आघाडा

Aghada श्रावणात आघाड्याला विशेष महत्त्व आहे. जिवतीपूजन, मंगळागौरीला, बुध-बृहस्पती, जेष्ठागौरी , हरतालिका तसेच गणपतीपूजनात आघाड्याचे विशेष महत्त्व आहे. पावसाळयात हा जागोजागी उगवतो. पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे आघाड्याचे मुख्य दोन प्रकार आहेत. ही वर्षायू औषधी अ‍ॅमॅरॅंटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅचिरँथस अ‍ॅस्पेरा आहे. आघाड्याला अपांग, चिचरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, काटेरी फुलोरा अशी वेगवेगळ्या भाषांत नावं आहेत. ही वनस्पती सर्वत्र ( समुद्रसपाटीपासून सुमारे १,००० मी. उंचीपर्यंत) मोकळ्या पडिक जागी किंवा कचर्‍याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे वाढते. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील उष्ण देशांत आढळते. आघाड्याची पाने साधी, समोरासमोर, लंबगोल किंवा वर्तुळाकृती असून पानांच्या खालच्या बाजूला मऊ लव असते. फुले हिरवट पांढरी व अनेक फांद्यांच्या टोकांना, लांब कणिश फुलोर्‍यावर नोव्हेंबर-जानेवारीत येतात. फुलोरा ४५ सेंमी.पर्यंत लांब असू शकतो. फळे लहान, शुष्क व एकबीजी असतात. बी लहान व पिंगट असते. आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध होते. हे झुडूप १ ते ३फूट उंचीपर्यंत वाढते. खोड ताठ असून त्याला लहान फांद्या फुटतात. पानं १ ते २ इंच लांब व १ ते ३/४ इंच रुंद असतात. फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुलं येतात. प्रथम फुलाचा दांडा खूप आखूड असतो; परंतु तो नंतर २० इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे जनावरांच्या अंगाला चिकटतात व नंतर ती दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ही वनस्पती सापडते.

औषधी उपयोग

आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाडयाला ’अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाडयापासून क्षार तयार करतात. त्याला ‘अपामार्ग क्षार’ असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षाराच्या तेलाचा वापर बहिरेपणा, ऐकू न येणे, कानात विविध आवाज येणे यावर होतो. आघाडयाची राख मिसळलेले तिळाचे तेल कानदुखीवर व फक्त राख व्रणावर बाहेरून लावतात मात्र यासाठी वैद्यचिकीत्सा आवश्यक आहे. पूर्वी दात घासण्यासाठी आघाडयाच्या काडीचाही उपयोग करीत. त्वचारोगावर आघाडयाच्या काढयाचा उपयोग करतात. हा खोकल्यावर गुणकारी आहे. याचे चाटण मधाबरोबर घेतात. या वनस्पतीची राख खोकला व दम्यावर उपयुक्त असते; आघाडा हा वामक आहे. म्हणूनच यामुळे कफ पडून रुग्णाला आराम पडतो. मात्र याच्या सेवनाने उलटया होऊ शकतात. म्हणून वैद्याच्या सल्ल्याने याचा वापर करावा. पायात काटा विशेषत: बाभळीचा काटा मोडल्यास आघाडयाचा रस चोळून लावावा, त्याचे पोटीस बांधावे, काटा वर येतो.

आघाडयाच्या मुळांचा भिजवून काढलेला रस सौम्य स्तंभक (आकुंचन करणारा) असतो. पानांच्या भुकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात व आमांशात उपयुक्त ठरतो. बिया वांतिकारक असतात. वनस्पतीचा रस तिखट, रेचक व मूत्रवर्धक असून मूळव्याध, गळवे, चर्मरोग, शूल इ. व्याधींवर देतात. तसेच ती रंगकामात व कपडे धुण्यास वापतात. दात दुखत, हलत असतील तर काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळावा. पोटदुखीवर आघाडयाची ४-५ पानं चावून खावीत किंवा पानांचा रस काढून प्यावा. पित्त झाल्यास आघाडयाचं बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून द्यावं म्हणजे पित्त बाहेर पडतं किंवा शमतं. नंतर तूपभात खावा. खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाडयाची झाडं मुळासकट उपटून ती जाळून त्याची राख करावी. ती थोडी थोडी मधात घालून त्याचं चाटण द्यावं. यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाडयाचं चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण द्यावं. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाडयाच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला, पडसं झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचं हाड वाढल्यास आघाडयाचं बी बारीक वाटावं. त्यात सैंधव, मेंदीचा पाला, जाईचा पाला समभाग घालून वाटावा, त्याच्या निम्मं तिळाचं तेल घालून ते निम्मं आटवावं. हे तेल दिवसातून 2-3 वेळा नाकात घालावं. जलोदरामुळे पोटाला सूज आली असेल किंवा इतर अवयवांमध्ये काही कारणांनी सूज आली असेल तर आघाडयाची राख, पाणी व गूळ एकत्र करून द्यावी. त्यामुळे सूज उतरते.

