सेवासुविधा

जगभर विखुरलेल्या मराठी संस्थांचे पत्ते, मराठी पुस्तके, मराठी भाषेसंबंधीच्या काही सेवा उदाहरणार्थ भाषांतरसेवा, भाषांतराचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मराठी भाषेच्या विविध परिक्षांची माहिती इत्यादींसाठी उघडलेले हे खास दालन.

मराठी विज्ञान परिषद

Marathi Vidnyan Parishad २४ एप्रिल १९६६ साली मुंबईत स्थापना झालेली ‘मराठी विज्ञान परिषद’ ही विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. आज मितीला महाराष्ट्रात परिषदेचे ३२ विभाग असून महाराष्ट्राबाहेर बेळगाव, गोवा आणि बडोदा येथील विभाग धरता तिचे एकूण ३५ विभाग आहेत. परिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता असा आहे.

मराठी विज्ञान परिषद,
विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव, चुनाभट्टी,
मुंबई – ४०० ०२२
दुरध्वनी – ५२२४७१४, ५२२६२६८. फॅक्स – ५२२६२६८
ईमेल – vidnyan@bom7.vsnl.net.in

परिषदेचे काम जरी मुख्यतः मराठीत चालत असेल तरी गोवा, बडोदा आणि बेळगाव येथील काही कार्यक्रम तेथील राज्य भाषेत म्हणजे कोकणी, गुजराथी आणि कानडीत होतात.विज्ञान परिषदेचे चार उद्देश असून ते पूर्ण करण्यासाठी परिषद भाषणे, अभ्यास शिबिरे, अभ्यासक्रम, संमेलने, प्रदर्शने, विज्ञान मासिक. पुस्तके असे अनेकविध उपक्रम दरवर्षी राबवीत असते.१९६६ सालापासून आजवार परिषदेने दरवर्षी एक याप्रमाणे ३५ वार्षिक विज्ञान संमेलने केली. ही संमेलने शहरी आणि ग्रामीण भागात होतात. तीन दिवसाच्या या संमेलनाचे अध्यक्ष मराठी भाषिक वैज्ञानिक असतात. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. कमल रणदिवे, डॉ. बाळ फोंडकॆ हे शास्रज्ञ आजवरच्या संमेलनांचे अध्यज्ञपद भूषवून गेले आहेत.

१९६७ सालापासून गेली ३४ वर्षे परिषद दरमहा ’पत्रिका’ या नावाचे विज्ञानाला वाहीलेले मासिक काढते. या मासिकात विज्ञानाच्यासाठी प्रयोग करून पहाणे, कोडी. इत्यादी मजकूर असतो. ही विज्ञान पत्रिका महाराष्ट्राच्या जवळजवळ ८००० शाळांमध्ये जाते. याव्यतिरिक्त खाजगी वितरण दरमहा २००० आहे. पत्रिकेची वार्षिक वर्गणी १०० रूपये आहे. पत्रिकेचे वर्गणीदार कोणत्याही महिन्यापासून होता येते. १२-१४ वर्षाचे झाल्यावर मुला-मुलांनी तारूण्य येते. पण तारूण्य आले म्हणजे काय होते याची शास्रीय माहीती मुलामुलांना पाठ्यपुस्तकांतून नीटपणे मिळत नाही. शिक्षक किंवा पालकही ती माहिती निट देत नाहीत. याची जाणीव ठेवून परिषदेने १७० स्लाइड्स असलेले ४० मिनिटांचे “मुलगी वयात येते” व “मुलगा वयात येतो” असे कार्यक्रम तयार केले व ते गावोगावी दाखविले. १९८३ सालापासून “मुलगी वयात येते” हा कार्यक्रम ३००० वेळा झाला व महाराष्ट्रातल्या ३ लाख मुलॊ व त्यांच्या आयांनी हा पाहीला. “मुलगा वयात येतो” हा कार्यक्रम १९९९ सालापासून सुरू करण्यात आला व गेल्या दीड वर्षात झालेल्या १०० कार्यक्रमाव्दारे ५००० मुले व त्यांच्या वडिलांना हा कार्यक्रम पाहीला. २०० रूपये मानधन व २ व्यक्तींचा प्रवास खर्च देऊन हा कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही करता येतो.

घरगुती टाकऊ वस्तू वापरून विद्यार्थ्यांना खूप प्रयोग करता येतात. असे प्रयोग शिकविणारी शिबिरे, विज्ञान खेळणी हा ३ दिवसांचा अभ्यासक्रम, दहावी प्रयोग सराव वर्ग हा एका दिवसाचा कार्यक्रम, विज्ञान सफर, गणित शिबिर, गच्चीवरचा बगिचा असे समाजातील विविध स्तरांतील लोकांसाठीचे अनेक कार्यक्रम परिषदेकडे आहेत. दरमहा दुर्बिणीतून नागरिकांना आकाशदर्शन घडवले जाते. महाराष्ट्रातल्या १०० शाळांत परिषदेतर्फे ’विज्ञान मंडळ’ चालविले जाते. इयत्ता ७वी, ८वी व ९वी च्या विद्यार्थ्यांसाठी परिषद विज्ञानाच्या परिक्षा घेते. यासाठी विद्यार्थ्यांनी परिषदेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. ग्रामीण भागासाठी निर्धुर चुली, सोलर कुकर, युरिया खड्डा, शोष खड्डा असेही कार्यक्रम परिषद करते.

इलेक्ट्रॉनिक तज्ञ श्री. प्रभाकर देवधर परिषदेचे सध्याचे अध्यक्ष असून डॉ. वसंत गोवारिकत, डॉ. जयंत नारळीकर हे पूर्वी परिषदेचे अध्यक्ष होते.

३००० रूपये भरून कोणालाही मराठी विज्ञान परिषदेचे आजीव सभासद होता येईल.ज्यांना असे सभासदत्ब हवे आहे त्यांनी मराठी विज्ञान परिषदेशी vidnyan@bom7.vsnl.net.in या पत्त्यावर ईमेलने संपर्क साधावा.

मराठी विज्ञान परिषद ही १९९२ चे राष्ट्रीय विज्ञान पारितोषिक विजेती संस्था आहे. परिषदेच्या विज्ञानसंबंधीच्या कार्याचा आम्हांसर्व मराठी बांधवांना अभिमान वाटतू. सध्याच्या विज्ञानयुगात जगताना विज्ञानाशी संपर्क असणे ही काळाची गरज आहे. यास्तव जास्तीतजास्त लोकांनी परिषदेचे व त्यांच्या पत्रिकेचे सभासद व्हावे असे आव्हान आम्ही मराठीवर्ल्ड.कॉम तर्फे करतो.