बळीराजा

कसे कराल दैनंदिन पाण्याचे नियोजन

daily-planning-water रोजच्या व्यवहारात स्वयंपाक, आंघोळ, धुणीभांडी आदींसाठी पाण्याची गरज आहे. परंतू पाणी वापराच्या पद्धतीमधील बदलाने पाणी कमी अधिक लागते. मनुष्याला बादली वापरून आंघोळ करण्यासाठी २० लिटर तरी पाणी लागते परंतू फवारा (शॉवर) वापरल्यास यापेक्षा दुप्पट पाणी लागते.

नळाच्या तोटीतून थेंबथेंब पाणी जात राहिल्यास दर दिवसाला बरेच लिटर पाणी वाया जाते. भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे योग्य प्रकारे नियोजन करून संयुक्तरित्या कार्यक्षम वापरास पाण्याचे नियोजन असे म्हणता येईल. पाण्याची कमतरता आणि सुयोग्य नियोजनाचा अभाव, जनतेची या बाबत अनास्था, शासकिय धोरणांमधील विलंब या सर्व बाबींमुळे नवनविन समस्या निर्माण झाल्यात. पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम झालेत. निसर्गाचा समतोल बिघडला, अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या महत्वपुर्ण जाती काळासोबत नष्ट झाल्यात. वनांचे प्रमाण कमी झाल्याने मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. शहरीकरनामुळे पाण्याचे संकट वाढले आहे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर लोकसंख्यावाढ आणि चैनिचे जीवन जगण्याची वृत्ती यांमुळे शहरीकरण जलदगतीने होत आहे. याबरोबरच औद्योगिकरणाचाही वेग वाढलेला आहे. लोकांचा ओढा शहरांकडे वाढत चाललेला आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांची पाण्याची मागणी वाढली. मुंबईला भूजलसाठ्याचे पाणी अपूरे झाल्याने ’तानसा‘ व ’ मोडकसागर ‘ या धरणांमधून पाणी पुरविले जाते. पुण्याला पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणी द्यावे लागत आहे.

daily-planning-water नाशिक शहराला गंगापूर व दारणा धरणांमधून पाणी पुरविले जाते इतरही मोठ्या शहरांची हिच स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे तसेच इतर वापराच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने “पाण्याचे सुयोग्य नियोजन” ही बाब लोकचळवळ बनने गरजेचे आहे. गावाकडे जर कोणी पाहुणे आले तर त्यांना प्रथम प्यायला पाणी देण्याची प्रथा आहे. तेव्हा त्यांना ग्लासभर पाणी प्यायला दिले जाते. ते त्यांना जास्त होते. त्यामुळे उरलेले पाणी ओतून दिले जाते. प्रत्येकवेळी ते पाणी फेकणे व ग्लास धुणे यामध्ये माणसी एक ग्लास पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी परवडणारे नाही. ज्या ज्या शहरांत गावात रोज काही तास किंवा अगदी २४ तासही पाणी उपलब्ध आहे त्यांनीही स्वतःला पाणी बचतीची सवय लावुन घ्यायला हवी. इथे पाणी वाचलं तर ते दुसर्या ठिकाणी जिथे कमी उपलब्धता आहे तिथे देता येईल असे वाटते. रोजच्या कामात कुठे पाणी वाचवता येईल , कुठे कमी पाण्यात भागवता येईल त्याबद्दलच्या उपाययोजना आखल्या पाहिजे. त्यामुळे प्रत्यक्ष पाणी बचत कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे म्हणुन हवे तितके उपसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आधीच कमी असलेली पाण्याची पातळी अजुनच कमी होईल. गाडी धुण्यासाठी पाईप लावुन फवारा मारुन न धुता, बादलीत पाणी घेऊन धुतले तर खुप पाणी वाचते. घराची फरशी, बाल्कनी, खिडक्या भरपुर पाणी वापरुन न धुता, पुसुन घेता येईल. पाण्याच्या नळासाठी एक जोडणी मिळते, त्यामुळे पाण्यात हवा मिक्स करुन पाण्याचा फ्लो जास्त वाटतो. ते जोडुन घ्यावे त्यामुळे नळ उघडल्यावर कमी पाणी वाया जाते.

daily-planning-water भाज्या धुतलेले सगळे पाणी बादलीत साठवुन ठेवुन झाडांना घालावे किंवा टॉयलेटमधे ओतण्यासाठी ठेवता येईल. भांडी कमीत कमी पाण्यात घासण्यासाठी वाहत्या नळाखाली न धुता बादली, टब मधे पाणी घेऊन धुता येतील. जेवल्यावर लगेच एखाद्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यातच सगळ्या ताटं, वाट्या व इतर भांडी यांचे खरकटे काढुन टाकता येईल. हे वाहत्या पाण्याखाली केल्यास जास्त पाणी लागते. जेवताना ग्लासमधे घेतलेले, वॉटरबॅग मधुन उरलेले पाणी सुद्धा फेकुन न देता हात धुणे किंवा झाडांना घालणे यासाठी वापरता येईल. घरी किंवा ऑफिसमधे स्प्लिट एसी असेल तर त्या एसीच्या पाईपमधुन पाणी बाहेर येते ते एका बादली साठवुन वापरता येईल. हे खरेतर अगदी शुद्ध, म्हणजे हवेतुन आलेले पाणी असते. मात्र एसीचे पाईप साफ नसल्याने पाणीही खराब होते. घरातल्या सगळ्यांना वेळोवेळी बोलुन सध्याची पाण्याची परिस्थिती आणी दुष्काळ याबद्दल बोलुन पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करायला हवे. तसेच घरकामाला येणार्‍या बायकांनाही याबाबत सांगत राहुन, पाणी कमी वापरायचे सुचवायला हवे. अप्रत्यक्ष पाणी बचत करताना अन्न वाया न घालवणे हा खुप मोठा उपाय आहे. एखाद्या वर्षी काही पिकलंच नाही तर आपण सगळेच काय खाणार त्यामुळे अन्नधान्य आयात केले तर त्याचा एकुण खर्च वाढणार. तसेच वीजेची बचत करणे मह्त्वाचे आहे. कारण धरणांमध्ये पाणीच नसेल तर वीजनिर्मिती होणार नाही. दुसरे म्हणजे हात धुताना साधारण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीकडून साधारण अर्धा ते एक लिटर पाणी वाया जाते. असे दिवसातून ३ ते ४ वेळा हात धुतला असता ३ ते ४ लिटर पाणी माणसी वाया जाते. तेव्हा हात धुताना पाणी हे मगमध्ये घ्यावे, म्हणजे पाण्याची बचत होते. एरवी बेसीनवर मोकळा नळ चालू ठेवून हात धुतला जातो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. तेव्हा वरील पद्धतीने राज्यातील व देशातील कोट्यावधी लिटर पाणी हे रोजचे वाचेल .ग्रामीण भागात दुष्काळी भागामध्ये पाणी टंचाईमुळे २ ते ३ दिवसांनी आंधोळ करतात. तेव्हा आंघोळ खाटेवर करून ते पाणी सांडपाणी किंवा कपडे धुण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणजे तेच पाणी २ ते ३ वेळा वापरले जाऊ शकते.

– अमोल मारुती निरगुडे