भोंडल्याची गाणी

काऊ आला बाई

कोणे एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला
त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले
सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले
सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले
कांडून कांडून राळा केला बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली
त्याच पैशाची घागर आणली बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका-तुटका
डोक्याला पागोटे फाटके-तुटके
पायात वहाणा फाटक्या-तुटक्या
कपाळी टिळा शेणाचा
तोंडात विडा घाणेरडा किडा
हातात काठी जळकं लाकूड
दिसतो कसा बाई भिका-यावाणी बाई भिका-यावाणी

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे भरजरी
पायात वहाणा कोल्हापूरी
कपाळी टिळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
हातात काठी चंदनाची
दिसतो कसाबाई राजावाणी बाई राजावाणी

अडकित जाऊ

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा वामन
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा दत्ता
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती वांगी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा हेमांगी
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती दोरी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा गौरी
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती पणती
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा मालती
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती घागर
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा सागर

अक्कण माती

अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं.

कोथिंबीरी बाई गं

कोथिंबीरी बाई गं
आता कधी येशील गं
आता येईन चैत्र मासी
चैत्रा चैत्रा लवकर ये
हस्त घालीन हस्ताचा
देव ठेवीन देव्हा-या
देव्हा-याला चौकटी
उठता बसता लाथा-बुक्की

हरीच्या नैवेद्याला

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात
नेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली.
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पु-या छान
नेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली

नणंदा भावजया

नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी.