पारंपारिक रांगोळ्या व प्रांतीय रांगोळ्या

रांगोळी म्हणजे काय?

रांगोळी म्हणजे भूमि-अलंकरण. भूमीला सजविण्यासाठी, देवघरातील देव्हारा, अंगण, भोजनाची पंगत, शुभकार्यस्थळ इत्यादी जागा सुशोभित करण्यासाठी शंखजि-याची भाजून केलेली पांढरी पूड, तांदुळाची पिठी, खडू इत्यादी साहित्याने काढलेल्या विविध चित्राकृतींना रांगोळी असे म्हणतात. त्यात रंग भरून ती अधिक आकर्षक बनविली जाते. भारतात रांगोळीला धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्टया फार महत्त्व निर्माण झालेले आहे.

रांगोळीचा उगम

rangoli ugam अनेक भारतीय कलांप्रमाणेच रांगोळीचे नातेही प्राचीन भारतीय संस्कृतीशी आहे. ऐतिहासिक काळापासून रांगोळीचे अस्तित्व असल्याचे दाखविता येते आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास आणता येते. रांगोळी जशी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते तशी ती प्राचीन भारतीय तत्वचिंतन आणि लोकधारणा यांचाही वारसा सांगते. रांगोळीद्वारे मूर्त रूपे निर्माण केली जातात आणि अमूर्त अशा संकल्पनांचा बोधही होतो. रांगोळी या कलेचा उगम धर्माच्या अनुबंधातच झालेला आहे, ही बाब ध्यानी घेतली की धर्मप्रवण भारतीय समाजातील तिचे स्थान लक्षात येते. रांगोळीसाठी लागणा-या वस्तू सहज व सर्वांना उपलब्ध होणा-या आहेत, आणि रांगोळी काढणे फारसे अवघडही नसते. प्राचीन काळी चित्रकलेची सुरुवात झाली ती रांगोळीपासूनच असे म्हणता येते. पुढे रांगोळी प्रगतावस्थेला पोचली तेव्हा अमूर्त, निराकार संकल्पनांच्या प्रतीकांसाठी तिचे मानवी जीवनात अतोनात महत्त्व वाढले. तिने घराघरात स्थान मिळवले. रांगोळी झाली मांगल्याचे प्रतीक, पावित्र्याचे प्रास्ताविक नि प्रसन्नतेची खूण! निषाद, किरात, पारध, भिल्ल, मुंड, कोला, नाग, वारली, चेंचू, ठाकूर आणि कातकरी या आदिवासी जमातींना तर तिने भुरळ पाडलीच, पण सर्व वर्णाच्या व पंथोपंथांच्या अनुयायांनाही तिने आपलेसे केले. मग तिच्या अस्तित्वाला अर्थ आला, तिच्या प्रगटीकरणाला वेगवेगळे धुमारे फुटले आणि तिच्या रुपाला विविध आयाम प्राप्त झाले.

रांगोळी : एक संस्कारपूर्ण कलाविष्कार
Cultured Art घराघरांच्या अंगणातील सडा-संमार्जन आणि त्यावरील छोटीशी सुबक रांगोळी त्या घरांचे अलंकरण असते आणि अशी घरे देशातील संस्कृतीची अलंकरणे असतात. ‘घराची कळा अंगण सांगे’ या उक्तीत केवढी भावरम्यता सामावली आहे! कळा म्हणजे स्थिती, अवस्था, स्थान, दर्जा, श्रेणी, सौंदर्य. दारासमोर, अंगणात, वृन्दावनाजवळ काळया, किरमिजी किंवा तांबूस रंगाच्या भूमीवर बोटांच्या चिमटीतून ओघळलेल्या शिरगोळयाच्या चूर्णातून उमटलेली छोटीशी आकृती त्या घरातील स्वच्छता, शुध्दता, प्रसन्नता नि पवित्रता प्रकट करते. बिंदू-बिंदूंना सरळ किंवा वक्र रेषांनी जोडून तयार झालेली सौंदर्याकृती असे त्याचे दृष्य स्वरूप असते. बिंदू-रेषांच्या संमीलनातून चंद्र, सूर्य, स्वस्तिक, श्रीपद्म, शंख, चक्र इत्यादी अर्थपूर्ण प्रतिकांतून प्रकाशमयता, तेजस्विता, शीतलता, गतिमानता, आस्तिक्य, बुध्दी, समृध्दी, सृजनशीलता अशा सुंदर भावनांचे सु-दर्शन पाहणा-यांच्या अंत:करणाला घडत असते. ती आकृती रेखाटणा-या गृहलक्ष्मीच्या अंत:करणातील भाव-तरल सौंदर्याची अनुभूती देत असते.

