भोंडल्याची गाणी

अश्विन शुध्द प्रतिपदेस घटस्थापना होऊन माता दुर्गेचा उत्सव सुरू होतो. या नवरात्रीमध्ये अंबेची आराधना करण्याची प्रथा भारतभर आहे. गुजराथमधील गरबा, कर्नाटकातील यक्षगान, आंध्र-प्रदेशातील रामलीला, महाराष्ट्रातील भोंडला (हादगा) व देवीचे जागरण या आपल्या देशातील परंपरा आहेत.

bhondla ‘या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नम: तस्यै, नम: तस्यै नम: तस्यै नमो नम:॥’

… अशी अंबेची आराधना करण्याचे हे दिवस. अष्टमीच्या दिवशी नवरात्री जागवताना महाराष्ट्रात म्हटले जाणारे काही पारंपरिक भोंडल्याची व हादग्याची गीते सादर करीत आहोत.

खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ

खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ
शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ
बिंदी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं भांगात
नथ ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं नाकात
कुडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं कानांत
हार ठेविला तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं गळयात
डोरलं ठेविलं तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं गळयात
वाकी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं दंडात
बांगडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं हातात
तोडे ठेविले तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं हातात
अंगठी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं बोटात
पैंजण ठेविले तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं पायात
जोडवी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं पायात
खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ
शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ

श्रीकांता कमलाकांता

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.

काळी चंद्रकळा

काळी चंद्रकळा नेसू कशी
पायात पैंजण घालू कशी
दमडीचं तेल आणू कशी
दमडीचं तेल आणलं
मामंजींची शेंडी झाली
भावोजींची दाढी झाली
सासूबाईंचं न्हाणं झालं
वन्सबाईंची वेणी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
हत्तीणीचा पाय लागला वेशीबाहेर ओघळ गेला
सासूबाई सासूबाई अन्याय झाला चार चाबूक अधिक मारा
दहीभात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा.

ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो