बालकवयित्री | राधिका लाड |
उन्हाळयाची सुटी अशी घालवू या... | नुपूरमाधुरी तिजारे |
एक ना धड भाराभर चिंध्या | रौनक पत्की |
'बटाटयाची चाळ' | अर्निका प्रकाश परांजपे |
बास झालं आता उतरवा मुखवटा | अर्निका प्रकाश परांजपे |
चित्रांच्या दुनियेत नवनिर्मिती करणारी 'सृष्टी' | अर्चना जोगळे |
ऑस्करच्या पडद्यावर 'लगान' | प्रेरणा भास्कर महाजन |
माझा अविस्मरणीय अनुभव | प्रेरणा भास्कर महाजन |
सृष्टी आशिष वर्तक
वय – सहा वर्षे
दि. 9 जानेवारी ते 14 जानेवारी 2003भाऊ दाजी लाड कला दालन (वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान, भायखळा) येथे चित्र-प्रदर्शन भरले.
* वयाच्या चौथ्या वर्षी ‘ऑल इंडिया कॅम्लीन कलर कॉन्टेस्ट’मधे राज्य पातळीवर तृतीय क्रमांक पटकाविला
* CRY- (चाईल्ड रिलीफ ऍन्ड यू) या अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या आंतरारष्ट्रीय संस्थेने सृष्टीची पाच चित्रे घेतली आहेत.
* प्रचिती नाटयसंस्थेच्या नाटकामधून लक्षणीय अभिनय
* शाळेतील स्पर्धांमधून तसेच तालुका व जिल्हा पातळीवरील स्पर्धांतून अनेक बक्षिसे पटकावली आहेत.
* शास्त्रीय नृत्याचे शिक्षण सुरू आहे.
* सपर्काचा पत्ता: सी, 102, महासागर, पहिला मजला, पंडित वाडी, विरार (पू)
* दूरध्वनी: 95250-2527477
सृष्टीच्या कलेला रसिकांकडून मिळालेली मनमुक्त दाद
1. ‘उत्तम कलाविष्कार, उत्तम रंगसंगती, उत्तम विचारसरणी, उत्तम आकलनशक्ती यांचा मिलाफ म्हणजे सृष्टी’
2. ‘आम्ही देखील सृष्टीसारखीच छान छान चित्रे काढणार’ – लहान मुलांची प्रतिक्रिया
3. एका कला-रसिकाला सृष्टीची चित्रे पाहून सुचलेली कविता:
‘सृष्टीतील सारे, सृष्टीमय फुलोरे,
सृष्टीच्या रंगात, रंगले वारे॥1॥
कुंचल्यात अवतरली, बालमनातली दृष्टी,
इंद्रधनुसम प्रकटली, चित्र्रांणात सृष्टी॥2॥
सहा वर्षांचे कोवळे वय म्हणजे, खेळण्या-बागडण्याचे! एकूण पाहता, सहा वर्षांचे मूल म्हणजे, अजाणच! परंतु कलावंतास वयाची बंधने नसतात हे देखील तितकेच खरे आहे. विरार येथील सहा वर्षांची ‘सृष्टी आशिष वर्तक’ ही अशीच एक उत्कृष्ट बाल-चित्रकार!
सृष्टाविषयी सांगायचे झाल्यास वयाच्या दोन ते अडीच वर्षांपासून ती पाटीवर चित्रे काढायची. तिला सांगण्यात आलेल्या कथांतील पात्रांना अनुसरून, ती तिच्या कल्पनांतील व्यक्ती चित्रांच्या रूपात पाटीवर साकारायची. सृष्टीच्या शाळेतील कलाशिक्षिका शुभांगी फडके यांचे तिला मार्गदर्शन आहे. गेली तीन वर्षे ती त्यांच्याकडे चित्रकलेचे धडे घेत आहे. घरातील कोणाकडूनही सृष्टीला चित्रकलेचा वारसा मिळालेला नाही. विरार येथील ‘नरसिंह गोविंद वर्तक इंग्लिश हायस्कूल’मध्ये सृष्टी शिकत आहे. सृष्टीच्या आई सौ. वंदना वर्तक हया व्यवसायाने डॉक्टर आहेत. तिचे वडील श्री. अशिष वर्तक हे मरीन इंजिनियर आहेत.
