१.एच.आय.व्ही हा एक व्हायरस आहे. बॅक्टेरीआ व व्हायरस या दोन्हीमुळे रोग होतात. बॅक्टेरीआ मारणारी ऍ़न्टीबायोटिक आहेत. १९५० च्या आसपास पेनीसिलीनचा शोध लागला. त्यामुळे आता पूर्वी जशी कॉलरा, न्यूमोनिआ, टाईफाईडच्या साथीत हजारो माणसं मरत, तशी मरत नाहीत. किंबहुना बॅक्टेरिआमुळे होणा-या रोगांची भितीच नष्ट झाली आहे. ‘आम्ही नाही बुवा ऍ़न्टीबायोटीक घेत!’ म्हणणा-या नाजुक सुशिक्षितांना हा इतिहास माहितही नाही, दुर्देवानं!
व्हायरस मारणारी प्रभावी औषधं नाहीत! एच.आय.व्हीवर आता ऐ.आर.टी नावाची औषधं आहेत. पण ती व्हायरस समूळ नष्ट करीत नाहीत म्हणून एच.आय.व्ही चा दबदबा आहे. पूर्वी जसा कॉलरा, टाईफाईडचा होता तसा.
२. एच.आय.व्ही चं पूर्ण नाव : ह्यूमन इम्युनो डेफीशिअन्सी व्हायरस.
३. ५ जून १९८१ रोजी कॅलीफोर्नियात डी. ल्यूक माँटीग्मरना काही समलिंगी रोग्यांमध्ये प्रथम एचआयव्ही सापडला. पण एकूणच वैद्यकिय शास्त्राच्या इतिहासात जसं घडतं तसं एच.आय.व्ही बाबत सुध्दा घडलं! त्याचवेळी डी. रॉबर्ट गॅलोनी सुध्दा एच.आय.व्ही चं स्वतंत्र निदान केलं होतं. अर्थातच एच.आय.व्ही चा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे, ”या दोघांनी.” (श्रेयासाठी दोघांमध्ये खूप घनघोर युध्द ही झालं!)
४. पूर्वी नव्हता…आता कुठून आला हा पाहुणा?
खरं उत्तर आहे….माहित नाही!
काहीजण म्हणतात या बाळाच्या चुलत भावाकडून म्हणजेच आफ्रिकेतल्या काही माकडांकडून हा ‘राक्षस’ बाटली बाहेर आला.
काही म्हणतात जैविक अस्त्र तयार करतांना हा चुकून बाटली बाहेर पडला. काही म्हणतात परग्रहावरून!
५. याच्या दोन जाती. एच.आय.व्ही १ ही खूप विषारी, पसरणारी जात. एच.आय.व्ही २ ही तुलनेनं कमी पसरणारी जात. भारतात एच.आय.व्ही १ जवळपास ९८% आहे.
६. आज घटकेला भारतात ५७ लाख एच.आय.व्ही बाधीत आहेत. जेव्हा एच.आय.व्ही बद्दल माहिती झाली तेव्हा भारतात असा सूर होता की आमच्या संस्कृतीत एड्स? शक्यच नाही! आता आपण आफ्रिके पाठोपाठ आहोत नंबरात. लहान बाळं व स्त्रियांमध्ये एच.आय.व्ही चं प्रमाण आता जास्त वेगाने वाढत आहे.
७. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात एचआयव्हीचं धोकादायक प्रमाण आहे. जेव्हा सर्वसाधारण गर्भवती स्त्रीमध्ये एच.आय.व्हीचे प्रमाण १% पेक्षा जास्त असते. तेव्हा त्या समाजात धोकादायक प्रमाण आहे असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात तशी परीस्थिती आहे.
८. असुरक्षित लैगिक संबंध, दुषित सुया, , दुषित रक्त व अवजारे आणि आईकडून बाळाला या चारचं मार्गांनी एड्स पसरतो.
जाता जाता: कुठेही प्रश्न विचारला की एड्स कसा होतो? पटकन उत्तर येतं अनैतिक संबंधातून!
गर्भवती स्त्रिया ज्या एच.आय.व्ही बाधित असतात त्या बहुदा पहिलटकरणी असतात. नव-यांशी एकनिष्ठ असतात!
त्या अनैतिक संबंध ठेवणा-या नसतात!
त्यांना एच.आय.व्ही बाधा अनैतिक संबंधातून होत नसते तर असुरक्षित संबंधातून होत असते.
डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.