बालमुक्तांगण लेख

बालकवयित्री राधिका लाड
उन्हाळयाची सुटी अशी घालवू या… नुपूरमाधुरी तिजारे
एक ना धड भाराभर चिंध्या रौनक पत्की
‘बटाटयाची चाळ’ अर्निका प्रकाश परांजपे
बास झालं आता उतरवा मुखवटा अर्निका प्रकाश परांजपे
चित्रांच्या दुनियेत नवनिर्मिती करणारी ‘सृष्टी’ अर्चना जोगळे
ऑस्करच्या पडद्यावर ‘लगान’ प्रेरणा भास्कर महाजन
माझा अविस्मरणीय अनुभव प्रेरणा भास्कर महाजन

बालकवयित्री

‘ढगांची भरली शाळा’, ‘चांदोबाचे घर’, ‘बाहूलीचे लग्न’ अशा काव्य निर्मितीद्वारे नवी सांगवी, पुणे येथील राधिका लाड या चिमुकलीने बालसाहित्य क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला आहे. तिची प्रतिभा काव्यलेखन, वक्तृत्व आणि कथाकथन या विविधांगानी बहरते आहे.

राधिका ही 7 वर्षाची आहे. तिने लिहिलेल्या 24 रचनांचा कवितासग्रंह – ‘ढगांची भरली शाळा’ नुकताच (28 मे 2005 रोजी) प्रसिध्द कवि#लेखक डॉ. मधूसूदन घाणेकर यांच्या हस्ते, गीतकार श्री. जयंत भिडे यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला आहे.

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, आखिल महाराष्ट्र कलाशिक्षण केंद्राचा ‘बालभूषण पुरस्कार’, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे ‘कृष्णाकाठ काव्य पुरस्कार’ मुंबईच्या मनोहर शेडगे कला प्रतिष्ठानचा ‘गुणगौरव पुरस्कार’, संकेत कला ऍकॅडमी तर्फे बालकुमार कलारत्न पुरस्कार’, असे सन्मान प्राप्त करीत राधिकाने रसिकांची मने जिंकण्यास आत्तापासूनच सुरुवात केली आहे. सोप्या आणि सुटसुटीत भाषेतील कविता हे तिचे वैशिष्टय म्हणता येईल.

वयाच्या चौथ्या वर्षापासून राधिका व्यासपीठावर खुलेपणाने वावरते आहे. सुगम, संगीत, गोष्ट सांगा, मनाचे श्लोक, पसायदान म्हणणे या स्पर्धांमुळे तिच्यात साहित्यिक संस्काराची बीजे रोवली गेली. डॉ मधूसूदन घाणेकर यांच्य अध्यक्षते खाली पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात, 22 ऑगस्ट 2002 रोजी मुलांचे पहिले आखिल भारतीय साहित्य संमेलन भरले होते, राधिकाने स्वरचित ‘खारुताई’ ही कविता सादर केली. त्या वेळी सर्वात लहान कवयित्री म्हणून संमेलनाचे अध्यक्ष डॉ. घाणेकर यांनी तिचे विशेष कौतुक केले. येथून तिची काव्यप्रतिभा खुलण्यास सुरवात झाली. कथाकथन, वक्तृत्व, गीतगायन, नृत्य, अभिनय अशा अनेक स्पर्धात राधिका उत्स्फूर्तपणे सहभागी होते. भारतीय बाल वाद्यवृंद, संस्थेने आयोजित केलेल्या ‘वक्तृत्व स्पर्धेत’ तिने वयाच्या पाचव्या वर्षी खुल्या गटात द्वितीय क्रमांक मिळविला.

सातारा येथे झालेल्या आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारी वयाने सर्वात लहान कथाकार म्हणून राधिका सहभागी झाली. तिच्या धाडसाचे आणि वक्तृत्वाचे उपस्थितीतांनी टाळयांच्या कडकडाटात कौतुक केले.

डिसेंबर 202 मध्ये बालगंधर्व कलादाननात भरलेल्या ‘काव्यगंध या काव्यचित्रप्रदर्शनातही कु. राधिकाच्या ‘गुलाब’, ‘खारुताई’, चंद्रसूर्य’, ‘दिवाळी’ या चार कविता प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरल्या. कविश्रेष्ठ श्री. गंगाधर महांबरे, पद्मश्री श्री. नारायण सुर्वे, ज्येष्ठ कवि श्री. मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ कवयित्रि डॉ. अश्विनी धोंगडे, ज्येष्ठ कवयित्रि सौ. आश्लेषा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. जयंत नारळीकर, कविश्रेष्ठ श्री. प्रवीण दवणे, ज्येष्ठ लेखक श्री. शंकर सारडा, श्री. न.म.जोशी यांची कौतुकाची थाप कु. राधिकाला मिळाली आहे.

तिची ‘ढगांची शाळा’ ही कविता दै. सकाळच्या ‘सुटीचे पान’ या सदरात प्रसिध्द झाली होती. कथाभारती आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत राधिकाने सलग दुसऱ्यावर्षीही प्रथम क्रमांक मिळविला.

आकाशवाणीवरील बालोद्यान कार्यक्रमात तिने कथाकथन केले आहे. मुंबईतील संसारिका प्रॉडक्शनच्या ‘टेलेंट हंट’ स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 11,500 नवोदित कलाकारांमधून 500 कलाकारांमध्ये तिची निवड झाली आहे.

राधिकाचे वडील शिक्षक आहेत तर आई नॅशनल इन्शुरन्स ऍकॅडमीत नोकरी करते. त्यांचे तिला नेहमी प्रोत्साहन मिळत असते. राधिका उत्साही आणि कष्टाळू आहे. इतक्या कमी वयात सांस्कृतिक आणि बालसाहित्य क्षेत्रात राधिकाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.