पारंपारिक रांगोळ्या व प्रांतीय रांगोळ्या

महाराष्ट्रातील रांगोळ्या

dots rangoli महाराष्ट्रात ठिपके काढून ते जोडून रांगोळी काढण्याची प्रथा आहे. परंतु स्वस्तिक, चंद्र,सूर्य, लक्ष्मीची पावले, गोपद्म, महिरप वगैरे आकृती मुक्तहस्त चित्राप्रमाणे (free hand drawing) काढली जातात. पूर्वी जमिनी शेणाने सारवल्या जात. हिरव्यागार सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन व त्यात हळदी-कुंकवाची चिमूट टाकण्याची पध्दत होती. आजलाही काही खेडेगावातून ही प्रथा पाळली जाते. याशिवाय सकाळी उठल्यावर अंगणात पाण्याचा सडा घालून त्यावर छोटीशी रांगोळी, घराच्या उंब-यावर, तुळशी वृंदावनापाशी, देवघरात रांगोळी काढूनच स्त्रियांचा दिवस सुरू होत असे. आजकाल पारंपारिक रांगोळयांचे स्टिकर्सही बाजारात विकत मिळतात. ते चिकटवून लोक हौस भागवून घेतात. एकसारख्या रुंदीची, नाजुक रेघ तसेच एकसारख्या अंतरावर काढलेले ठिपके काढणे हे कलात्मक मानले जाते. जागेभावी व वेळेअभावी शहरवासियांना ते रोज शक्य नसले तरी सणावाराला, महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी मात्र रांगोळीशिवाय अजूनही कुणाचे पान हलत नाही. पेशवाईतील भोजनपंक्तीत चांदीच्या ताटांभोवती सुबक महिरपी काढल्या जात. त्यानंतर ‘रांगोळे’ नावाचे एक छोटेसे यंत्र निर्माण झाले. त्यात रांगोळीची पावडर भरून पंक्तिंमध्ये ते जमिनीवर ओढून एकसारखी रांगोळी काढली जाऊ लागली.

tulsi गौरी-गणपती आणि दिवाळी या दोन सणांना रांगोळीला जास्त महत्त्व आहे. सण जवळ आले की हळदीपासून बनविलेले अत्यंत आकर्षक असे रंग बाजारात विक्रीस येतात. या रंगांनी पांढरी रांगोळी अधिक आकर्षक बनते. याशिवाय पत्र्यापासून किंवा प्लॅस्टिकपासून बनविलेले छाप (molds) ही मिळतात. त्या छापांत रांगोळीची पूड घालून छाप उमटविले की एकसारख्या रांगोळया काढता येतात. याशिवाय रांगोळीच्या सहाय्याने नेत्यांची, देवतांची, सिनेमा तारकांची व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे वगैरेही काढण्याची कला जोपासली गेली आहे. दिवाळीच्या सुमारास अशा प्रकारच्या रांगोळयांची प्रदर्शनेही भरतात.

‘संस्कार भारती’ या भारतीय संघटनेने महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर व मोठया आकृत्या असलेल्या रांगोळया काढण्याची एक नवीन पध्दत सुरू केली आहे. दोर, पेन्सिल अशा साध्या वस्तूंच्या मदतीने, स्वस्तिक,गोपद्म, चक्र, शंख, गदा, पद्म, ध्वज इत्यादी प्रतिके एकमेकांना जोडून भव्य रांगोळया काढल्या जातात. maharashtra rangoli त्यांत चाळणीने गाळून रंग भरले जातात. संस्कार भारतीने विकसित केलेल्या या तंत्राच्या सहाय्याने काढलेल्यारांगोळया या सध्याच्या काळात महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक अविभाज्या भाग बनल्या आहेत. गणेशोत्सवाच्या मिरवणुकींच्या वेळी हजारो कलाकारांच्या सहाय्याने काही मैल लांबीच्या रांगोळया ही संस्कारभारतीची खासियत झाली आहे. संस्कारभारती ‘रांगोळया कशा काढायच्या’ याचे वर्गही घेतात. त्यांच्या कार्यामुळे रांगोळी ही हॉलंड/फ्रान्स, इटली, जर्मनी, ब्रिटन, बेल्जियम इत्यादी देशांतही पोचली आहे.

