उद्योगवार्ता

हस्तकला एक नवीन दृष्टी

आपला देश अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या कामाबद्दल कित्येक वर्षापासून प्रसिध्द आहे. थेट काश्मिर ते कन्याकुमारी आणि भूज ते पश्चिम बंगाल पर्यंत व्यापलेल्या सर्व भूभागावर लोकांनी निरनिराळया पारंपरिक हस्तकला अवगत केल्या आहेत. परंतु, आज अवस्था अशी आहे की, आश्रय न मिळाल्यामुळे त्यापैकी काही कला काळाआड झाल्या आहेत. नाशिकमधील अशीच एक हस्तकला (चांदीपासून कलावस्तू बनविण्याची कला) लयास जात आहे. योग्य प्रयत्न झाले तर अद्यापही त्या कलेला पुनर्जीवन मिळू शकेल व ही कला नावारूपाला आणता येईल. त्यासाठी योग्य प्रयत्न मात्र व्हायला पाहिजेत.

‘हस्तकला विकास आयुक्त’, भारत सरकार, यांचे कार्यालय दिल्लीला आहे. यांची पाच प्रादेशिक कार्यालये आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व गोवा ही राज्ये मुंबई येथील कार्यालयाअंतर्गत व्याप्त होतात. मुंबई येथील हस्तकला विकास कार्यालय हे वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या कक्षेत येते.

हस्तकला विकास आयुक्तांचे कार्यालय देशातील हस्तकलांचे संरक्षण करणे, वाढविणे, यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी अनेक थरावर त्यांचे प्रयत्न चालूच असतात. देशातील हस्तकलांची पाहणी करणे. त्यांच्या वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून वाढीसाठी उपाययोजना करणे, नष्ट होऊ पाहणा-या हस्तकलांना पुनरूज्जीवित करणे, हस्तकला वस्तूंचे उत्पादन करणे, त्यांचा दर्जा सुधारणे, नवोदितांना हस्तकलेचे प्रशिक्षण देणे, योग्य डिझाईन संबंधी मदत करणे, कालाकारांच्या मालाला उठाव देण्यासाठी सर्व थरांवर प्रयत्न करणे- म्हणजे स्थानिक पातळीवर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मेळे चर्चा-संवाद प्रदर्शने आयोजित करणे, रोजगार वाढवणे, कारागिरांचे जीवनमान सुधारणे इ. प्रयत्न सतत चालू असतात.

हस्तकला विकास आयुक्तांच्या एका पाहणीनुसार असे आढळले की नाशिक येथील चांदीपासून कलावस्तू बनविण्याची कला कमी कमी होत जाऊन आता ती कला संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे.

एके काळी नाशिक हे या क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण होते. चांदीपासून लहान मोठे डब्बे, डब्या, ताट, वाटया, पेले, शर्टाची बटणे व देवादिकांच्या मूर्ती, देवळाचे कळस, देवळाचे दरवाजे, खिडक्या इ. अनेक प्रकारच्या चांदीच्या वस्तू इथे बनविल्या जात होत्या. यांचा दर्जा उत्तम होता. त्यापैकी अद्यापही काही वस्तू बनविल्या जात आहे. पण त्यावेळी नाशिकमध्ये हस्तकला प्रचलित होती. त्याला मुख्य कारण म्हणजे बाजारपेठ उपलब्ध होती. या मौल्यवान वस्तू घेणारे त्यावेळचे राजे- राजवाडे पेशवे व श्रीमंत सरदार हे मुख्य आधारस्तंभ होते. संस्थानिकांची, सरदारांची, पेशव्यांची उचलबांगडी झाल्यावर या कलेचा राजाश्रय संपला, सहाजिकच या क्षेत्रातील कलाकारांची परिस्थिती बिघडून त्यांना उदर निर्वाहासाठी दुस-या क्षेत्रात पदार्पण करावे लागले.

हस्तशिल्प विकास आयुक्तांनी या संदर्भात, ‘बाबसाहेब आंबेडकर विकास योजना’ या नावाची एक नवीन योजना पुढे आणली आहे. हस्तशिल्प विकासासाठी कारागीरांना अधिक उद्युक्त करणारी, उद्योग कला वाढविणारी, रोजगार देणारी, त्यांच्या तांत्रिक गरजा पाहणारी, त्यांच्या मालाला बाजारपेठ देणारी, आर्थिक वाढीसाठी प्रयत्न तसेच सामाजिक उन्नतीसाठी त्यांना सांघिक विमा देणारी अशी ही योजना आहे. या योजने अंतर्गत उद्योगासाठी व राहत्या घरासाठी सुविधा, आरोग्यदायक वातावरण जातीय सलोखा, हे देखील साधता येते.