‘चाईल्ड आर्ट’ची व्याख्या म्हणजे, ‘कोणत्याही शैलीचा प्रभाव नसलेली आणि आत्माविष्कार असलेली अशी कला’ होय.प्रतिसृष्टीतून खऱ्या निसर्गातील तथ्य पकडण्याचा प्रयत्न हया चित्रांतून केला आहे. सृष्टीची तिच्या कलेवर असलेली छाप ही अविकृत व निरागस आहे. तिच्या सर्व चित्रांमधून बालकांचे भावविश्व साकारले आहे, बहरले आहे. रंगांची आणि रचनेची सुंदर जाग आपणांस तिच्या चित्रांतून पाहावयास मिळते. शाळेत जाणारी सृष्टी, आई-बाबा आणि सृष्टी, मैत्रिणींबरोबर पावसांत खेळणारी सृष्टी, बागेत खेळणारी सृष्टी, सृष्टीचा वाढदिवस… स्वत:च्या संदर्भातील असे अनेक विषय निवडून सृष्टीने आपली चित्रे साकार केली आहेत. अतिशय सुंदर, ताजी कोवळी भावना, आणि ती देखील सहा वर्षांच्या वयात आपल्या चित्रांतून व्यक्त करणे ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.
चित्रकलेबरोबरच इतर कलागुणांत देखील सृष्टीने प्राविण्य मिळविले आहे. नृत्य, गायन, वक्तृत्त्व, अभिनय अशा नाना कलांची तिला आवड आहे. एक अष्टपैलू कलाकार म्हणून होत असलेला सृष्टीचा विकास हा लक्षात आल्यावाचून राहात नाही. सृष्टीच्या यशामधे तिच्या आई-वडीलांचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या सपर्धेच्या युगात पालक आणि पाल्य यांच्यातील सुसंवादामधे दरी निर्माण होत चालली आहे. घरातील आई-वडील दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडतात. अशा वेळेस हान मुले टि. व्ही. वरील कार्यक्रम, संगणकावरील खेळ, व्हिडियो गेम्स- अशा कृत्रिम साधनांना जवळ करतात. परिणामत:, लहान मुलांमधील उपजत गुणांना प्रोत्साहन मिळत नाही, व त्यांच्या विकासाला बाधा निर्माण होते. अशा या युगात वर्तक दाम्पत्य हे इतर पालकांसाठी आदर्श ठरले आहेत. आपला व्यवसाय सांभाळून सृष्टीतील उपजत गुणांना प्रोत्साहन देण्यातील त्यांचे सातत्य वाखाणण्यासारखे आहे.
सृष्टीने एक चांगली कलाकार व्हावं असे आपल्याला वाटते का? – या प्रश्नावर डॉ. वर्तक म्हणाल्या, चित्रकलेकडे तिने करियर या दृष्टीने पाहावे असा माझा आग्रह नाही. परंतु तिला जर त्यातच करियर करण्याची इच्छा असेल तर आम्ही तिला नक्कीच पाठींबा देऊ. तिचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू. पण अजून ती खूपच लहान आहे. त्यामुळे ती भविष्यात काय बनणार याबद्दल निश्चित असे काही आताच सांगता येणार नाही… पण ही ‘स्वीट डॉल्’ तर म्हणते, मी चित्रकारच होणार. हिच्याकडे एक ‘ऑप्शन’ देखील आहे बरं का … चित्रकार नाही झाली तर तिला आईसारखं डॉक्टर बनायचंय…
आपल्या मुलीचे इतके कौतुक होते, या बद्दल वर्तक दाम्पत्य खूप समाधानी आहे. ‘आम्हा उभयतांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.’ असे सृष्टीच्या वडिलांनी सांगितले. आपल्या मुलीच्या चित्रांचे प्रदर्शन भरेल, ही गोष्ट आमच्यासाठी अनपेक्षितच होती. मुलीचे सर्वत्र होत असलेले कौतुक पाहून खूपच बरे वाटते- अशी प्रतिक्रिया सृष्टीच्या पालकांनी ‘मराठीवर्ल्ड.कॉम’ला दिली.
सृष्टीचे चित्र-प्रदर्शन एक दिवस ‘जहांगिर कलादालना’मधे आम्हास पाहावयास मिळो, अशा शुभेच्छा आजवर अनेक कलारसिकांनी व्यक्त केल्या आहेत. तिच्या चित्रकलेमधे दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करून या बाल-कलाकाराचे कौतुक करणाऱ्या चार-ओळींनी समारोप करते.
सृष्टीतील ही कळी
हळुवार उमलू दे
तिच्या ‘कले-कले’ने
तिला फुले दे
– अर्चना जोगळे