मराठी संत

संत तुकाराम

sant-tukaram महाराष्ट्रीय संतामध्ये जगदगुरू श्री. तुकोबारायांचे स्थान अनन्य आहे. सामान्य कुणबी कुळामध्ये जन्म घेऊन ब्रम्हज्ञान्यांना लाळ घोटविण्यास लावण्याची प्रतिज्ञा करणारे महाराज आपली वाणी भगवत्कृपेने प्रसवली म्हणून सांगतात. महाराजांचा वाणीचा प्रभाव त्यांचे चरित्राइतकाच मोठा आहे आणि वाणीप्रमाणे त्यांचे चरीत्रही दिव्य आहे.

श्रीगुरू विश्वभंरबाबा यांचे सेवाभावाने भगवान श्री पांडुरंग ही देहूस गेले व त्यांची सेवा पुढील पिढीने केली आणि सात पिढयांच्या अव्याहत सेवेनंतर आठव्या पिढीला महाराष्ट्राच्या परमार्थ क्षेत्रावर हरिभजने जग धवल करणारे महाराज अवतरले. पिता श्री बोल्होबा व माता कनकाई यांचे उदरी महाराजांचा अवतार माघ शुध्द पंचमी शके १५३० मध्ये झाला. महाराजांच्या जन्मकाळी बोल्होबांनी श्रीमंती वाखाणण्याजोगी होती.

वयाच्या १२ वर्षापर्यंत महाराज अतिशय लाडात व वैभवात वाढले. वयाच्या ११ व्या वर्षी बोल्होबांनी महाराजांचे लग्न केले. त्यांचे पहिल्या पत्निंचे नाव रखुमाबाई असे होते. पण तिला दम्याचा आजार होता. त्यामुळे घरातील काम होत नसे, म्हणून वयाच्या १३ व्या वर्षी बोल्होबांनी महाराजांचा दुसरा विवाह केला. महाराजांची दुसरी पत्नी सर्वांची आवडती होती म्हणून तिचे नाव ‘आवडी’ रुढ झाले.

१७ वर्षे पर्यत महाराजांना प्रापंचिक दू:खाची जाणिव नव्हती पण या दरम्यान थोरले बंधु सावजींची पत्नी वारली व ते विरक्त होऊन निघून गेले. त्यामुळे व्यापाराचा भार महाराजांवर आला. याचकाळात वृध्द बोल्होबा गेले त्यामुळे महाराज पोरके झाले. या दु:खात भर म्हणून त्यांचे १९ वर्षी महाराष्ट्रभर दुष्काळा व तो दोन वर्ष राहिला. या आपत्तीत महाराजाची सावकारकी बसली. पहिली पत्नी, संतोबा नावाचा मुलगा व माता कनकाई हे लागोपाठ गेले व या अकस्मित दू:खाने महाराज खचले व विरक्त होऊन भामचंद्रावर गेले. तिथे विणा अन्नपाण्याचे १५ दिवस चितंन करीत असतांना त्यांना विश्वात्मक देवाचे व्यापक स्वरुपाची जाणिव झाली व तेथून मागे परतल्यावंतर त्यांचे प्रापंचिक जीवन संपूर्ण बदलून ते ‘उपकारापुरते’ उरले.

दुष्काळ संपल्यानंतर जिजाऊनी महाराजांना प्रपंचात प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केला पण महाराज ‘दिनरजनी हाचि धंदा’ करण्यात प्रवृत्त झाले त्यामुळे भौतिक प्रपंचात रमले नाहीत. भंडारा, भामचंद्र व घोराडेश्वर या एकांत वसतीला डोंगरावर भजनात रमू लागले. याच वैफल्यातून जिजाऊ कर्कश बनल्या मात्र मुळात त्यांचा स्वभाव तसा नसावा तेच तारण्यामध्ये वैभव नष्ट झाले.

महाराजांची साधना दृढ झाली व त्यांना चैतन्य मालिकेतील अधिकार संपन्न श्रीगुरू बाबाजी चैतन्यांचा स्वप्नदृष्टयानें अनुग्रह झाला. अशाच प्रसंगाने श्री पंढरीराय व नामदेवरायांची काव्य करण्याची आज्ञा झाली व महाराजांची प्रासादिक वाणी अमृताचा वर्षाव करु लागली. मात्र वैदिक परंपरेतील कर्मठ व दांभीक पक्व अहंकार या काव्याला प्रतीबंध झाला व रामेश्वर शास्त्री यांच्या आज्ञेने महाराजांना सर्व अंभगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवाव्या लागल्या. याही कसोटीत भगवंतानी वह्यांचे रक्षण करुन महाराजांचे दिव्यत्व व अलौकीकत्व सिध्द केले. पुढे अनगाशहाचे शापानें निर्माण झालेला रामेश्वरांचे अंगाचा दाह महाराजांच्या वचनाने शितल झाला व ते महाराजांचे एकनिष्ठ पंचकोशीमध्ये फिरत होते असे १४ टाळकरी महाराजांचे होते.