राष्ट्रीय डिझाईन आणि वस्तू निर्मिती विकास केंद्र (National Centre for Design & Product Development = NCDPD) मुख्य उद्योगांमध्ये- हस्तशिल्प वस्तूंना नवीन व आकर्षक डिझाईनचा साज चढवून बाजारात उतरविणे, त्यानुसार मालाचा दर्जा सुधारणे, त्याला देशात व परदेशात बाजारपेठ मिळणे इत्यादि आहेत. कारागीरांना रोजगाराची वाढीव संधी मिळते. त्यांची कलाकुसर त्यातून वाढते.

बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेचे फायदे घेण्यासाठी स्वावलंबी गट (Self Help Group=SHG) स्थापण्याची आवश्यकता आहे. कमीत कमी एकानेच हस्तकला क्षेत्रातील व निरनिराळया क्षेत्रातील ५/२५ कारागीर एकत्र येऊन स्वावलंबी गट स्थापन करावयास हवा. हा गट (Cluster Area) मध्ये स्थापन होणे अपेक्षित आहे. तसेच या गटातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हा गट एकमेकांवर अवलंबून
असला तरी स्वावलंबी असेल. त्यामुळे प्रत्येकाच्या उदयोजकतेला वाव मिळेल.

स्वावलंबी गटाला (Self Help Group = SHG) मुख्यत्वे खालील फायदे मिळतील :

१ सामाजिक (social) – स्त्रियांची उन्नती, पुढाकार घेण्याची वृत्ती वाढते स्त्री आणि पुरूषांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते.

२ तांत्रिक सुधारणा (Technical) – मालाचा दर्जा सुधारणे, कमीत कमी खर्चात उत्पादन वाढविणे, नवीन उत्पादन पध्दत आणणे, नवीन डिझाईन किंवा जुन्या डिझाईन मध्ये सुधारणा आकर्षक आणि सुधारीत बनविण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा, उत्पादन क्षेत्रातवाढ, सांघिक क्षमता वाढविणे अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात.

३ बाजारपेठ (Marketing) – आपण बनविलेल्या हस्तकला वस्तूला बाजारपेठ मिळवण्यासाठी सर्व माहिती सांघिक तत्वावर लवकर मिळवता येईल. विक्रीवाढीसाठी निरनिराळया पध्दती तत्सम ग्रुपशी सहकार्याची माहितीची देवाण-घेवाण, व्यवस्थापनाचा अनुभव, व वाढ, विक्री वाढविण्यासाठी जाहिरातीचे अवलंबन तसेच बाजारपेठेच्या चाचणीसाठी छोटया मोठया प्रदर्शनांत संधी मिळू शकते. ही प्रदर्शने देशात व परदेशातही भरवता येतात. या योजनेतर्फे, त्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

४ आर्थिक (financial) – योग्य बचत करणे व एकमेकांशी आर्थिक सहकार्याची भावना वाढविणे या गोष्टींचा अनुभव घेऊन निरनिराळयापतपेढी वा वित्तीय संस्था यांच्या कडून आर्थिक मदत मिळवता येते.

५ कल्याण (welfare) – बाबासाहेब आंबेडकर विकास योजने मध्ये (SHG) स्वावलंबी गटातील प्रत्येकाला खालील सुविधा प्राप्त होऊ शकतात.

१ हेल्थ सीकेज विमा
२ सांघिक विमा
३ वर्कशेड
४ घर
५ कलाशिक्षण
६ आरोग्यदायक वातावरण
७ सामाजिक समतोल साधणे.

हस्तशिल्प विकास आयुक्त यांनी जाहीर केलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर विकास योजने’ची मदत घेऊन नाशिक मधील नष्ट होणारी/होऊ पाहणारी चांदीपासून अनेक कला वस्तू बनविण्याची हस्तकला पुनरूज्जीवित करायचे योजिले आहे.

उद्योजक केंद्राच्या व्यवस्थापकांनी राज्यशासनाकडून योग्य मदत मिळेल असे अश्वासन दिले आहे. तसेच कन्सारा कारागीर सहकारी संघ लि. यांनी योग्य सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे. तसेच स्थानिक व्यापारी डिझाईनर व्यावसायिक यांची एक कमिटी निर्माण करून या कार्याची धुरा पुढे नेण्याचे ठरविले आहे. यादृष्टीने विचारविनिमयासाठी ज्यांना काही सूचना करावयाच्या असतील त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

हंसा नाशिक कार्यालय –
मिनाक्षी सोमपुरा,
सी एम एन्टरप्राईझ
फोन – ऑफिस – ९५२५३-२५८२३५१
फॅक्टरी – ९५२५३-२३८४४७७

मुंबई कार्यालय –
६ य-४५, मोतीलाल नगर नं. १,
एस. व्ही. रोडच्या पलिकडे,
गिरगाव पश्चिम, मुंबई- ४००१०४,
फोन – ९५२२-२८७६९३२५