‘अजाणतेपणी केव्हा माता घाली बालगुटी
बीजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा,तीर्थे काव्याची धुंडली
कोण्या एक्या भाग्यवेळी पूजा रामाची मांडली
देववाणितले ओज शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्काराचे होई चांदणे मराठी
झंकारती कंठविणा, येती चांदण्याला सूर
भावमाधुर्याला येई महाराष्ट्री पूर.’
मराठी साहित्य, संस्कृती संगीत यांना अलौकीकत्व प्राप्त करुन देणा-या एका महाकाव्याची ही अक्षररुपी प्रस्तावना. कविश्रेष्ठ ग.दी.माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या अलौकीक प्रतिभेचा अविष्कार म्हणजेच महाकाव्य ‘गीतरामायण’ गीतरामायणाच्या निर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. आजपासून बरोबर पन्नास वर्षापूर्वी नित्य नवीन उपक्रमांसाठी नावाजल्या गेलेल्या पुणे आकाशवाणीनं एका नवीन कार्यक्रमाची घोषणा केली. ‘गीतरामायण’ पुणे आकाशवाणी केंद्राचे गोमांतकीय अधिकारी सीताकांत लाड यांची ही संकल्पना. दर्जेदार आणि नवनवीन कल्पना असलेले सांस्कृतीक कार्यक्रम सादर करुन श्रोत्यांची अभिरुची घडवणारे एक सक्षम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. श्रीरामचरित्रावर गीतांच्या मालीकेची एक कल्पना त्यांनी ग.दी.माडगूळकरांसमोर मांडली. माडगूळच्या पंचक्रोशीमधे ‘पांडवप्रताप’ ‘हरीविजय’ यांची पारायणे
ऐकलेल्या लहानग्या माडगूळकरांना आपल्या हातून रामावरचं काव्य करण्याची किमया व्हावी अशी उत्कट इच्छा होती ती आज प्रत्यक्ष साकारणार होती. दर आठवडयाला एक अशा छप्पन गीतांचे सादरीकरण आकाशवाणीवरुन करण्याची योजना ठरली आणि ‘सुगंधसे स्वर भुवनी झुलले’ या न्यायानं गीतरामायणाच्या निर्मीतीची नांदी झाली. आणि अखेर तो सुवर्ण क्षण उगवला. दि. १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर होऊ लागले.
‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती,
कुशलव रामायण गाती’
बाबूजींचा शुध्द, सच्चा स्वर, स्पष्ट शब्दोच्चार आणि शास्त्रीय संगीताची अलौकीक बैठक यामुळे गीतरामायण उत्कृष्ठ काव्य त्याचबरोबर अप्रतिम श्राव्यही झाले.लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले गेले. असेही सांगितले जाते की सकाळी बरोबर साडेआठ वाजता रेडिओला हार घालून श्रोते गीतरामायण ऐकायला सज्ज बसत. जेष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी बाबूजींबरोबर संगीतसंयोजन केले. दरवेळी नविन गीत गदीमांकडून आणण्याची जबाबदारी त्यांचीच.
त्यामुळे ते घरी आले की कौतुकाने गदीमा म्हणायचे ‘आला रे रामाचा दूत.’ ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या गीताला जोगांनी केलेली व्हायोलीनची साथ तर अविस्मरणीय आहे. भारतीय संस्कृती समाज यांना आदर्शवत् वाटणा-या मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्रांचा ही कथा. म्हणजेच चिरंतन अशा नितीमूल्यांची भावभावनांवर झालेली मातच होय. गीतरामायणाचे हिंदी, कानडी, तेलगु, कोकणी, आसामी, उडिया, सिंधी, बंगाली, इंग्लीश अशा नऊ भाषात अनुवाद तर झालेच पण तेवढीच लोकप्रियतापण मिळाली. बाबुजी सुधीर फडके यांचा या यशातला सहभाग तर असामान्यच आहे. गीतरामायण गातांना बाबुजी स्वत:च राममय होऊन जायचे. सांगायची गोष्ट म्हणजे बाबुजींचे मूळ नांव रामचंद्र होते हा एक विलक्षण योगच म्हणायचा. बाबुजींचे गीतरामायण ऐकतांना अनेकांना भावनावेग आवरत नसे. मग ‘पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ ऐकतांना अश्रूधारा न आवरु शकणारे गोळवलकर गुरुजी असोत किंवा ज्यांच्यासाठी बाबुजींनी स्वत:च अस्तित्वच नंतरच्या काळात पणाला लावलं होतं ते वि.दा. सावरकर असोत. हे गीतरामायणाच्या यशाचे सुवर्णक्षणच होते.
दादरच्या राजा शिवाजी विद्दयालयात एकदा गीतरामायणाचा कार्यक्रम होता. परंतु दुर्दैवानं त्या दिवशी बाबुजींची वही सापडेना. अशावेळी कार्यक्रमामधे खोळंबा होऊ नये म्हणून उपस्थितांपैकी कांही रसिकांनी स्वहस्ताक्षरात चौदा गाणी लिहून बाबुजींना दिली. अशी होती गीतरामायणाची लोकप्रियता. गीतरामायणाच्या ग्रंथरुपी आवृत्तीच्या प्रस्तावनामधे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार लिहीतात-
‘महाराष्ट्रात एकनाथ, कृष्णदास सुदूगल,श्रीसमर्थ रामदास आदि संतकविंनी मराठी जनतेस रामायण चाखवले आहे. मोरोपंतानी तर एकशे आठ वेळा रामायण रचलयं. पांगारकरांनी छोटेसे कविरामायण प्रसिध्द केले. डॉ.मराठे यांचे ओवीबध्द ‘झोपोळयावरचे रामायण ‘ उपलब्ध आहे. अशा रामकथेवर अलीकडे माणदेशच्या मातीतून उदयास आलेले अस्सल मराठी बाण्याचे कवि श्री. ग. दी. माडगूळकर यांनी आपल्या गीतरामायणाचा कौस्तुभमणी महाराष्ट्रशारदेच्या कंठात बांधला. आहे. माडगूळकर हे यथार्थाने आधुनिक वाल्मिकी आहेत. गीतरामायणानंतर ‘गीतकृष्णायान’, गीत ‘दासायान’ अशी परंपरा या आधुनिक वाल्मिकीपासून सुरू झाली. म्हणून या परंपरेचे आदिकवी माडगूळकरच ठरतात. वाल्मिकीचे संस्कृत रामायण असो की माडगूळकरांचे गीतरामायण असो, माडगूळकरांच्याच शब्दात सांगायचे तर, अभिप्राय एकच- ‘काव्य नव्हे हा अमृतसंचय!’ आज अर्धशतक उलटूनही जनमानसावर त्याची मोहिनी अद्दयापही कायम आहे. अजूनही आकाशवाणीवरुन गीतरामायणाचे वेळोवेळी प्रसारण केले जाते. गीतरामायण ही महाराष्ट्राची सांस्कृतीक ओळख बनली आहे. कदाचित गीतरामायण हा कलाविष्कार घडवतांना
‘या सम हाच
‘हा नियतीचाच उद्गार असावा.
‘जोवरी हे जग, जोवरी भाषण
तोवरी नूतन,नीतरामायण’
– अमेय रानडे, मुंबई.