एक टक्क्याची गोष्ट


एच आय व्ही समस्येची उकल – २

एचआयव्ही समस्येची एक उकल होते ती तिच्या मुळे होणा-या रोगाची शास्त्रीय माहिती मिळवून. जी आपण मागच्या भागात घेतली. दुसरा महत्वाचा प्रांत आहे तो एचआयव्ही लागणीचा समाजात असलेल्या स्वरूपाचा. तो आपण ह्या भागात पाहूया –

लैंगिक संबंधातून एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता, दूषित रक्त भरून होणा-या लागवी पेक्षा जवळपास शंभर पटीनं कमी असते. पण भारतात व जगातही सर्वाधिक एचआयव्ही बाधीत हे लैंगिक संबंधातूनच लागण होऊन एचआयव्ही बाधित झालेले असतात. त्यात नवल नाही. लैगिक संबंधाची व्याप्ती व संख्या ही रक्त भरण्याच्या संख्येपेक्षा अनेकपट जास्त आहे.

मानवी जीवन हे अगम्य आहे! प्रत्येक व्यक्तीची लैंगिकता ही सुध्दा अगम्य आहे. लैगिक बाबतीत कोण कसा वागेल हे सांगण शक्य नाही.

पूर्वीही पुण्यात, पेशवाईत, बावनखणीत जाणं हे प्रतिष्ठेचे लक्षण होतेच. अनेक स्त्रिया असणं (अंगवस्त्र) हे ही प्रतिष्ठेचं लक्षण होतं. फार प्राचीन काळी कामशास्त्राचा उगम आपल्याच देशात झाला होता. देवदासीसारखी वेश्याव्यवसायाची अधिकृत धार्मिक व्यवस्थाही होती.

आधुनिक जगात अनेकपटीनं बदल होत आहेत. मिडीयाचा फार मोठा हातभार आता लैंगिक उद्दीपनासाठी लागतो आहे. माझ्या मुलींवर होणारा मल्टीप्लेक्स मधला भडिमार हा माझ्या तरूणपणाच्या तुलनेत अनेक पटीनं जास्त आहे. त्यात लग्नाचं वाढत वय, हे वयात आल्यावर अनेक वर्षे लैंगिक संबंधापासून वंचित ठेवत आहे. लग्नाचं पावित्र्य निघून गेलं आहे व ती एक मानव निर्मित संस्था झाली आहे. सहजपणे दोन चार लग्न करणा-या व्यक्तीमत्वांनी, टीव्ही मालिकांनी याबद्दल एक सहज वृत्ती निर्माण करत आहे.

परवाच एक काऊंसेलर मैत्रिण सांगत होती की बारावी परीक्षा पास झाल्यावर सहजपणे एक तरूण टोळकं सेलीब्रेट करायला वेश्यांकडे जाऊन आली !

मद्यपानाची वाढती समाजमान्यता तरूणाईचा होश घालवून…बरं वाईटाची रेषाही पुसट करत चालली आहे. लैंगिक संबंध आता लग्ना अगोदर, लग्नाबाहेर सहज होत आहेत.

पण लैंगिक शिक्षणाचा अभाव हे आपलं वैशिष्टय. कोंबडा झाकला म्हणजे सूर्य उगवणार नाही अशी ही वृत्ती अर्थातच एक टक्क्याचा एचआयव्ही आता उंबरठयावर आहे. प्रत्येकाच्या.

लैंगिकतेचं हे वास्तव खुल्या मनाने व प्रामाणिकपणे स्वीकारल्याशिवाय एचआयव्ही समस्येची उकल होईल? नाही होणार. एचआयव्हीची लागण ही दूषित सुया व हत्यारांनी होते. त्याचं स्वरूप नेमकं माहीत नाही. पण होते हे नक्की. खेडयापाडयात व झोपडपट्टीत सलाईन आणि इंजेक्शनच्या वापरा बाबत डॉक्टरांची बेपर्वाई हे नक्कीच महत्वाचं वास्तव आहे. त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेच आहे. तरच एचआयव्हीची समस्‍या समजून घेता येईल.

रक्तपेढयांनी आता खूपच दक्षता घेणं सुरू केलं आहे. सरकारी यंत्रणांनी तिथे नक्कीचं महत्वाचं योगदान दिलं आहे. पण तरीही आपल्या समाजात नियमित रक्तदार, नेत्रदान अशा गोष्टी खूपच कष्टानं घडतात. “रक्तदान हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाला मी करीन” अशी हजारो लक्षावधी माणसं तयार झाली तरच रक्ताचा शुध्द पुरवठा व्यवस्थित होईल व या मार्गाची लागण पूर्ण थांबेल.

सर्वात ह्दयद्रावक प्रकार भारतात आता भेडसावतोय तो स्त्रिया व मुलांमधला एचआयव्हीचा.गेल्या कित्येक वर्षात स्त्रियांना एचआयव्ही होण्याचं प्रमाण कमी होतं ते आता पुरूषांच्या बरोबर झालं आहे. बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या पतीपासून एचआयव्हीची लागण झालेली असते. व या स्त्रिया ज्याचं नुकतच लग्न झालेलं असतं. त्या ब-याच वेळा आपल्या बाळाला एचआयव्हीची लागण देऊ शकतात. जरी काही काळजी घेतली नाही तरी आईकडून मुलाला लागण होण्याची २५% एवढी असते. म्हणजे एका स्त्रीला चार मुलं झाली तर एकाला जन्मत: एचआयव्हीची लागण असते.पण आता त्या स्त्रीनं काळजी घेतली व औषध गंभीरपणे, बाळंतपणात व नंतर घेतली तर शंभरात फक्त दोनचं बाळांना एचआयव्हीची लागण होऊ शकते. शंभरात पंचवीस वरून शंभरात दोन एवढे कमी प्रमाण आता औषधांमुळे झाले आहे.

एचआयव्हीच्या लागणीचा हा सर्व पट डोळया समोर ठेऊनच आपल्याला एचआयव्हीच्या समस्येची उकल करायची आहे हे निश्चित.

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu