थंड हवेची ठिकाणे

माथेरान

Matheran मुंबई आणि पुणे इथून सर्वात जवळचे आणि तरीही निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे ठिकाण आहे. २,६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी पडलेली माथेरानची ही डोंगररांग हाजीमलंगपासून सुरू होते. १८५० मध्ये ह्युज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने हे ठिकाण शोधून काढले.

मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. या गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे, हे माथेरान भेटीतील एक प्रमुख आकर्षण असते. ही ट्रेन पेब आणि माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून पॅनोरमा पॉईंटला वळसा घालून माथेरानमध्ये प्रवेश करते. इथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. जिथून पुढे वाहनांना प्रवेश नाही त्या दस्तुरी नाक्यावरून २०-२५ मिनीटे चालल्यानंतर मध्यभागी असलेल्या मार्केटमध्ये येतो. बहुतेक हॉटेल्सही याच भागात आहेत.

माथेरानमधील विविध पॉईंटस्
शार्लोट लेक
मार्केटपासून १ कि.मी. अंतरावर हे तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे

पॅनोरमा पॉईंट
उत्तर टोकावरील या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.

सन सेट पॉईंट
ह्या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. मार्केटपासून अंतर साधारण साडेतीन कि.मी. आहे. सन सेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.

चौक पॉईंट
हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो. इथे जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईंट.

गार्बट पॉईंट

येथील सर्वात दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुस-या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. इथे येण्यात खरी मजा पावसाळयात आहे. धुक्यांनी वेढलेल्या जंगलातून पावसाळयात भटकण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी पावसाळाही इथे भेट देण्यासाठीचा उत्तम मोसम आहे. पावसाच्या मा-यामुळे कुठल्याही पॉईंटला जाणे शक्य होत नाही. पण धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळयातही जरूर यावे. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये ब-याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. सांबराच्या कातडयाच्या वहाणा व बूट, तसेच वेताची काठी, छोटया छोटया चपलांचे सेट अशा ब-याच वस्तू इथे स्थानिक विक्रेते विकताना दिसतात. इथे माकडांचे प्रमाण जास्त आहे. आपण खात असताना हातातील खाद्यपदार्थांचा पुडा पळवून नेऊ शकतात, इतकी ती माणसाळलेली आहेत.

माथेरानमध्ये राहण्याच्या ब-याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. इतरही बरीच लहान-मोठी हॉटेल्स आहेत. नेरळ-माथेरान गाडीच्याही मोजक्याच चकरा असल्याने त्या वेळेवर पाळाव्या लागतात. जे स्वतःची गाडी घेऊन येतात, त्यांना गाडया दस्तुरी पॉईंटजवळ लावाव्या लागतात. याशिवाय नेरळ-माथेरान टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. Location Icon

जव्हार

Jawhar ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुका हा तेथील आदिवासींचे वास्तव्य आणि वारली चित्रकला यामुळे प्रसिध्द आहे. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या पर्वत रांगांपैकी उत्तर पर्वत रांगांमध्ये जव्हार, मोखाडा, वाडा, खोडाळा हे प्रदेश समाविष्ट आहेत. या सर्वांची सरासरी उंची १५०० फुटांपेक्षा जास्त नसल्यामुळे पाताळात शिरणा-या द-या आणि आभाळाला भिडणारे डोंगर असे निसर्गाचे रौद्र रूप न दिसता कमी उंचीचे डोंगर आणि लहानखु-या द-या यामुळे इथल्या निसर्गाला सौम्य रूप प्राप्त झाले आहे. आधीच विपुल वृक्षराजीने नटलेला हा भाग पावसाळयात पूर्णपणे हिरव्या रंगात न्हाऊन निघतो. वळणावळणांचे रस्ते त्यावर अगणित धबधबे आणि ठिकठिकाणी आडव्या येणा-या नद्यांवर बांधलेले छोटेसे पूल यामुळे इथल्या सृष्टीसौंदर्यात भरच पडते. मुंबई ते जव्हार हे अंतर १८० कि.मी. आहे. ‘ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाऊ लागलेले जव्हार १६०० फूट उंचीवर आहे.

इथे मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासाठी कित्येक उत्तम जागा आहेत. एम.टी.डी.सी.ने बांधलेले एक अप्रतिम रेस्ट हाऊस आहे. या रेस्ट हाऊसच्या समोरच्या टेकडीवर राजवाडयाचे विहंगम दृश्य दिसते. जयविलास पॅलेस, हिरण्यकेशी मंदिर, हनुमान धबधबा, शिर्पामाळ, नारायणगड हे इथले काही बघण्यासारखे पॉईंटस् आहेत. इथून १६ कि.मी. वर असलेला भूपतगडही ट्रेकर्सना आकर्षित करतो. Location Icon