ज्योतिका चितळे