नृत्यकला

विविध नृत्य कला प्रकार

बाल्या नृत्य किंवा जाखडी नृत्य

प्रांत
कोकण आणि मुंबई

वाद्ये
ढोलकी किंवा मृदंग, झांजरी, घुंगरू, टाळ, बासरी, सनई तसेच यात गाणारे आणि कोरस देणा-यांनाही फार महत्त्व असते.

पेहराव
गुडघ्यापर्यंत कासोटा बांधलेले धोतर, पेशवाई पगडी, संगीत शेला असा याचा पारंपरिक वेश आहे. मात्र, बदलत्या काळात याची वेशभूषा पूर्णत: बदलली आहे. आता तर मुंबईसारख्या ठिकाणी होणारे बाल्या नृत्य बरमुडा आणि टी-शर्टवरही होत आहेत.

सादरीकरणाचा काळ
हे नृत्य साधारणत: श्रावण महिना ते दिवाळीपर्यंतच्या काळात सादर केले जाते. कारण या काळात अनेक सण-उत्सव असतात. शिवाय कोकणातील पीकही जोमात असते. त्याच्या आनंदात हे नृत्य केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात हे नृत्य विशेषत: सादर केले जाते. कोकणात तर माघी गणेशोत्सवही मोठया उत्साहात साजरा करतात. त्यावेळी हे नृत्य सादर केले जाते. पुणे, मुंबई, नाशिकसारख्या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतही हे नृत्य बघायला मिळते.

इतिहास
शाहिरी काव्य, तमाशा या लोककलांपासून या नृत्याचा उगम झालेला दिसतो. या नृत्यास ‘कलगीतुरा’ किंवा ‘शक्तीतुरा’ असेही म्हटले जाते. हे म्हणजे दोन गटांत काव्यात्मक जुगलबंदीच असते. त्यातीलच शाहिरीतून तमाशा हा लोकप्रकार पुढे आला. कोकणातील त्याचेच रूप म्हणजे बाल्या नृत्य होय.

नृत्याचे स्वरूप
बाल्या नृत्य पाहाणारा सहजच त्यावर ठेका धरतो असे हे नृत्य असते. हे नृत्य साधारणत: गोलाकार असते. एक-दोन गायक, वादक आणि कोरस देणारे हे गोलाच्या मध्यावर बसतात. त्याच्याभोवती नृत्य करणारे असतात. त्यांच्या एका पायात घुंगरं (चाळ) बांधलेले असतात. एका पायावर जोर देऊन नृत्य करणे हे या नृत्याचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नृत्य करताना स्टेप बदलताना ‘हो… हे…’ असा आवाज करत नृत्यात जोश आणण्याचा प्रयत्न केला जातो. यात सर्वप्रथम इशस्तवन करण्याची परंपरा आहे. नर्तक गुंफलेल्या नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यातही गंमत असते. ती म्हणजे सवाल-जवाब, समोरच्या गटातील चुका काढणे, प्रबोधन करणे हे सगळे गाण्यातून आणि नृत्यातून केले जाते. आता या परंपरागत नृत्यात आधुनिकता आणण्याचा बराच प्रयत्न झालेला दिसतो आहे. या नृत्यात विशेषकरून कृष्णावर गाणी गायली जातात. ‘गणा धाव रे मला पाव रे’ या गीतावर हे नृत्य प्रचलित आहे.

संदर्भ : वि. ल. भावे, ‘महाराष्ट्र सारस्वत’
संकलन – पीयूष नाशिककर