या राखेत पाण्याऐवजी गोमूत्र घातलं तरी चालतं. गळवं लवकर पिकत नसतील आणि ती वारंवार होत असतील तर त्यावर आघाडयाची पानं बारीक वाटून त्यामध्ये तेल, हळद घालून गरम पोटिसासारखं गळवांवर बांधावं, म्हणजे गळवं लवकर बरी होतात. ब-याच व्यक्तींच्या- विशेषतः घाम जास्त येणा-या व्यक्तींच्या मानेवर, छातीवर, पाठीवर, चेह-यावर पांढरे भुरकट डाग पडतात, त्यातून कोंडा पडतो, त्याला ’शिबं’ म्हणतात. त्या शिब्यास आघाडयाच्या क्षाराचं पाणी लावावं. आघाडयाचा क्षार काढण्यासाठी आघाडयाची झाडं सावलीत वाळवावीत. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्‍यात घालावीत. त्यात राखेच्या चौपट पाणी घालून चांगली कालवावी. ते पाणी न हलविता १० ते १२ तास तसंच ठेवून द्यावं. नंतर वरचं स्वच्छ पाणी काढून गाळून घ्यावं व लोखंडाच्या कढईत घालून ते पाणी आटवावं. कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहील तो आघाडयाचा क्षार. या क्षाराला ’अपमार्गक्षार’ म्हणजे स्वच्छ करणारा- असं संस्कृतमध्ये नाव आहे. या क्षारानं पोट व दातही स्वच्छ होतात. पूर्वी परीट लोक कपडे स्वच्छ करण्यासाठी याच क्षाराचा उपयोग करीत असत. कानात आवाज येत असल्यास आघाड्याचं झाड मुळासकट उपटून ते बारीक कुटावं. त्यात आघाडयाच्या क्षाराचं पाणी घालावं व त्याच्या निम्मं तिळाचं तेल घालून ते निम्मं आटवावं. हे तेल कानात घालावं म्हणजे कर्णनाद बंद होतो. डोळे आल्यास आघाडयाच्या मुळाचं चूर्ण, थोडं सैंधव तांब्याच्या भांडयात घालून दह्याच्या निवळीत खलावं व ते अंजन डोळ्यात घालावं.

विंचवाच्या विषारावर आघाडयाचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवावं. हे पाणी थोडं थोडं प्यायला द्यावं. पाणी कडू लागलं, की विष उतरलं असं समजावं. उंदराच्या विषारावर आघाडयाच्या कोवळ्या तु-यांचा रस काढून तो ७ दिवस मधाबरोबर द्यावा किंवा आघाडयाचं बी वाटून मधातून द्यावं. कुत्र्याच्या विषारावर आघाडयाचं मूळ कुटून मध घालून द्यावं. कोरफडीचं पान व सैंधव दंशावर बांधावं. स्नान करतांना आघाडा, कडूभोपळा, टाकळा, कडूशेंदनीचें फळ हीं नरकाचे क्षयाकरितां व पाप नाशार्थ अंगावरुन ओंवाळून टाकावी असा उल्लेख कार्तिक महात्म्याच्या ३५ व्या अध्यायात नवव्या व दहाव्या श्लोकात आहे.

पुजेतले महत्त्व

Aghada आघाडयासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये, त्याच्यातील गुणधर्माचा आपल्याला उपयोग व्हावा आणि ज्या ऋतूत जी झाडं येतात त्यांचा उपयोग आपल्या धार्मिक आचार-विचारांमधून, व्रतवैकल्यांतून केलेला आहे. आघाडा ही वनस्पती श्रावण-भाद्रपदात जास्त उगवते. आषाढ-श्रावणात ती नुकतीच उगवायला लागलेली असते आणि भाद्रपदामध्ये तिची वाढ पूर्ण होते. म्हणून श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये आघाडयाचा समावेश केला आहे. श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीच्या पूजेत आघाडा व दूर्वांच्या माळेला खूप महत्त्व आहे. भाद्रपदात ज्येष्ठा गौरी बसवितात. त्या वेळेस आघाडयाची रोपं एकत्र बांधून ती भांडयावर ठेवतात. त्यावर गौरीचं चित्र बांधतात. देवीला ही पत्री अतिशय प्रिय असल्यामुळे भाद्रपद शुद्ध षष्ठीला आघाडा व तेरडा मुळासकट उपटून आणतात. त्यांच्यावरून पाणी व तांदूळ ओवाळून टाकतात. घरातल्या कुमारीकेकडून पूजा करवून घेतात. नंतर आघाडयाची जुडी सर्व खोल्यांतून फिरवितात. तेव्हा गुलालानं गौरीची पावलं काढतात. आघाडयाची जुडी ठेवून त्यावर गौरीचा मुखवटा बसवितात. तीन दिवसांनी गौरीचं विसर्जन करून आघाडयाची जुडी नदीच्या पाण्यात निर्माल्य म्हणून विसर्जन करतात. परत येताना नदीकाठची वाळू आणून घरी ठेवतात, त्यामुळे घरी भाग्यलक्ष्मी येते, अशी समजूत आहे.

संदर्भ : डॉ.कांचनगंगा गंधे यांचे लिखाण व मराठी विश्वकोश