रांगोळीला उठाव यावा म्हणून गेरू या तपकिरी-लाल रंगाच्या मातीने रांगोळी काढण्याची जागा सारवून घेतात. तसेच रांगोळीत रंग भरून पूर्ण झाली की त्याभोवती पणत्या किंवा मेणबत्त्या पेटवून ठेवतात.

महाराष्ट्रातील चैत्रांगण

chaitrangan rangoli भारतीय वर्षाचे जे बारा महिने आहेत. त्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व आहे. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात होते. चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. चैत्र शुध्द तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज अंगणात काढलेली वैशिष्टयपूर्ण रांगोळी म्हणजे चैत्रांगण. संस्कारक्षम अशी ही रांगोळी भारतीय संस्कृतीच्या ३३ प्रतीकांमध्ये काढली जाते. मखरात ज्येष्ठा व कनिष्ठा अशा दोन गौरी, दोन्ही बाजूंला सूर्य व चंद्र, दोन पंखे, मखराखाली बसायला दोन पाट, त्याखाली शंख, चक्र, गदा, गोपद्म ही पारंपारिक रांगोळी. दोन्ही बाजूला कमळ व स्वस्तिक अशी चैत्रांगणाची रांगोळी सजलेली असते. या चैत्रांगणात कासव, नाग व तुळशी वृंदावन यांनाही स्थान आहे.

रात्रंदिवस आमचे घर प्रकाशाने उजळून निघावे, चंद्राच्या शीतल प्रकाशाने रात्रीही घर थंड व प्रकाशमान असावे अशी प्रार्थना चंद्र, सूर्य काढून केलेली आहे. शंख, चक्र, गदा, गोपद्म काढून सुचवले आहे की, शंखनाद करणारा हात, चक्र, गदा घेतलेला चक्रधारी श्रीकृष्ण, त्याला वंदन करणा-या हातात गोपद्म काढून तेहतीस कोटी देव पोटात बाळगणा-या गाईची सुद्दा आठवण ठेवलेली आहे. कोमलतेचे प्रतीक असणारे कमळ चिखलात उमलते म्हणजे अज्ञानरुपी चिखल बाजूला सारुन ज्ञानरूपी कमळ आमच्या घरात उमलून त्याचा सुगंध आसमंतात पसरावा अशी इच्छा व्यक्त केलेली असते. सौभाग्यचिन्ह म्हणून करंडा, फणी, मंगळसुत्र काढायचे. त्रिशूळ आणि डमरू ही शंकराची आयुधे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) शमन करते ते त्रिशूल.

नारळ हे जीवनाचे सन्मान करणारे प्रतीक. मंगळ कार्यात आपण हे एकमेकांना देऊन गौरव करतो. संथ गतीने जाऊन सुध्दा जय मिळवणारा प्राणी म्हणून कासवाचे प्रतीक तसेच कासव ज्याप्रमाणे हात पाय जवळ घेते त्याप्रमाणे आपण आपले विकार आवरायला हवे हे या प्रतीकातून सुचीत होते. स्वस्तिक हे तर शुभ चिन्ह. त्याच्या चार बाजू म्हणजे चार वेद आहेत असे मानतात. पाडव्यापासून सुरु होणा-या संपूर्ण वर्षात आम्हाला ऐश्वर्य व ज्ञानसंपदा लाभो, घरात सुख शांती, समृध्दी नांदो अशी प्रार्थना या चैत्रांगणाच्या रांगोळीतील प्रतिकांद्वारे केलेली आहे.