एक टक्क्याची गोष्ट


एच आय व्ही समस्येची उकल – १

५ जून १९८१ रोजी कॅलिफोर्नियात डॉ. ल्यूक मॉटेग्मर यांना हा ‘एचआयव्ही’ सापडला. भारतातही १९९० च्या आसपास हा सापडू लागला. वीस वर्षाचा कालावधी लोटला. जगभर व विशेषत: भारतात आपला समाज अनेक अवस्थातून या एचआयव्ही समस्येची उकल करत गेला. सर्वात पहिली प्रतिक्रिया भारतात होती, ” छे! हा समलिंगीमध्ये… वेश्या….पुरूषात आढळणारा रोग! आमची संस्कृती नाही बुवा तशी! ” पण या एवढयाशा एचआयव्हीनं खोटया भ्रामक संस्कृतीचा पडदा टराटर फाडला आज भारतात, महाराष्ट्रातही हा व्हायरस धोकादायक प्रमाणात आहे. कोणतीही समस्या सोडवायचा सर्वात पायाभूत उपाय आहे तो मुलभूत ‘ज्ञान’ मिळवण्याचा सर्वात पहिला प्रश्न हा येतो की हा व्हायरस नेमकं करतो काय?

१) हा व्हायरस सूक्ष्म आहे. अत्यंत नाजूक आहे. हवेत सुध्दा तो जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे हवेतून – पाण्यातून पसरू शकत नाही.

२) एचआयव्ही व्हायरस तो रक्त व लैंगिक स्त्रावात जास्त प्रमाणात सापडतो. दूषित रक्तातून तो पसरण्याची शक्यता जवळपास ९५ टक्के असते. तर एक लैगिक संबंधातून पसरण्याची शक्यता दोनशे मध्ये एक असते. अर्थात हे संख्याशास्त्र आहे. याचा अर्थ असा नाही की १९९ वेळा असुरक्षित संबंध ठेवणारा सुटणार! एखाद्या व्यक्तीला तो पहिल्याच शरीर संबंधातही होऊ शकतो!

३) स्त्रीकडून पुरूषाला लागण होण्याचे प्रमाण कमी असते!

४) एचआयव्हीचे विषाणू शरीरात शिरले की ब-याच केसेसमध्ये त्या व्यक्तीला काहीही त्रास होत नाही! काही व्यक्तींना सर्दी आणि थोडासा ताप येतो व निघून जातो.

५) एचआयव्हीचे विषाणू शरीरात सर्वत्र लपून राहतात. पांढ-या रक्तपेशी मधल्या CD4 नावाच्या पेशी त्यांच्या आवडत्या गि-हाईक.

६) प्रत्यक्ष CD4 पेशीत शिरून हे विषाणू त्या पेशीच्या न्युल्कीअस मध्ये आसरा घेतात. शरीराची रोगप्रतिकार शक्तीत्या लपलेल्या एचआयव्ही विषाणूंचा नाश करू शकत नाही! शत्रूचे सैनिक आपल्या गोडावूनमध्ये शिरले व आतुन कुलूप लावलं तर रिकाम्या हाताचे आपले सैनिक त्यांचा नाश कसा करणार? तसाच हा प्रकार.

७) ही लपलेली पिलावळ आपली पुढची लेकरं प्रसवते व ही CD4 पेशीतून बाहेर रक्तात पसरतात.पहिल्या पहिल्यांदा काहीवेळा ही आक्रमणं शरीराच्या इतर पांढ-यापेशी व अबाधित CD4 पेशी परतवून लावतात.

८) या वेळात ती व्यक्ती एचआयव्ही पॉझीटीव्ह असते (रक्त तपासून ते समजतं). त्या व्यक्तीने जर स्वत:च दूषित रक्त दुस-या व्यक्तीला दिलं किंवा तिनं असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला तर ती व्यक्ती एचआयव्हीचा प्रसार व लागण दुस-या निरोगी व्यक्तीला करू शकते. ही एचआयव्ही पॉझिटीव्ह स्त्री जर गर्भवती झाली तर तिच्या बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

९) पण पहिली अनेक वर्ष ही व्यक्ती फक्त एचआयव्ही पॉझिटीव्ह असते. ती एड्सनं आजारी नसते.

१०) निरोगी व्यक्तीच्या शरीरात CD4 पेशी १००० ते १२०० प्रति सी.सी. असतात. एचआयव्ही पॉझीटीव्ह व्यक्तीत आता रस्सीखेच सुरू होते.

११) हळूहळू एचआयव्ही चे विषाणू हे CD4 पेशी या पांढ-या रक्त पेशीतल्या एक बटालियन आहेत. सर्व साधारण अपवाद वगळता दरवर्षी CD4 पेशी १०० ते २०० अशा कमी होतात.

१२) जशीजशी रोगप्रतिकारक CD4 पेशींची संख्या घटत जाते. ती व्यक्ती दुर्बल होऊ लागते.

१३) नागिण, जंगल इन्फेक्शन (बुरशी), टीबी असे आजार आधी होतात व CD4 पेशींचे प्रभाव १२०० वरून २०० वर आलं, (जे ८ – १० वर्षात होतं) की त्या व्यक्तीचं शरीर कोणत्याच रोगजंतूचा प्रतिकार करू शकत नाही.

१४) आता प्रत्येक रोगाचे जंतू या क्षीण शरीराचा ताबा घ्यायला सरसावतात. मेंदूचा व शरीरभर पसरलेला टीबी, डायरीया, न्यूमोनिया, मेंदूतील कॅन्सर, इत्यादी अनेक रोग त्या शरीरात वस्ती करतात. त्यांना अटकाव करायला कुणीच नसतं. वजन घटणे, अंगावर गाठी येणे, डायरीया, टीबी होणं अशा अनेक समस्या उभ्या राहतात. एचआयव्ही पॉझिटीव्ह पेशंटला आता ‘एड्स’ झालाय व आता तो काहीच दिवसांचा सोबती आहे असे सांगण्यात येतं.

१५) एचआयव्ही पॉझिटीव्ह होणं ते एड्सचा रोगी होणं हा असा लांबचा प्रवास असतो. १६) ही माहिती अर्धवट/खरी/खोटी/ समाजात पसरली आहेच. म्हणूनच एचआयव्ही पॉझिटीव्ह झालेला/झालेली पंचवीशीतील व्यक्ती डॉक्टरांना हताश होऊन प्रश्न विचारते,
”आता किती दिवस राहिले माझे?”

काय आहे याचं उत्तर? पुढच्या सदरात बघूया.

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu