भोंडल्याची गाणी

कारल्याचा वेल

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्टं काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा.

एक लिंबू झेलू बाई

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी

अरडी गं बाई परडी

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासरा
सास-याने काय आणलंय गं
सास-याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई
अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं
सासूने आणल्या बांगडया
बांगडया मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल दीर
दीराने काय आणलंय गं
दीराने आणले तोडे
तोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल जाऊ
जावेने काय आणलंय गं
जावेने आणला हार
हार मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल नणंद
नणंदेने काय आणलंय गं
नणंदेने आणली नथ
नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल नवरा
नव-याने काय आणलंय गं
नव-याने आणले मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई
झिपरं कुत्रं बांधा गं बाई बांधा गं बाई…

यादवराया राणी

यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
सासूबाई गेल्या समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
अर्धा संसार देते तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
सासरे गेले समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
तिजोरीची चावी देतो तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
दीर गेले समजावयाला
चला चला वहिनी अपुल्या घराला
नवीन कपाट देतो तुम्हाला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
जाऊ गेली समजावयाला
चला चला जाऊबाई अपुल्या घराला
जरीची साडी देते तुम्हाला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
नणंद गेली समजावयाला
चल चल वहिनी अपुल्या घराला
चांदीचा मेखला देते तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
पती गेला समजावयाला
चल चल राणी अपुल्या घराला
लाल चाबूक देतो तुजला
मी येते अपुल्या घराला
यादवराया राणी घरास आली कैसी
सासूरवाशीण सून घरास आली कैसी