पुर्णत्वाने व सफलते जगून वयाच्या ४१ व्या वर्षी महाराजांनी पांडुरंगास वैकुंठास नेण्याची आळी घातली व ती देवाने पूर्ण केली. फाल्गुन वैद्य द्वितीया शके १५७१ या दिवशी महाराजांचे अदभूत व अद्वितीय असे सदेह वैकुंठगमण झाले. अवघ्या महाराष्ट्रावर त्यांचे ऋण असून संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांचा अनुग्रहीत आहे. त्यांनी आपल्या अंभगातून स्पष्ट केले की आपण प्रपंच करतांना सुध्दा भक्ती करु शक्ती. ‘संत जाणा जगी दया क्षमा ज्यांचे अंगी’ असे हे संत तुकाराम.

तुकोबांचे कवित्व प्रयत्नसाध्य आणि लौकिकासाठी नव्हते. ‘नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे पांडुरंग येवोनिया || सांगीतले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलू नये || हि त्यांच्या कवित्वाची मूळ प्रेरणा. आत्मविकासाच्या मार्गात आलेल्या अनुभूती त्यांनी आत्मनिष्ठ भूमिकेतून उस्फुर्तपणे व्यक्त केल्या. ‘नव्हते माझे बोल बोले पांडुरंग’ , ‘ वचनाचा अनुभव हाती | बोलविती देव मज’, आपुलिया बळे नाही मी बोलत | सखा कृपावंत वाचा त्याची ||’, परी त्या विश्वंभरे बोलविले’ इत्यादी त्यांच्या काव्यनिर्मीती मागील पारमार्थिक प्रेरणा लक्षात येतात. ‘झाडू संतांचे मार्ग | आडरानी भरले जग’, बुडते हे जग न देखावे डोळा | येतो कळवळा म्हणवूनी | हेही त्यांच्या काव्यनिर्मितीमागील उद्दिष्ट तितकेच महत्वाचे आहे.

आपल्या कवित्वाचे श्रेय ते अशा रीतीने परमेश्वराला देत असले , किवा नामदेवांनी स्वप्नात येऊन कवित्वनिर्मितिचा दृष्ठांत दिला असला, तरी ‘तुका म्हणे झरा | आहे मुळाचीच खरा’ असाच प्रत्यय त्यांच्या अभंग वाङ्मयाच्या अभ्यासकाला आल्याशिवाय राहत नाही. ‘अणुरणीया थोकडा | तुका आकाशाएवढा |’ अशी सर्वात्मक भावना तुकोबांना ज्या भक्तीतून प्राप्त झाली, त्या भक्तीचे महात्म्य ते परोपरीने गातात. त्यांचा भक्तिमार्ग कर्माप्रधान आहे, त्यात संन्यास्याला थारा नाही. उलट भक्तीतून आत्मसाक्षात्कार हेच वेदांताचे सार त्यांच्या अनुभवला आल्यामुळे ‘वेदांचा अर्थ तो आम्हासी ठावा | येरांनी वाहवा भार माथां | असे तुकोबा आत्मविश्वासाने म्हणतात. या भक्तिमार्गातून त्यांना परंपराप्राप्त उदात्त विचारांचे संगोपन आणि नवीन मूल्यांचे संवर्धन करायचे होते.

संत एकनाथ

sant-eknath शांतीब्रह्म, ‘संत’ पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने सा-‍या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ!

आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दात त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत. जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे. यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा. यांचे कुलदैवत सूर्यनारायण होते. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

एकनाथांचे गुरू सदगुरु जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सदगुरु म्हणून संत एकनाथांनी यांना मनोमनी वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली. साक्षात् दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. गुरुंकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.

नाथांनी सदगुणी, सुलक्षणी मुलीशी म्हणजेच गिरीजाशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा होता. त्यांचा मुलगा हरिपंडित या नावाने प्रसिध्द झाला, परंपरेचा अतिशय अभिमानी होता. कवी मुक्तेश्र्वर हे नाथांचे नातू होत.

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’ऐका जनार्दन’ म्हणून स्वत:चा उल्लेख करत. ऐका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध घेतला.

अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. ह्यात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाणा) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला व अनंतात विलिन झाले.