सखी

मातृत्व

गर्भारपणातील समस्या

pregnancy problems गर्भवती मातेस, गर्भधारणेनंतर लगेचच विशिष्ट काळ गेल्यावर काही तक्रारी निर्माण होतात. मळमळणे, उलटया होणे – याला आपण डोहाळे लागणे असेही म्हणतो. काही स्त्रियांना हा त्रास बराच काळ होत रहातो. विशिष्ट काळानंतर (सुमारे २-३ तासांनी) पचनास हलके व थोडे थोडे खावे त्यामुळे या त्रासातील तीव्रता कमी होण्यास मदत होते.

बध्दकोष्ठ
ज्या स्त्रिया सुयोग्य प्रमाणात पालेभाज्या, द्रव पदार्थ व फळे यांचे सेवन करत नाहीत, त्यांना हा त्रास होतो. त्यातूनच छातीत जळजळणे व गॅसेसचा त्रास सुरू होतो.

रक्त कमी असणे

ज्या स्त्रियांचा आहार या काळात संतुलित नसतो व त्यात लोह, प्रथिने, जीवनसत्वे इ. सारख्या आवश्यक घटकांचा समावेश नसतो, त्यांच्या शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण कमी होऊन, हा त्रास होतो. विशेषत: लोह व बी कॉम्पलेक्स या दोन घटकांची कमतरता निर्माण होते. काहींच्या पोटात जंतही होतात. पालेभाज्या, गव्हाचे अन्नपदार्थ, अंडी , मटन, मासे खाऊन या तक्रारीची तीव्रता कमी करता येते.

विशिष्ट पदार्थ खावेसे वाटणे
काही गर्भवतीस्त्रियांबाबत ही तक्रार आढळते. काहीना खूप आंबट पदार्थ तर काहींना माती इ. पदार्थ खाण्याची प्रबळ इच्छा होते. याचे नेमके कारण तज्ञांना उलगडले नाही. परंतु या स्त्रीच्या शरीरात विशिष्ट अन्नघटकाची कमतरता निर्माण झाल्याने हा दोष निर्माण होऊ शकतो, हे निश्चीत आहे.

छातीत जळजळणे
गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाचा आकार वाढतो. त्यामुळे पचन संस्थेवर व पोटावर दबाव येतो व त्यामुळे हा त्रास होतो. मधून मधून थोडे थोडे खाल्याने हा त्रास कमी होतो.

पायांना गोळे येणे
गर्भवती स्त्रीच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने तिला हा त्रास होऊ शकतो.

जाडी वाढणे
गर्भवती माता व तिचे भ्रूण या दोघांच्या सुरक्षिततेस यामुळे बाधा येऊ शकते. वैद्यकीय सल्ला घेऊन, आपल्या आहारात योग्य नियंत्रण/बदल करावा. म्हणजे वजन घटण्यास मदत होऊ शकते.

अल्पवयीन माता
कायद्याने विशिष्ट वय उलटल्यावर मुलीचे लग्न करावे. असे घातलेले बंधन शास्त्राच्या दृष्टीनेही विचारात घेण्यासारखे आहे. कुमारावस्थेतील (१६ ते २० पर्यंत) गर्भवती मातेचे गर्भारपण थोडे अवघड असते. कारण मुख्य म्हणजे तिच्या शरीराचीच वाढ पूर्णत्वाला गेलेली नसते. त्यामुळे त्यांच्या भ्रूणांचे पोषण व वाढीस अडथळे येऊ शकतात. अशा मातांची मुले बरेचदा खूपच कमी वजनाची व अशक्त निपजतात. त्यांच्या मृत्युचे प्रमाणही अधिक असते. म्हणूनच १६ ते १९ वयाच्या स्त्रीने गर्भारपण टाळावे, गर्भवती राहिल्यास आहाराबाबत खूपच जागृत असावे.

इतर आजार
मधुमेह, डांग्याखोकला, विशिष्ट प्रकारची कावीळ (German measle) झालेल्या गर्भवती मातेने खूपच काळजी घ्यावी. तिचा आजार भ्रूणासही अपायकारक ठरू शकतो. वैद्यकीय तज्ञांकडून त्वरित उपाययोजना सुरू करावी. मधुमेहाची तक्रार असलेल्या स्त्रीने आहाराबाबत खूपच काटेकोर असावे. रक्तशर्करेचे प्रमाण वाढणे वा कमी होणे, हे तिला अतिशय धोकादायक ठरू शकते. गुप्तरोग झालेल्या पित्यामुळे, मातेकडे त्याचे जंतू संक्रमित होतात व मातेकडून गर्भात वाढणाया भ्रूणापर्यंत ते पोचून, त्यालाही हा विकार त्रास देऊ शकतो. अशी मुले मतीमंद निपजण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच याबाबतही पती-पत्नींने जागरूक असावे.