उद्योगवार्ता

कॉफी शेतीचे प्रणेते तुकाराम बोराडेंचा सन्मान

नाशिक येथील प्रगतीशील शेतकरी, कॉफीच्या शेतीचे प्रणेते व सातत्याने शेतीचे नवनवे प्रयोग करणारे व नेहमीच शेतक-यांना मार्गदर्शन करणारे तुकाराम बोराडे यांना केंद्र सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यातर्फे थोर कृषी शास्त्रज्ञ प्रो. एन. जी. रंगा यांच्या नावाने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कृषी क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून विविधता प्रस्थापित करणारा आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये १ लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार दि. १९ ऑक्टोबर २००४ रोजी नवी दिल्ली येथे एका खास समारंभात तुकाराम बोराडे यांना प्रदान करण्यात आला. विविध प्रयोगशील उपक्रम राबविणा-या शेतक-यांना प्राप्त होणारा हा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तुकाराम बोराडे हे महाराष्ट्रातील आजपर्यंत हा पुरस्कार मिळालेले दुसरे मानकरी आहेत.

तुकाराम बोराडे यांनी बेदाणा प्रकल्प, अनारदाणा प्रकल्प, कॉफीची शेती, सिल्व्हर ओक व मसाल्याच्या पदार्थांची मिश्रशेती इ. विविध उपक्रम आपल्या ऍग्रो फॉरेस्ट्री या संस्थेच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबवलेले आहेत. त्यांच्या या कृषीक्षेत्रातील भरीव स्वरूपाच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण व वनश्री हे बहुमान देऊन गौरविले आहे. त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्रच्या राज्यपालांनी नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभ्यासू वृत्तीमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची जागतिक व्यापार संघटनेच्या महाराष्ट्रच्या कार्यकारी गटावर तज्ञ सदस्य म्हणून नेमणूक केलेली असून केंद्र सरकारनेही महाराष्ट्रातील बियाणे प्रमाणीकरण उपसमितीवर सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. पुरस्काराची रक्कम सामजसेवेसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी व यापुढील संशोधनासाठी वापरण्याचा मनोदय तुकाराम बोराडे यांनी व्यक्त केली आहे.