विविध माध्यमे-विविध-संबोधने
swastik rangoli विविधतेने नटलेल्या भारत देशात भिन्न भिन्न प्रांतात रांगोळीला भिन्न भिन्न नावे व माध्यमे वापरली जातात. घरांच्या अंगणांत, मंदिरांच्या प्रांगणांत, प्रवेशद्वारी, वृन्दावनाशेजारी व सभोवती रांगोळीचे सुशोभन असणारच. पण प्रांतोप्रांतीच्या उपलब्ध्तेनुसार रेखाटनासाठी तांदुळाची पिठी, शिरगोळयाचे वा संगमरवराचे चूर्ण, चुन्याची भुकटी, भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, मीठ, पाने, विविध धान्ये अशी अनेकविध माध्यमे वापरली जातात. गंधरूपात तूलिकांच्या सहाय्याने रेखाटन होत असल्याचेही आढळते. पण रेखाटनासाठी स्थाने मात्र सर्वत्र सारखी. धार्मिक, सांस्कृतिक समारंभ प्रसंगी, शुभकार्य प्रसंगी घरासमोर, अंगणात, उंब-यावर, देवघरासमोर, चौरंग वा पाटाभोवती रांगोळी रेखाटली जाते. पूजापाठ, यज्ञ, अभ्यंगस्नान, औक्षण, नामकरण, भोजन अशा सर्व प्रसंगी सर्वप्रथम रांगोळी काढणे भारतात सर्वत्र प्रचलित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील रांगोळी ही उत्तर भारतात ‘रंगोली’चे रूप धारण करते. गुजरातेत हिला ‘साथिया’ म्हणतात, तर मध्य प्रदेशात ‘चौक पूरना’. राजस्थानात रांगोळीला ‘मांडणा’ असे संबोधले जाते. आंध्रमध्ये ‘मग्गू’, बंगालमध्ये ‘अलिपना’, तामिळनाडूत ‘कोलम’ आणि केरळात ‘पुविडल’ अशा भिन्न नावांनी संबोधल्या जाणा-या रांगोळीचे कूळ मुळातील ‘रंगवल्ली किंवा रंगावली’ चेच असते. अंबा, जगदंबा, जगन्माता, भवानी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, काली, पार्वती, अशा भिन्न भिन्न रुपांत एकाच मातृशक्तीचे दर्शन घडावे तसेच या रांगोळीचे बिन्दुप्रधान, आकृतिप्रधान, व्यक्तिप्रधान, प्रकृतिप्रधान असे रांगोळीचे विविध प्रकार सांगता येतील. परन्तु आशय संपन्न प्रतिकांतून भावनांची व विचारांची सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणे हाच रांगोळीचा प्रधान हेतू असतो.

मातीतून उमलणारी आकाशगामी
रांगोळीच्या कलाविष्कारात प्रतिकांना आकृतीरूप मिळाले की आकृत्या प्रतिकरूप बनल्या हे सांगणे कठीण आहे. रांगोळीच्या आकृतीतील एकेक प्रतीक ही एक स्वयंपूर्ण रांगोळी बनू शकते तसेच काही प्रतिकाकृतींच्या सुसंबध्द संरचनेतून सुविशाल रांगोळी साकारु शकते.

रांगोळी – संस्कृत रंगावली
sanskrit rangoli विशिष्ट शुभ्र चूर्ण बोटांच्या चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी म्हणतात. रांगोळीची कला ही मूर्तिकला, चित्रकला ह्या कलांपेक्षा प्राचीन कला आहे. सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, व्रत इत्यादि शुभ प्रसंगी धर्मकृत्याच्या जागी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक घरी दारासमोर सडा-संमार्जन करून रांगोळी काढण्यासाठी जे चूर्ण वापरतात ते विशिष्ट प्रकारच्या दगडापासून बनतात. कोकणात भाताची फोलपटे जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून वापरतात. रांगोळीचे पीठ सामान्यपणे भरभरीत असते. त्यामुळे चिमटीतून ते सहजपणे सुटते. जमीन सारवल्यावर तिच्यावर न विसरता रांगोळीच्या चार तरी रेघा काढतातच, अन्यथा ती जमीन अशुभ समजतात. सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिध्दी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. रांगोळीत ज्या आकृत्या काढतात त्या प्रतिकात्मक असतात. वक्ररेषा, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध प्रतिकात्मक आकृत्या निर्माण करता येतात. कमळ, शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य, नागयुग्म, कलश, त्रिदल, अष्टदल ही काही प्रतिके आहेत. रांगोळीचे आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन भेद आहेत. आकृतीप्रधान रांगोळीत रेखा, कोन, वर्तुळ प्रमाणबध्द करून रांगोळी काढतात. राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर भारत या प्रदेशांत आकृतीप्रधान रांगोळी काढण्याची प्रथा आहे. वल्लरीप्रधान रांगोळीमध्ये फूलपत्ती, वृक्षवल्ली, पशुपक्षी यांना प्राधान्य असते. ही रांगोळी भारताच्या पूर्व भागात प्रचलित आहे. अशी रांगोळी काढण्यात बंगाली स्त्रिया सिध्दहस्त आहेत. ही रांगोळी आकृतीप्रधान रांगोळीपेक्षा अधिक मोहक वाटते.हिंदू, जैन, पारशी या धर्मांत रांगोळी रेखाटन शुभप्रद मानलेले आहे. उंब-यावर काढलेली रांगोळी अशुभ शक्ती घरात येऊ देत नाही व शुभ शक्तींना घराबाहेर पडण्यास अडथळा आणते अशी समजूत आहे. अंगणातील रांगोळी अंगण सुशोभित करून, येणा-या पाहुण्यांचे स्वागत करून मन प्रसन्न करते.